Next
जनावर
संदेश कुलकर्णी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

प्राजक्ताचा मेसेज न आल्यानं माझ्या आतला एक कोपरा दुखत होता. जवळपास दोन महिने आमच्यात संवाद नव्हता. मीही स्वतःला कामात बुडवून घेतलं. रात्रीच्या पार्ट्यापण असायच्या, बिझी राहायचो. त्यामुळे आठवणीची कळ यायची ती रात्री झोपताना. मग मी किशोरची दु:खद गाणी ऐकायचो. त्यामुळे मस्त एकटं आणि बिच्चारं वाटायचं. एक खिन्न हसू चेहऱ्यावर वागवताना आपण एक ट्रॅजिक हिरो असल्याचा फील यायचा. त्याच नादात ‘देव-डी’ परत एकदा पहिला, पण प्रेमभंगाच्या दु:खात दारू पिऊन आयुष्य वाया घालवणाऱ्या अभय देओलला पाहून भीती वाटली. म्हटलं आपण नको असं व्हायला. शिवाय त्या फिल्ममध्ये किमान त्यांचं आधी प्रेम तरी होतं. आमचं तसंही काही नव्हतं. सगळा एकतर्फी उद्योग. मग उगाच इतका ड्रामा कशाला करायचा? त्या दिवसापासून दारू बंद केली. तरी मधूनच कुठेतरी प्राजक्ताचं झाड दिसायचं आणि हृदयावर ओरखडा उठायचा.
एके दिवशी कामात बुडालेलो असताना, बेसावध असताना, प्राजक्ताचा फोन आला. तिचं नाव फोनवर पाहून छातीत जोरात धडधडलं. “आलोच.” मी धडपडत मीटिंगमधून बाहेर निघालो. सौमित्रनं प्रश्नार्थक पाहिल्यावर मी त्याला फोनवरचं नाव दाखवलं आणि केबिनबाहेर आलो. “हॅलो? अगं प्राजक्ता? कुठे आहेस तू? गायबच झालीस?” मी धाप लागल्यासारखा बोललो. ती म्हणाली, “तू गडबडीत आहेस का? नंतर करू का?” मी आधीपेक्षा वेगानं बोलत म्हणालो-“नाहीनाही बिलकुल नाही बोलूबोलू आत्ताचबोलू.” तिने दचकून विचारलं, “काय?” मग एक दीर्घ श्वास घेऊन मी म्हणालो, “म्हणजे आपण बोलू... किती दिवसांनी तुझा फोन आलाय. मला वाटलं तू मला विसरलीस की काय!” मी जीभ चावली. असलं काही बोलायचं नाही हे मी ठरवलं होतं तरी जीभ लोचटपणा करतच होती. मात्र तिनं ते मनावर घेतलं नाही. म्हणाली, “अरे, बरंच काही चाललंय आयुष्यात. सांगेन एकदा भेटून सविस्तर.” ती आपणहून काही बोलणार आहे म्हटल्यावर मी लगेच वेळ ठरवून टाकली.
तिच्या ऑफिसशेजारच्या कॅफेमध्ये तिची वाट पाहत बसलो. नेहमीच्याच वेटरने एक ओळखीचं हसू दिलं. आता आमच्यात काय घडतंय ते हा पाहणार ही जाणीव थोडी डिस्टर्ब करून गेली. लहानपणी निबंधासाठी ‘मी पंतप्रधान झालो तर’ हा विषय असायचा. तो निबंध मी आता लिहिला असता तर ‘प्रेमी युगुलांना प्रायव्हसी देणारा कायदा पास करून घेईन’ असं त्यात लिहिलं असतं. ‘तू आणि प्राजक्ता प्रेमी युगुल नाही’ असा माझ्या आतून एक झापणारा आवाज ऐकू आला. त्यामुळे खजील व्हायला झालं. मला अचानक मंगेशनं शिकवलेला ‘प्रेझेंट’मध्ये यायचा एक्सरसाइज आठवला. त्यानं सांगितलं होतं, ‘कुठल्याही मीटिंगला जाताना आपल्या पंचेंद्रियांशी नाळ जुळवून घे.’ मग ती येईस्तोवर मी वर्तमानात आलो. अवघड गेलं. सारखे जुने संदर्भ आठवत होते आणि सारखा मी मनाला वर्तमानात आणत होतो. पण जमलं मला. मग मी ठरवलं, आजच्या भेटीत सतत वर्तमानात येत राहायचं.
प्राजक्ता आली. ती नेहमीइतकीच सुंदर दिसत होती, पण डोळ्याखाली किंचित काळी वर्तुळं दिसत होती. जर मी वर्तमानात नसतो तर हे मला लक्षात आलं नसतं. मग इकडच्यातिकडच्या गप्पा, माझ्या नवीन नोकरीची चौकशी करून झाल्यावर ती म्हणाली– “आय अॅम हॅपी फॉर यू.” मग मी म्हणालो, “थँक्स टू यू. पण आता मला सांग, काय चाललंय तुझं?” तिनं खोल श्वास घेतला आणि म्हणाली, “मला ना, आता माझ्याविषयी बोलावंसं वाटत नाहीये.” मला काही कळेना. तेच बोलण्यासाठी आम्ही भेटलो होतो आणि ही काय अचानक पलटी मारत होती? पण मग मी वर्तमानाकडे लक्ष वळवलं. कॉफीचा वास घेत राहिलो आणि सौमित्रबरोबरचं बोलणं आठवलं. मी तिच्या भावनांचा ‘रिस्पेक्ट’ केला पाहिजे. जरी तिनं आधी बोलू असं म्हटलं असलं, तरी तिला आता बोलायचं नाहीये. मी म्हणालो, “हरकत नाही. काही वेळा नको वाटतं दुखणाऱ्या गोष्टीविषयी बोलायला. आणि तुझ्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं बरंच काही सांगताहेत मला.” तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं आणि तिनं डोळ्याला रुमाल लावला. हे पाहून मात्र मी गाळात गेलो. गोठलोच. मला काय करावं कळेना आणि नुसताच बसून राहिलो. मी नेहमीप्रमाणे बोलून माती खाल्ली नाही.
