Next
हे बंध रेशमाचे
मितेश जोशी
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

व्हायरलच्या विळख्यात अडकलो नाही - श्रेया बुगडे
माझी आणि निखिलची पहिली भेट एका मालिकेच्या सेटवर झाली. पुढे आम्ही खूप चांगले मित्र झालो. मालिकेचं चित्रीकरण पूर्ण संपलं आणि आमच्या वाटा निराळ्या झाल्या. त्यानंतर काही दिवसांनी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली ज्यात निखिल प्रोजेक्ट हेड होता. त्याचं अभिनंदन करायला मी फोन केला व आम्ही पुन्हा संपर्कात आलो, पूर्वीसारखे! पहिल्याच मालिकेच्या वेळी त्याला मला विचारायचं होतं, परंतु त्याचं धाडस झालं नाही. अखेर काही महिन्यांनंतर त्यानं हे धाडस केलं आणि त्याच दिवशी त्यानं घरातल्या मंडळींना माझ्याबद्दल कल्पना दिली होती. त्यामुळे त्याचे घरातलेदेखील खुश होते. लग्नासाठी माझी एकच अट होती, की मला पडद्यावरच्या कलाकाराशी लग्न करायचं नव्हतं. याबाबत माझे काही वेगळे विचार होते. निखिल हा पडद्यामागचा कलाकार आहे. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. माझ्याच घरी कांदेपोहे झाले. कांदेपोह्यांनंतर तब्बल चार वर्षांनी आम्ही लग्न केलं. कारण आम्हा दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. सुनेचा पायगुण चांगला होता हे वाक्य घरोघरी ऐकायला मिळतं, परंतु आमच्याकडे जावयाचा पायगुण चांगला होता, असं म्हणतात. कारण तो माझ्यासाठी खरोखर ‘लकी मॅन’ ठरला. आमचा लग्नसोहळा पाच दिवसांचा होता. पहिल्या दिवशी गणेशपूजनानं लग्नसोहळ्याची नांदी झाली. दुसऱ्या दिवशी मेहंदी, तिसऱ्या दिवशी संगीत, नंतर हळद व शेवटी लग्न अशा रीतीनं धुमधडाक्यात २७ डिसेंबर २०१४ या दिवशी आम्ही विवाहबद्ध झालो. त्यावेळी समाजमाध्यमांचं व कलाकारांचे फोटो व्हायरल होण्याचं जाळ पसरलेलं नव्हतं. त्यामुळे आजच्यासारखं ऊठसूट सोशल मीडियावर जसे व्हायरल होतो तसं नशिबानं आम्ही व्हायरल झालो नाही, याचा आनंद आहे.


दोन्ही घरं सारखीच  - मृण्मयी देशपांडे
लग्नानंतर आयुष्य बदलतं असं म्हणतात. माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. लग्न कसं होईल, याची मला अजिबात चिंता नव्हती. माझ्या आईबाबांनी संकेतस्थळावर माझी नावनोंदणी केली होती. तिथेच माझी आणि स्वप्निलची पहिली भेट झाली. आमचं ठरवून केलेलं म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे अॅरेंज मॅरेज आहे, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. माझी आणि स्वप्निलची पहिली भेटदेखील अशाच मजेशीर पद्धतीनं झाली. ज्या दिवशी, ज्या वेळेत आम्ही भेटणार होतो नेमकं त्याचवेळी मी चित्रीकरणात अडकले होते. मला घरी पोहोचायला बऱ्यापैकी उशीर होणार होता. स्वप्निल वेळेत माझ्या घराखाली येऊन थांबला होता. त्याला ताटकळत ठेवणं शक्य नव्हतं. म्हणून मी त्याला खालच्या काकूंकडून किल्ली घे आणि घरी जाऊन बस, असा सल्ला दिला.

तासाभरात मी घरी पोहोचले. घराचं दार त्यानं उघडलं आणि ‘वेलकम होम’ असं म्हणून त्यानं माझं स्वागत केलं. पुढच्या १० मिनिटांत आम्हाला कळलं होतं, की आम्ही लग्न करतोय. आम्ही त्या दिवशी पहिल्यांदाच भेटलो, परंतु जणू काही खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय अशीच भावना आमच्यात होती. लग्न आम्हा दोघांनाही पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं, विधींना प्राधान्य देऊन करायचं होतं. दोन्हीकडची मंडळी प्रचंड हौशी आहेत. त्यामुळे लग्न अगदी धुमधडाक्यात झालं. आम्ही लग्नात पेशवाई थीम ठेवली होती.

