Next
इंग्रजीपटांतील देव आनंद
धनंजय कुलकर्णी
Friday, September 20 | 04:30 PM
15 0 0
Share this storyआपल्या सदाबहार अभिनयाने हिंदी चित्रपटरसिकांच्या मनात मानाचे स्थान निर्माण करणारे जे कलावंत होते त्यात देव आनंद यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ‘हर फिक्र को धुए में उडाता चला गया’ असे म्हणत ‘जो भी प्यार से मिला हम उसी के हो लिये...’ हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र होता. देव यांच्यावर चित्रित झालेल्या कित्येक गाण्यांनी रसिकांच्या आयुष्यातील प्रेमाला नवा रंग दिला. येत्या आठवड्यात, २६ सप्टेंबर रोजी, देव आनंद यांचा ९६ वा जन्मदिवस आहे. (जन्म- २६ सप्टेंबर १९२३)  त्यानिमित्ताने त्याच्या काही अनोळखी पैलूंवर एक नजर टाकूया.
देव आनंद यांनी  साठच्या दशकात तीन इंग्रजी सिनेमांतून भूमिका केल्या होत्या. त्यातील एका चित्रपटाची निर्मिती तर ‘ट्वेंटीएथ सेंचुरी फॉक्स’ची  होती. रोल्फ बायरनिर्मित ‘द एव्हिल विदीन’ या चित्रपटचे दिग्दर्शन लॅंबेरटो अ‍ॅव्हिलाना यांनी केले होते. या चित्रपटत देव आनंद यांच्या दोन नायिका होत्या. एक होती व्हिएतनामची कियु चिन आणि दुसरी भारतीय झीनत अमान. (देवच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या आधी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.) १९७० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे पर्यायी शीर्षक ‘पासपोर्ट टू डेंजर’ असे होते. या चित्रपटचे छायाचित्रण फली मिस्त्री यांचे होते. हा चित्रपट फिलीपिन्समध्ये डब करून प्रदर्शित झाला होता, पण दुर्दैवाने या चित्रपटला व्यावसायिक यश मिळाले नाही. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झालाच नाही. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रातील क्षोभनाट्य असलेला हा चित्रपट भारतीयांपर्यंत पोचलाच नाही. आता यू ट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध आहे, परंतु हा देव यांचा पहिलाच इंग्रजी चित्रपट होता का? नाही. त्यापूर्वीही त्यांनी दोन इंग्रजी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या.
त्यांपैकी एक होता १९६५ साली केवळ परदेशात प्रदर्शित झालेला ‘गाईड.’ आपल्या हिंदी ‘गाईड’च्या आधी हा चित्रपट बनला होता. या इंग्रजी आवृत्तीचे दिग्दर्शन टॅड डॅनियलवस्की यांचे होते, तर पटकथा नोबलविजेत्या पर्ल बक यांची होती. या चित्रपटलादेखील व्यावसायिक यश न मिळाल्याने चित्रपट कायमचा डब्यात गेला. (भारतात तर हा प्रदर्शितच झाला नाही असे काहींचे म्हणणे आहे. अर्थात काही जण हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला होता असेही ठामपणे सांगतात!) मात्र हा चित्रपट न्यू यॉर्कला ‘लील कोरून थिएटर’मध्ये प्रदर्शित झाला. १० फेब्रुवारी १९६५ रोजीच्या ‘न्यू यार्क टाइम्स’च्या अंकामध्ये या चित्रपटवर चांगले परीक्षण आले होते. देव यांनी आपल्या आत्मवृत्तातदेखील याचा उल्लेख केला आहे. यानंतर गोल्डी विजय आनंद यांनी सूत्रे हातात घेऊन याच कथानकावर (लेखक आर.के. नारायण) ‘गाइड’ हा क्लासिक चित्रपट हिंदीत बनवला. २००७ साली नवकेतनच्या वतीने इंग्रजी ‘गाईड’ भारतात प्रदर्शित करणार अशी बातमी आली होती, पण तो योग जुळून आला नाही. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ही इंग्रजी ‘गाईड’ची प्रिंट नाही असे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. परंतु या वर्षी एक सुखद आश्चर्य घडले. चक्क एका देवभक्ताने देवचा हा इंग्रजी गाईड ‘यू ट्यूब’वर अपलोड केला आहे! आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता, अर्थात ब्लॉकबस्टर हिंदी ‘गाईड’ डोक्यात ठेवून हा चित्रपट पाहिला तर तुम्हाला निश्चितच कंटाळवाणा वाटू शकतो.
देव आनंद यांचा तिसरा इंग्रजी चित्रपट होता ‘ओह बॉय थ्री गर्ल्स.’ हा चित्रपट म्हणजे १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘तीन देवीयाँ’चा इंग्रजी अवतार. एका तरुण कवीच्या आयुष्यात आलेल्या तीन मुलींची कहाणी यात होती. विषय धाडसी, बोल्ड होता आणि काळाच्या पुढचाही होता. त्यामुळेच सेन्सार बोर्डाचे ‘ए’ सर्टिफिकेट त्याला मिळाले. दिग्दर्शन अमरजितचे असले तरी खरा दिग्दर्शक देव आनंद हेच होते हे त्यांच्या चाहत्यांना माहीत होते. देव आनंद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा खुलासा केला आहे. या चित्रपटांत ‘लिखा है तेरी आँखो में’, ‘अरे यार मेरी तुम भी हो गजब’, ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’, ‘कहीं बेखयाल होकर’ ही मिठ्ठास गाणी  होती. मात्र इंग्रजी आवृत्तीत या गाण्यांच्या ऐवजी हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या कविता होत्या, ज्याला पंचमने स्वरसाज दिला होता. हा चित्रपट काही अनाकलनीय कारणाने प्रदर्शित झालाच नाही. अशाप्रकारे देव आनंद यांच्या या तीनही चित्रपटांबाबत आता फक्त आठवणीच शिल्लक आहेत. वाचकांपैकी कुणाला या तीनही चित्रपटांबाबत काही निराळी माहिती असेल तर जरूर शेअर करावी. देव आनंद यांच्या जन्मदिनाच्या  निमित्ताने  त्याच्या या अनोळखी पैलूची ओळख.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link