Next
रेल्वेरुळांवरील ‘देवदूत’
विशेष प्रतिनिधी
Friday, January 04 | 05:00 PM
15 0 0
Share this storyमुंबईची लोकल म्हणजे गर्दी, लोटालोटी! मात्र याच लोकलप्रवासात अनेकांच्या मनाला विसावा मिळतो, मैत्रीचे बंध जुळतात आणि माणुसकीचे दर्शनही घडते. सहप्रवासी कधी एकमेकांना सांभाळून घेतात, तसेच वेळप्रसंगी स्वतःच्या जिवावर उदार होऊन मदतही करतात. लोकल रेल्वेप्रवासादरम्यान संकटात सापडलेल्यांसाठी ‘देवदूत’ ठरलेल्या काही मुंबईकरांना ‘रेल हिरो २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्याची योजना ‘एम इंडिकेटर अॅप’च्या प्रवर्तकांनी आखली आणि २४ डिसेंबर रोजी व्हीजेटीआय कॉलेजमध्ये हा पुरस्कारप्रदानाचा समारंभ झाला. अशा देवदूतांमध्ये होते काही रेल्वेकर्मचारी, सुरक्षादलाचे कर्मचारी आणि काही सर्वसामान्य प्रवासीही!  

इस्तीखार अहमद ही व्यक्ती या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली. त्यांनी घाटकोपर-विक्रोळी स्थानकांदरम्यान फूटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या एका मुलीला प्रसंगावधान राखून वाचविले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. फूटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या त्या मुलीला भलतीच प्रसिद्धी मिळाली, मात्र तिला वाचवणारे इस्तीखार अहमद अज्ञात राहिले. या व्यक्तीला शोधायचेच असा चंग बांधून ‘एम-इंडिकेटर’कर्त्यांनी विशेष मोहीम राबवली. ‘एम-इंडिकेटर’च्या दीड कोटी वापरकर्त्यांना संदेश पाठविला गेला. त्यातून हा संदेश इस्तीखार अहमद यांच्यापर्यंत पोहोचला. ‘एम-इंडिकेटर’च्या क्रमांकावर एक फोन क्रमांक चार वेळा हुकल्याचे निदर्शनास आले, तेव्हा त्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर समोरील व्यक्तीने ओळख दिली की – मीच तो! नंतर अर्थातच त्या व्यक्तीची ओळख व सत्यता पडताळून घेतली गेली. इस्तीखार अहमद हे गोवंडी येथे राहतात व चेंबूर येथील फर्निचरच्या दुकानात काम करतात. पुरस्कार सोहळ्याच्या वेळी प्रथमच यांचा चेहरा लोकांसमोर आला.

प्रेरणा शाह आणि रुपाली मेजारी या दोघींनी मिळून धावत्या लोकलमधून पडलेल्या गर्भवती महिलेचे प्राण वाचवले. सकाळी चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधील दरवाजा बंद करण्याच्या प्रयत्नात असताना ही गर्भवती महिला लोकलमधून रेल्वे रुळांवर कोसळली. अनेक महिला प्रवाशांनी हा प्रकार पाहिला, परंतु कोणाला काय करायचे ते सुचत नव्हते. रुपाली मेजारी ही मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, तर प्रेरणा शाह ही अलिकडेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेली तरुणी. या दोघींनी धाडस दाखून त्या गर्भवती महिलेचे प्राण वाचवले.

जी.आर.पी. कॉन्स्टेबल महादेव पावने यांना ड्युटीवर कार्यरत असताना त्यांना असे लक्षात आले की फलाटावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे. स्ट्रेचर येण्याची वाट न पाहता प्रसंगावधान दाखवत त्यांनी त्या व्यक्तीला आपल्या खांद्यावरून त्वरित अॅम्ब्युलन्सपर्यंत नेले.

पॉइंट्समन गणेश वाडके यांनी अंधेरी स्थानकाजवळील पूल कोसळल्यांनंतर लोकल ट्रेन थांबवण्यासाठी मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना त्वरित सूचना दिली, ती ट्रेन थांबली, त्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला.  

श्रवण प्रेम तिवारी हे चर्नीरोड स्टेशनवर थांबलेले असताना त्यांच्या लक्षात आले, की समोरच्या रेल्वे ट्रॅकवर एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेली आहे. लगेच त्यांनी फलाटावरून खाली उतरून त्या ट्रॅकवर येणाऱ्या रेल्वेला थांबवले. तिथे पडलेल्या जखमी व्यक्तीला वाचवण्यात त्यांना यश आले.

आर.पी.एफ. कॉन्स्टेबल राज कमल, दयाराम, संदीप कुमार यादव, मुकेश यादव, वीरेंद्र यादव, बिराजदार, सुनील कुमार नापा, मोनू मेहरा, विनोद शिंदे, अरुण कुमार, अशोक कुमार यादव, आर.पी.एफ. अधिकारी जे.पी.एस. यादव,  आर.पी.एफ. वरिष्ठ निरीक्षक उत्तम कुमार गौतम, विनीत कुमार, विनीत सिंग, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान शोएब शेख, सचिन पोले, संतोष पाटील, जी.आर.पी. चे पोलीस नायक जावेद शेख,  जी.आर.पी. हेड कॉन्स्टेबल उदय वासुदेव मसुरकर, तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण, एस. आई. पी. एफ. रमेश चंद्र चौधरी, आर. के. मीना या सर्वांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘रेल हिरो २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात ३४ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. डी.आय.जी. (दक्षिण-पश्चिम रेल्वे) डी.बी. कासार आणि डेप्युटी चीफ सिक्युरिटी कमिशनर (पश्चिम रेल्वे) भावप्रीता सोनी या मुख्य अतिथी तसेच ‘एम-इंडिकेटर’चे संस्थापक सचिन टेके यांच्या हस्ते पुरस्कारांचे  वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह व ५००० रुपयांचे रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

अशा मदतशील लोकांना समाजासमोर आणल्याने त्यांचे मनोबल वाढेल आणि इतर लोकांमध्ये परोपकाराची भावना जागृत होईल, असा या उपक्रमाचा उद्देश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link