Next
आता चार वर्षे वाट पाहा!
अमित मधुकर डोंगरे
Friday, July 12 | 03:00 PM
15 0 0
Share this story

जागतिक क्रिकेटमधले पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे फलंदाज असलेला संघ म्हणजे टीम इंडिया, जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असलेला संघ म्हणजे टीम इंडिया आणि तरीही न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात स्विंग गोलंदाजीचा धसका घेत सामना गमावण्याची नामुष्की या टीमवर ओढवली. त्यामुळे आता विश्वचषकस्पर्धा जिंकण्यासाठी पुढील चार वर्षे वाट पाहण्याशिवाय भारतीय संघाच्या हातात काहीही उरलेले नाही.
इंग्लंडमधील बाराव्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत तिसरे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगत कोहलीच्या नेतृत्वाखालील विराटसेना स्पर्धेत सातत्याने यश मिळवत उपांत्य फेरीत दाखल झाली होती. साखळीतील कामगिरीमुळे खेळाडूंचा आत्मविश्वासदेखील उंचावला होता, मात्र न्यूझीलंडविरुद्ध खेळताना खेळपट्टीचा बाऊ, मानेवर बसलेले स्विंगचे भूत, प्रमुख फलंदाजांची हाराकिरी आणि चुकीचे शॉट सिलेक्शन यामुळे भारतीय संघाचे विश्वचषक मायदेशी आणण्याचे स्वप्न भंगले आहे. खरे तर भंगले म्हणण्यापेक्षा स्वप्नांचा चक्काचूर झाला, असे म्हणणे योग्य ठरेल.
पावसाच्या व्यत्ययामुळे एकदिवसीय सामना दोन दिवस (मंगळवार आणि बुधवार) खेळवला गेला. न्यूझीलंडने अवघ्या २४० धावांचे लक्ष्य भारतापुढे ठेवले होते. त्यामुळे भारताचा संघ जिंकणार, असे वाटत असतानाच पावसाळी वातावरण, गोलंदाजांना मिळणारा स्विंग आणि क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ याच्या बळावर न्यूझीलंडने भारताचा अठरा धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी यांनी जिवाचे रान केले. जडेजाच्या फटकेबाजीमुळे एकवेळ अशी आली होती, की न्यूझीलंडच्या घशातील विजयाचा घास आपण काढून घेणार असे वाटत होते. मात्र भरात असलेला जडेजा बाद झाला, पाठोपाठ धोनीही धावबाद झाला आणि सामना भारताच्या हातातून निसटला तो कायमचा! धोनी धावबाद झाला ही बातमी होऊ शकते, कारण त्याची चोरटी धाव घेण्यातील मक्तेदारी या सामन्याद्वारे संपली.
जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज आपल्याकडे असूनही केवळ स्विंगचा बाऊ करत रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली बाद झाले, त्याच्यापाठोपाठ दिनेश कार्तिकसुद्धा पॅव्हेलियनमध्ये परतला आणि टीम इंडियाची अवस्था दयनीय झाली. रिषभ पंत, हार्दिक पंड्यादेखील थोडीफार लढत देऊन माघारी परतले. जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकावरील संघाचे वस्त्रहरण सुरू झाले होते. फलंदाजांना अतिआत्मविश्वास नडला. या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजांना काही सल्ले दिले होते का नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
कोहलीने संघात अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याऐवजी जादा फलंदाज खेळवला. तो प्रयोगदेखील अपयशी ठरला. भारतीय संघाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते त्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. लॉ ऑफ अॅव्हरेजेसचा फटका बसण्याची भीती होतीच आणि घडलेही तसेच. याचा फटका पहिल्या तीन फलंदाजांना बसला. मधल्या फळीत तर आनंदीआनंदच होता. केवळ जडेजा स्वप्नवत खेळी खेळला आणि त्याला धोनीने उत्तम साथ दिली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि कोहलीच्या संघाचेच नव्हे तर अवघ्या देशवासीयांचा स्वप्नभंग झाला. या स्पर्धेनंतर कदाचित धोनी निवृत्ती जाहीर करेल, तसेच संघातून राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रिषभ पंत वगैरेंना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल म्हणजेच त्यांच्याच डोक्यावर खापर फोडले जाईल.
यंदाच्या स्पर्धेतील टीम इंडियाचे आव्हान आता संपले असून नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे. या पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने पुढील वाटचाल करावी लागेल. शेवटी कितीही कर्तृत्व असले तरी नशिबाची थोडीतरी साथ लागतेच! म्हणतात ना, Cricket is game of chance.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link