Next
केदार निवड सार्थक ठरवणार?
अमित मधुकर डोंगरे
Friday, May 03 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सुरू होणाऱ्या बाराव्या विश्वचषक क्रिकेटस्पर्धेत केदार जाधवची एण्ट्री ही पुण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खास आनंदाची बाब ठरत आहे, कारण महाराष्ट्राच्या रणजीसंघातून विश्वचषकस्पर्धेसाठी निवडला गेलेला तो पहिलाच खेळाडू आहे.
देशात प्रत्येक राज्याचा एक रणजी संघ आहे, मात्र महाराष्ट्रात मुंबई, विदर्भ आणि महाराष्ट्र असे रणजीचे तीन संघ आहेत. त्यामुळे मुंबईचे सचिन तेंडुलकरपासून अन्य कोणी खेळाडू विश्वकरंडकासाठी खेळले तर त्याचं कौतुक राहिलं नव्हतं. मात्र महाराष्ट्राच्या रणजीसंघातून भारताच्या संघात स्थान मिळवलेल्या केदार जाधवला मिळालेली संधी ही कौतुकाची बाब आहे. केदारनं त्याचा खेळातील सातत्य इतकं उत्तम राखलं आहे, की निवड समितीला त्याला संघात स्थान द्यावंच लागलं. १९७५ पासून यंदाच्या विश्वचषकस्पर्धेत खेळणारा केदार पुण्याचाच नव्हे तर राज्याचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
२६ मार्च १९८५ रोजी जन्मलेल्या केदारनं एकदिवसीय संघात २०१४ साली पदार्पण केलं. आज त्याच्या नावावर पाच अर्धशतकं आणि दोन शतकं आहेत. अकराशेपेक्षा जास्त धावा करताना त्यानं पाचव्या स्थानावर त्याची हुकमत सिद्ध केली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व कर्णधार विराट कोहली यांची केदारवर विशेष मर्जी आहे. पुण्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जेव्हा केदारनं सामना जिंकून देणारी शतकी खेळी केली तेव्हाच त्याचं भारतीय संघातील स्थान पक्कं झालं होतं. आता तर त्याला विश्वचषकस्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली असून, तो या संधीचं निश्चितच सोनं करेल, असा विश्वास वाटतो.
या संघाची निवड करताना निवडसमितीसमोर युवा खेळाडूंची नावं होती व संघाचं सरासरी वय ३० असतानाही ३४ वर्षांच्या केदारची निवड त्याची उपयुक्तता पाहूनच केली गेली यात दुमत नाही. तो भक्कम फलंदाज आहेच शिवाय अचूक वेळी बळी मिळवून देणारा ऑफ स्पिन गोलंदाजही आहे. त्यानं जोड्या फोडणारी गोलंदाजी याआधीही सिद्ध केली असून त्याची हीच गुणवत्ता भारतीय संघाला इंग्लंडमध्ये उपयोगी ठरणार आहे. गोलंदाजीत सत्तावीस बळी मिळवताना केदारनं विराट व धोनी यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. जे आजवर महाराष्ट्र रणजीसंघाच्या एकाही खेळाडूला जमलं नाही ते केदारनं करून दाखवलं आहे.
भारताच्या संघात स्थान मिळवणं शंतनू सुगवेकर, सुरेंद्र भावे अशा कितीतरी गुणवान खेळाडूंना जमलं नाही. विश्वकरंडक सोडा भारताच्या एकदिवसीय संघातही या खेळाडूंची निवड झाली नाही. त्यांची कारकीर्द केवळ वाट पाहण्यातच संपली. ही कसर केदारनं भरून काढली आहे. महाराष्ट्र रणजीसंघाकडे गुणवत्ता नाही असं नाही, मात्र या गुणवत्तेला कधीही संधी मिळाली नाही. निवडसमितीचे अध्यक्ष जतीन परांजपे यांनी मात्र केदारवर विश्वास दाखवला आहे व आता तोच केदारला सार्थ ठरवायचा आहे. इतकंच नाही तर भारताच्या संघात सातत्यानं स्थान टिकवत केदारनं ५९ सामन्यांत खेळ केला. हीदेखील महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. संघात स्थान मिळवणं अन्य खेळाडूंसाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची गोष्ट होती, ती केदारनं लीलया केली.
सोलापूरमधील माढा येथील जाधववाडीत जन्मलेल्या केदारनं महाराष्ट्राच्या रणजीसंघात स्थान मिळवलं तेदेखील प्रशिक्षक नसताना. नववीत असताना त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पीवायसी हिंदू जिमखाना क्लबमध्ये त्यानं या खेळाचे धडे गिरवले. त्यापूर्वी तो केवळ टेनिसबॉलचे क्रिकेट खेळायचा. मात्र रणजीसंघात स्थान मिळवलं आणि पुढे यशस्वी होत गेला. २०१३-१४ मध्ये त्यानं रणजीस्पर्धेत बाराशेपेक्षा जास्त धावा करत निवडसमितीला भारतीय संघात स्थान देण्यास भाग पाडलं व येथूनच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. आता त्याची विश्वकरंडकाच्या स्पर्धेसाठी झालेली निवड निश्चितच आनंदाची गोष्ट असून आता खऱ्या अर्थानं त्याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. त्याला आता एकही चूक करून चालणार नाही. खेळात सातत्य ठेवून प्रत्येक सामन्यात स्थान अबाधित राहील, असा दर्जेदार खेळ त्याला करावा लागणार आहे.
केदारच्या रूपानं महाराष्ट्र रणजीसंघाच्या नवोदित खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. याचीच राज्याच्या क्रिकेटसाठी नितांत गरज होती. केदारनं ही प्रेरणा निर्माण केली आहे. एक मात्र नक्की, तुमची कामगिरी सरस असेल तर वय तुमच्या आड येत नाही, असा विश्वास त्यानं नवोदितांना दिला आहे. खेळ सरस केला तर तुमची जागा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा संदेशही दिला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link