स्वप्निलच्या आईबाबांनाही मी आईबाबा अशीच हाक मारते. त्यांच्याशी माझं खूप चांगलं बॉण्डिंग झालंय. त्यामुळे कधीकधी मी त्याच्या आईबाबांबद्दल बोलतेय, की माझ्या आईबाबांबद्दल हे लोकांना पटकन कळत नाही, इतकं आमचं नातं मस्त आहे. स्वप्निलच्या निमित्तानं मला असा जोडीदार मिळाला आहे जो मला मी आहे तशी स्वीकारतो, सांभाळून घेतो आणि समजून घेतो. लग्नानंतरही ‘सासर-माहेर’ अशी भावना माझ्या मनात येत नाही, कारण माझ्यासाठी दोन्ही घरं सारखीच आहेत. प्रेमळ आणि काळजी करणारी.

फिल्मी दुनियेचा पगडा - सावनी रवींद्र
माझी आणि आशिषची ओळख एका मित्राच्या लग्नात झाली. त्यानंतर आमच्यात चांगलीच गट्टी जमली. माझ्या सततच्या मुंबई-पुणे प्रवासामुळे कधीतरी पुण्यात आमची भेट व्हायची. माझा सगळा फोकस करिअरवर होता. अॅरेंज मॅरेजच्या दिशेनं मी पाऊल उचलायला सुरुवात केली होती. आईबाबांच्या समाधानासाठी मी वधू-वरसूचक मंडळात नाव नोंदवलं होतं. दरम्यानच्या काळात आशिषदेखील एमडी झाला. त्याच्या घरूनही लग्नासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. तेव्हा आशिषनं माझा विचार करून एक दिवस बाहेर भेटायला बोलावले आणि थेट लग्नाची मागणी घातली. तुझी कर्मभूमी पुणे आहे, तर माझी मुंबई. करिअरवर फोकस करण्यासाठी मी मुंबईत राहिलेली तुला चालणार असेल तरच मी तुझ्याशी लग्न करेन, अशी अट मी त्याला घातली. क्षणाचाही विलंब न करता त्यानं माझी अट मान्य केली. माझं लग्न होतंय याचं दडपण मला कधीच आलं नाही. पेशानं गायिका असल्यानं मला लाइमलाइटची सवय आहे. बोहल्यावर चढणारे नवरा-नवरी हे लग्नाच्या दिवशी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. लाइमलाइटची सवय असल्यानं मी लग्नाच्या बाबतीत अतिआत्मविश्वासी होते. गाण्याच्या स्टेजवर जाऊन उभं राहणं व लग्नाच्या स्टेजवर उभं राहणं यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे मला त्या दिवशी पटलं.

विधींना प्राधान्य देऊन मराठमोळ्या पेहरावात आमचं लग्न झालं. मला लग्नात विनाकारण खर्च, विनाकारण पैशांचा देखावा नको होता. आम्ही स्वागतसमारंभ जरी दणक्यात केला असला, तरी लग्न मात्र पारंपरिक पद्धतीनंच मोजक्या लोकांमध्ये केलं. आजकालच्या लग्नसोहळ्याला फिल्मी तडका आलेला दिसतोय. मालिकांमधील, चित्रपटांमधील लग्नाची पद्धत ही खऱ्या आयुष्यातील लग्नात कॉपी-पेस्ट केली जातेय. त्यामुळे आजच्या लग्नसोहळ्यांवर फिल्मी दुनियेचा पगडा आहे, असं मला वाटतं.


आणि अभिजितचे कपडेच सापडेनात... - सुखदा खांडकेकर
माझ्या दृष्टीनं लग्न म्हणजे, गोड बंधन आहे. दोघांनी एकमेकांना सांभाळून, समजून घेतलं, तर ते ‘बंधन’ वाटणारच नाही. उलट एकमेकांच्या साथीनं सगळी ध्येयं गाठताना प्रवास सुखकर होतो. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांची साथ न सोडणं, सोबत राहणं यात लग्नाचा खरा अर्थ दडला आहे. अभिजितची पहिली मालिका ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ची पूर्ण पानभर जाहिरात वर्तमानपत्रात आली होती. दोन्ही कलाकार नाशिकचे होते, ज्याचा मला खूप अभिमान वाटला. अभिजितला समाजमाध्यमावर गाठून मी त्याचं कौतुक व अभिनंदन केलं. ज्यावर अभिजितनंदेखील लगेच प्रतिसाद दिला. मोबाइल नंबरची देवघेव झाली व त्यानंतर आम्ही चांगले मित्र बनलो.

