Next
नरक चतुर्दशी
दा. कृ. सोमण
Friday, November 02 | 01:30 PM
15 0 0
Share this story

नरक चतुर्दशी हा दिवस दिवाळीच्या सणामध्ये महत्त्वाचा मानला जातो. या वर्षी मंगळवार, ६ नोव्हेंबर रोजी ‘नरक चतुर्दशी’ आहे. आश्विन कृष्ण चतुर्दशी, जी चंद्रोदयव्यापिनी असेल तो दिवस नरक चतुर्दशीचा समजला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे.  अंगाला तेलाने चांगला मसाज करून उटणे आणि अत्तर लावून गरम पाण्याने करावयाच्या स्नानाला ‘अभ्यंगस्नान’ म्हणतात. थंडीमध्ये आपल्या शरीराची त्वचा कोरडी होते. म्हणून या दिवसात अभ्यंगस्नानाचा खूप फायदा होत असतो. नरकचतुर्दशीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या या अभ्यंगस्नानाला ‘दिवाळीची पहिली अंघोळ’ म्हणूनही संबोधले जाते. काही लोक अभ्यंगस्नानापूर्वी कडू कारटं फळ पायाखाली चिरडतात. नरकासुराच्या वधाचे ते प्रतीक मानले जाते. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे  घरात व घराबाहेर दीप लावायचे. देवपूजा करून देवाला फराळ , चकली, शेव, चिवडा, अनारसे, करंजी वगैरे पदार्थ, सुकामेवा, फळे यांचा नैवेद्य अर्पण करायचा आणि नंतर फराळाचा आस्वाद घ्यायचा असाच दिनक्रम ठरून गेला.

नरकचतुर्दशीसंबंधी एक पौराणिक कथा सांगितली जाते. नरकासुराला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाले होते. त्यामुळे तो बलाढ्य झाला होता. त्याने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. इंद्राचा ऐरावतही त्याने पळविला. अनेक राजांच्या मिळून एकूण सोळा हजार कन्या पळवून त्याने आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. नरकासुराच्या अत्याचारामुळे लोक गांजले होते. अखेर इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला ठार मारले व बंदिवासातील सोळा हजार कन्या मुक्त केल्या. ही गोष्ट आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी घडली. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला, “आजच्या तिथीला जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये. तसेच माझा हा मृत्युदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा.” भगवा श्रीकृष्णांनी ‘तथास्तु’ म्हटले. त्यामुळे दरवर्षी आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची आणि पहाटे-रात्री दीपोत्सव करण्याची प्रथा पडली. भगवान श्रीकृष्णांने नरकासुराला ठार मारून लोकांचा त्रास संपविला म्हणून या दिवशी हा आनंदोत्सव साजरा करण्याची ही पद्धत पडली.

आपल्या प्रत्येकामध्ये कमी-जास्त स्वरूपात आळस, अज्ञान, अंधश्रद्धा अनीती, अस्वच्छता इत्यादी नरकासुर दडलेले असतात. नरकचतुर्दशीच्या निमित्ताने आपण त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link