Next
नक्षलवादी गटांना वर्षाला १५०० कोटींची खंडणी
प्रतिनिधी
Friday, November 23 | 04:00 PM
15 0 0
Share this story


तें दूपत्ताविक्रीचे हप्ते, रस्तेबांधणीच्या कंत्राटातील हप्ते, मजुरांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांच्या पगारातले हप्ते अशा खंडणीच्या रूपाने नक्षलवादी गटांकडे वर्षाला १५०० ते १६०० कोटी रुपये जमा होतात व तोच पैसा न्यायालयीन लढायांसाठी तसेच सरकारविरोधी अपप्रचारासाठी वापरला जातो, असा गौप्यस्फोट शहरी नक्षलवादाविषयी सातत्याने बोलणारे चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बुधवारी केला. दहशतवाद्यांच्या स्लीपरसेलप्रमाणेच नक्षलींची फ्रंट ऑर्गनायझेशन शहरांमध्ये कार्यरत असून प्राध्यापक, सोशल मीडिया, सनदी अधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासह स्वयंसेवी संस्थांपर्यंत त्यांचे जाळे विस्तारले आहे, असा दावा अग्निहोत्री यांनी केला.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित चर्चगेटच्या इंडियन मर्चन्ट्स चेम्बरच्या सभागृहात विवेक अग्निहोत्री यांनी शहरी नक्षलवादाविषयी विचार मांडले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक रवींद्र साठे यांनी त्यांचे स्वागत केले.

‘अर्बन नक्षलीझम’ ही संज्ञा प्रचलित करणारे विवेक अग्निहोत्री म्हणाले, की भारतीय समाजव्यवस्था जातीआधारित आहे, हे तुम्हाला शाळेत शिकवले जात नाही. परंतु नक्षली गटांकडून मात्र या प्रकारची चिथावणीखोर मांडणी कायम केली जाते. प्रत्येक विषयाची अशी व्यवस्थाविरोधी मांडणी ते करत असतात. नक्षलवादी गटाला आर्थिक निधी कुठून उपलब्ध होतो, याचे दाखले देताना त्यांनी सांगितले, की  जंगलातून आदिवासींनी तेंदूपत्ता गोळा केल्यानंतर त्याच्या विक्रीतून तब्बल ६० कोटी रुपये नक्षलवादी संघटनांना हप्त्यापोटी जातात. सरकारी स्तरावर रस्त्याची कामे मंजूर झाली, की प्रत्येक किलोमीटरमागे १५ टक्के हप्ता दिला जातो. शेतात जी यंत्रे वापरली जातात, त्यावर काम करणाऱ्या ऑपरेटरकडूनही १५ टक्के कापून घेतले जातात. शिक्षकांनाही एक पगार द्यावा लागतो. अशा सर्व माध्यमांतून येणारा पासै हिंदूविरोधातील लढायांसाठी पुरवला जातो. धर्मामध्ये अस्थिरता निर्माण करायची, अशांतता निर्माण करायची व देश अस्थिर करायचा, असा त्यांचा अजेन्डा असतो. त्यांच्या फ्रंट ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काम करणारे शहरी नक्षलवादी असतात.

सामाजिक लढाया लढणाऱ्या विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना या मोहिमेत काम करण्यास भाग पाडले जाते. आदिवासी तरुण खरोखऱ त्यांच्या समस्यांसाठी लढत असतात. परंतु तथाकथित विचारवंतांनी या तरुणांचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आणि त्यातून नक्षलवादाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. आदिवासी तरुणांची संख्या कमी असल्याने मग या चळवळीतील लोकांनी गावे, शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गळाला लावण्याचे काम सुरू केले. ‘सरकार आपल्यावर कसा अन्याय करतेय आणि त्यासाठी आपल्याला सशस्त्र लढा कसा द्यावा लागेल,’ हे विचार तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाऊ लागले. त्यांना शस्त्रे उपलब्ध करून दिली गेली, प्रशिक्षणही दिले. त्यांच्यासाठी पैसा गोळा केला जाऊ लागला. हे काम शहरात राहून केले जाऊ लागले. यासाठी कधी पत्रकार, कधी डॉक्टर, कधी समाजसेवक, आरटीआय कार्यकर्त्यांची रूपे घेऊन कामे केली जात आहेत. पुणे पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत हेच समोर आले आहे. तुमचा एखादा पत्रकार, डॉक्टर, इंजिनीयर मित्रही असा असू शकतो, त्याचा संशयही येणार नाही, असे काम तो करीत राहतो. हाच अर्बन नक्षलवाद आहे, असे अग्निहोत्रींनी सांगितले. 

स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) माध्यमातून शहरी नक्षलवाद कमालीचा फोफावत आहे, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, जबलद नावाची एक लिगल सेल म्हणून काम करणारी संस्था बस्तरची आहे. या संस्थेने आदिवासी लोकांसाठी आजवर कधीही काम केलेले नाही. कित्येक संस्था तर कधी बस्तरमध्ये गेल्याही नसतील. या संस्था आदिवासींसाठी नव्हे, तर केवळ नक्षलवादींसाठी काम करतात. कुणाला अटक झाली, तर त्यांच्या कुटुंबीयांना मदत करतात. एकदा चेन्नईतील एका मुलीने भाजपविरोधात घोषणाबाजी केली, तर तिच्या मदतीसाठी न्यायालयात १६ वरिष्ठ वकील हजर होते. मुंबईत शेतकऱ्यांचा लाँग मार्च झाला, त्यात सर्वजण लाल पेहराव करून आले होते. कोणते शेतकरी लाल कपडे घालतात? या सर्वांचा खर्च कुणी केला होता? भीमा-कोरेगावमध्येही तोडफोड झाली. या सर्वांमागे कोण आहे, त्याचा विचार करा व त्याचा सोशल मीडियापासून सर्वत्र प्रतिवाद करा, असा मुद्दा त्यांनी मांडला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link