पुढे आमच्या घरात माझी लगीनघाई सुरू झाली. अभिजित व माझी आई दोघंही माझ्यासाठी योग्य वर शोधू लागले. माझी आई अभिजितला तिच्या होणाऱ्या जावयाच्या अपेक्षा सांगू लागली. हे सगळं चालू असताना अभिजितनं मलाच एक दिवस विचारलं. माझ्यापेक्षा माझी आईच जास्त खुश होती. अगदी थाटामाटात आम्ही १ फेब्रुवारी २०१३ या दिवशी पुण्यात लग्नबेडीत अडकलो. आम्ही लग्नापत्रिका खलित्यासारखी छापून ती पैठणीच्या पदरात गुंडाळली होती. कारण लग्नात पैठणीची थीम होती.

लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांतपूजनाच्या दिवशी एक गडबड झाली. अभिजितचे कपडे सापडत नव्हते. आमची पार्टी नटूनथटून पूजेची तयारी करून पूजेला बसायला सिद्ध झाली होती तरीही नवरोबांचे कपडेच मिळेनात. यावर पर्याय म्हणून आम्ही भटजींना आधी माझ्या हातून पूजा करायला

लावली व नंतर अभिजितच्या हातून. माझ्या हातून पूजा सुरू असताना अथक प्रयत्नांनी अर्ध्या तासानं सफल झाली. विधी झाल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही असा माझा विश्वास आहे. लग्न म्हटलं की अक्षता पडल्याच पाहिजेत असंही वाटायचं. त्यामुळे आमचा साग्रसंगीत लग्नसोहळा झाला. अर्थात त्याला सेलिब्रेटी टॅग नव्हताच. नातेवाईक, मित्रपरिवाराला त्यातून आनंद मिळाला हे आम्हा दोघांसाठी समाधान होतं.

अचानक माणसं वाढली - अमेय वाघ
संसारात बायकोला थोडं आई व्हावं लागतं आणि नवऱ्याला वडील व्हावं लागतं. असं झालं तर लग्नाचं नातं आणखी खुलत जातं, असं मला वाटतं. मी आणि साजिरी लग्नाच्या अगोदर १३ वर्षं डेट करत होतो. आपण एकत्र नांदू शकतो असं वाटलं तेव्हा आम्ही घरी लग्नाचा प्रस्ताव मांडला. साजिरी कोलगेटमध्ये काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली असते. आम्हा कलाकारांना वेळेचं गणित मांडता येत नाही. बऱ्याचदा घरी यायला रात्री उशीरही होतो, परंतु या सर्व गोष्टींसकट तिनं मला स्वीकारलं. मी मुंबईत चित्रीकरणाच्या कामात खूप व्यग्र असायचो. एक महिना तरी अमेय पुण्यात येणार नाही म्हणून आपण स्वतःहून साजिरीच्या आईबाबांची भेट घेऊ, असं माझ्या आईबाबांनी ठरवलं. त्यांनीच भेट घेऊन लग्नाची बोलणी केली. त्यानंतर ८ महिन्यांनी आमचं लग्न झालं. लग्नाच्या दिवशी एक गंमत झाली. आमचं ज्या कार्यालयात लग्न झालं त्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या कार्यालयांतही लग्नं चालू होती. तिथलं लग्न उरकून साधारण ५०० अनोळखी लोक आमच्या लग्नात स्टेजवर येऊन आम्हाला शुभाशीर्वाद देऊन गेले. १३ वर्षं आम्ही संपर्कात असल्यानं ती माझ्या व मी तिच्या नातेवाईकांना बऱ्यापैकी ओळखत होतो. त्यामुळे अनोळखी व्यक्ती दिसली रे दिसली की ती मला व मी तिला त्या व्यक्तीची विचारणा करायचो. आतापर्यंत आम्हाला ती लोक नेमकी कोण होती, याचं उत्तर मिळालेलं नाही. 