तिनं डोळे टिपले आणि म्हणाली, “काही नाही रे. ऑफिसमध्ये स्ट्रेस होता. म्हणून मी जॉब चेंज केला.” मी बंद पडल्यानं तिला बोलायला अवधी मिळाला आणि थोड्या विरामानंतर ती म्हणाली, “अनेक पुरुषांना हुशार बाई चालत नाही. आणि गंमत म्हणजे दुसऱ्या बाईलाही चालत नाही. दोन महिन्यांपूर्वी माझा बॉस चेंज झाला. हा नवीन बॉस खूप इगोइस्टिक होता. आपण त्याच्यापुढे मिंधं व्हावं असं त्याला वाटायचं आणि ऑफिसमधल्या काही मुलींनी हे स्टेटस अॅक्सेप्ट केलं. त्या त्याच्या मागे-पुढे करायच्या. एक जण तर त्याच्या विशेष क्लोज गेली. हे बघ, मला काही त्या गोष्टींचा प्रॉब्लेम नाही. कोणीही त्यांच्या पर्सनल आयुष्यात काहीही करावं. मात्र प्रोफेशनल गोष्टीत आणलं की घोळ होतो. ही मुलगी माझ्याविषयी जेलस व्हायची. आधीच्या बॉसनं माझं प्रमोशन केलं आणि त्यामुळे तिला मला रिपोर्ट करावं लागायचं, ह्याचा तिला खूप त्रास व्हायचा. तिने गॉसिप सुरू केलं होतं की माझं आणि बॉसचं लफडं आहे म्हणून. खरं तर तो बॉस खूप फेअर होता. थरो जंटलमन. पण तो गेला आणि हा नवा बॉस आल्यावर हिचं फावलं. तिने त्याच्यावर जाळं टाकलं आणि त्याचा मेल इगो कुरवाळल्यामुळे तो खूश होऊन तिच्यात अडकला आणि नंतर त्यानं माझा इंसेंटिव्ह अडवला. मी विचार केला आणि जॉब बदलला.”
मी म्हणालो, “याविरुद्ध दुसऱ्या कुठल्या सिनिअरला सांगता आलं नसतं?” ती म्हणाली, “पॉलिटिक्स गुंतागुंतीचं होतं. खूप एनर्जी गेली असती. कॉलेजमध्ये माझे एक सर होते- शिंदेसर. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती. तेव्हा मी खूप भांडकुदळ होते. स्टुडंट सेक्रेटरी होते. मी संप घडवून आणला होता कॉलेजमध्ये.” मी आश्चर्यानं पाहिलं तर ती हसली. “वाटत नाही ना? पण होते मी रिबेल. तर त्यावेळी शिंदेसर म्हणाले, “प्राजक्ता. चूज युवर बॅटल्स. कुठे लढायचं याची निवड करत जा. त्यांच्यामुळेच मी अभ्यासाला लागले आणि टॉपर झाले. नाहीतर स्टुडंट्ससाठी भांडत बसले असते.” कॉफीचे घोट घेत मी तिचं बोलणं पचवलं आणि म्हणालो, “पण मला त्या मुलीची गंमत वाटते. ह्या थरापर्यंत कसे जाऊ शकतात लोक? आणि त्या बॉसला स्वतःचं डोकं कसं नाही? एवढं कसं इंफ्लुअन्स होतात?” तिनं मान डोलावून डोळे मोठ्ठे केले आणि म्हणाली, “कारण तुम्ही पुरुष येडे असता.” आणि खो खो हसत सुटली. मी म्हणालो, “काहीतरीच काय? एवढं ‘मीटू’ चाललं आहे ते पुरुष येडं बनवतात म्हणून ना?” ती म्हणाली, “हो तो मूर्खपणाचाच पुरावा आहे. तुला सांगते रजनी, जगात बहुतेक सर्व मुलींना लहानपणी कुठलं ना कुठलं मॉलेस्टेशन फेस करावं लागतं. पुरुषाला त्याच्या सेक्स्युअल अर्जेस ताब्यात ठेवता येत नाहीत. कारण मला वाटतं लहानपणापासून त्याला पुरुष असणं म्हणजे काय, हे चुकीचं शिकवलं जातं. पुरुष असणं म्हणजे डॉमिनेट करणं, स्ट्राँग असणं असं बिंबवलं जातं. कोणी मुलगा लहानपणी रडला तर त्याला ‘बायल्या’ म्हणून चिडवतात. त्यामुळे पुरुष आपल्या भावनांशी असलेली नाळ तोडून टाकतात आणि भावना नसल्या तर माणूस जनावरासारखाच वागणार ना?”
रजनी म्हणे वासनेचा, पेटतो जरी आत जाळ
आटता नाही कामा, भावनांचा डोह- खोल
क्रमश:

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link