Next
स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या
-निखिल कुलकर्णी (संस्कार भारती)
Friday, January 04 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आपल्या देशात वेदकाळात गार्गी, मैत्रेयी या विदुषी होऊन गेल्या. मात्र नंतरच्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षण आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवल्यामुळे स्त्री परावलंबी होती. त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म शिरवळपासून जवळच्या नायगाव येथे खंडोजी पाटील यांच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.
बालविवाहाच्या प्रचलित पद्धतीमुळे सात वर्षांच्या सावित्रीचे लग्न बारा वर्षांच्या जोतिबांशी झाले. सावित्रीबाईंना बालवयापासून शिकण्याची इच्छा होती. जोतिबांबरोबर विवाह झाल्यावर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. जोतिबांनी स्त्रीशिक्षणाचा आरंभ आपल्या पत्नीपासूनच केला. शेतात काम करताना झाडाखाली काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या. नंतर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण घेतले.
१४ जानेवारी १८४८ रोजी जोतिबांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शिकवायचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना, त्यामुळे सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. स्त्रियांनी शिकणे आणि त्यांना शिकवणे हे महाभयंकर पाप आहे, असा समज त्या काळी समाजात होता. सावित्रीबाई शाळेत शिकवायला निघाल्या की लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. सावित्रीबाईंनी या सर्व छळाला धीराने तोंड देऊन मुलींना शिकवण्याचे काम चालू ठेवले. फुलेदांपत्याने नंतर दोन शाळा काढल्या. त्यांचे हे शिक्षणकार्य पाहून १९५२मध्ये इंग्रज सरकारने त्यांचा जाहीर सत्कार केला आणि त्या शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले. भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने शिक्षण देण्याचे व्रत आयुष्यभर चालूच ठेवले. आज मुली शिकतात, मात्र त्यासाठी कष्ट वेचलेल्या सावित्रीबाईंना वंदन करुया.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link