मैत्रीला नात्याची जोड - चिन्मय उदगीरकर
कोल्हापूरला एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सेटवर गिरिजाची भेट झाली. गिरिजा कामावर खूप जास्त लक्ष केंद्रित करते हे तेव्हा मला कळून चुकलं होतं, कारण पहिले पाच दिवस ती कोणाशीच बोलली नव्हती. माझी मानलेली बहीण पाच दिवसांनी शूटिंगला आली तेव्हा तिची आणि गिरिजची गट्टी जमली. पुढे मीदेखील त्यांच्या चमूत सहभागी झालो. गिरिजाचं माहेर ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरील भागात असल्यानं मीदेखील तिथं घर विकत घेत होतो. चित्रीकरण संपल्यानंतर बरोबर १० दिवसांनी मी घर बुक केलं. ज्यात गिरिजाचादेखील खारीचा वाटा होता. एकमेकांचे विचार, मतं, स्वभाव असं सगळंच जाणून घेऊन मी तिला थेट लग्नाची मागणी घातली. सुरुवातीला आमच्या दोघांच्याही घरी आमच्या मैत्रीविषयी माहीत होतं. त्यामुळे लग्नाचा प्रस्ताव घरच्यांसमोर मांडल्यावर त्यांना नाही म्हणायला कुठे जागाच शिल्लक नव्हती. दोघांनाही लग्नाच्या विधींना प्राधान्य द्यायचं होत. त्यामुळे थाटामाटात पण विधी समजून घेऊन आम्ही लग्न केलं.
नवरा-बायको झाल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. आम्ही नेहमी म्हणतो, की आमच्या मैत्रीचं रूपांतर लग्नात झालंय. आम्ही एकमेकांच्या आवडीनिवडीचा, वैचारिक स्वातंत्र्याचा आदर करतो. आमचा मैत्रीपासूनचा एक नियम आहे, दिवसभरात जे जे घडतं, ते सगळं एकमेकांशी शेअर करायचं. मग ते काहीही असो, प्रवासातला अनुभव, कामाच्या ठिकाणचा किस्सा, वाचत असलेल्या पुस्तकातली काही मतं, असं काहीही असलं तरी एकमेकांना सांगतोच.

लग्न हा एक संस्कार - खुशबू तावडे
माझ्या आयुष्यात कोणी एक ‘तो’ आल्यावर काय असं वेगळं घडणार आहे, असा विचार मी करायचे. हा विचार बदलायला ‘ती’ व्यक्ती तुमच्या आयुष्यात यावी लागते. माझ्यासाठी ‘ती’ संग्राम होती. संग्रामनंच मला प्रपोज केलं. आम्ही एकमेकांना ओळखू लागल्यानंतर तीन वर्षांनी लग्न केलं. आमचे घरचे ठरवतील तसं आम्ही लग्न करणार होतो. आमच्या वैयक्तिक अशा काहीच मागण्या किंवा इच्छा नव्हत्या. कारण त्यानंतरच संपूर्ण आयुष्य आम्ही आमच्या नियमांवर जगणार होतो. घरच्यांच्या आनंदाला प्राधान्य देत माझे दोनाचे चार हात झाले. आजकाल लग्न हा एक मजेचा, धमाल करण्याचा केंद्रबिंदू झाला आहे. खरं तर लग्न हा एक संस्कार आहे. तो त्याच पद्धतीनं व्हायला हवा असं मला नेहमीच वाटतं. लग्न कसंही करा, रजिस्टर करा, डेस्टिनेशन वेडिंग करा, अनाथाश्रमात करा, पैसे वाचवून करा, कसंही करा, परंतु लग्नानंतर तुम्ही ते नातं कसं टिकवताय याचादेखील खोलवर विचार करा!


एकत्र ध्येय गाठणं महत्त्वाचं - सिद्धार्थ मेनन
मी लग्नाचा विचार बोलून दाखवला तेव्हा अनेकांनी माझ्याकडे संशयानं पाहिलं होतं. कारण एखादा अभिनेता लग्न करतोय, याकडे आजही वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. आमच्या पिढीतल्या लव्हबर्ड्सना लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारल्यावर ते हमखास ‘आयुष्यात सेटल झाल्यावर लग्न करू’, असं उत्तर देतात, जे मला पटत नाही. आयुष्यात चढउतार येतच असतात. सेटल होऊन लग्न झाल्यावर मुलाच्या आयुष्यात विपरीत काही घडलं तर तुम्ही त्याच्या हातावर पानसुपारी देणार का? मी आणि माझी पत्नी पूर्णिमा नायर, आम्ही एकमेकांना बांधून ठेवलेलं नाही. आमच्या आवडीनिवडी सारख्या आहेत. आमच्यात मतभेद आहेत, परंतु आयुष्य कसं जगायचंय यावर आमचं एकमत आहे. पूर्णिमा लग्नानंतर आठ महिने नोकरीनिमित्त दुबईला होती. त्या दिवसांमध्ये मी तिला कधीच ‘नोकरी सोडून भारतात ये’ असं सांगितलं नाही किंवा तिनंही लग्नाआधी ‘तू मोठा स्टार झाल्यानंतरच आपण लग्न करू’ अशी अट घातली नाही. लग्न म्हणजे काही बिझनेस डील नाही. अनेकांच्या लग्नात ‘असंच झालं पाहिजे’, ‘इतक्याचे दागिने द्या’ अशा गोष्टी ठरवल्या जातात. हे आम्हाला नको होतं. एकमेकांसोबत राहायचं असेल तर ते प्रेमासाठी राहायला हवं. जोडीदाराच्या संघर्षांत आपली साथ असणं आणि एकत्र एखादं ध्येय गाठणं या भावनेचा मी आदर करतो.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link