Next
मिताली राजला का वगळले?
भूषण करंदीकर
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this story

भारतीय महिला क्रिकेटसंघाच्या टी-२० विश्वचषकातल्या कामगिरीवर भारतीय क्रिकेटप्रेमी खूश होते, मात्र उपांत्य सामन्यात भारताच्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत स्पर्धेत अपराजित असणारा हा संघ उपांत्य सामन्यात पुरता ढेपाळला. समोर इंग्लंडचा तगडा संघ होता, त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नव्हतं. तरीही भारतीय संघाची एकूण कामगिरी पाहता या सामन्यात इतकी अनपेक्षित खराब कामगिरी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी होती. त्यात या स्पर्धेत सलग दोन अर्धशतकं झळकावणारी संघाची माजी कर्णधार आणि भरवशाची फलंदाज मिताली राज हिला वगळण्यात आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यामागे नेमकं काय शिजतंय, याची चर्चा सुरू झाली आणि अभेद्य वाटणाऱ्या या संघात दुफळी असल्याचं उघड होऊ लागलं.
उपांत्य फेरीच्या सामन्यातल्या पराभवामुळे संघातले वाद चव्हाट्यावर यायला लागले. मितालीला का वगळलं याचं कारण प्रशिक्षक रमेश पोवारनं दिलं आहे. त्यांच्या मते मितालीला सांभाळणं कर्मकठीण आहे, पण मग त्याचा अर्थ तिला महत्त्वाच्या उपांत्य सामन्यातून वगळणं कितपत योग्य ठरणार होतं, बरं तिची कामगिरीही संघाला उपयुक्त होती, मग असा टोकाचा निर्णय का घेतला गेला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या वादावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडलजी यांनी या वादात पडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे मितालीला संघात स्थान मिळालं नव्हतं. मात्र उपांत्य सामन्याआधी तिला फिट घोषित करण्यात आलं होतं. असं असतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजयी संघच कायम ठेवण्याचा निर्णय प्रशिक्षक आणि कर्णधारांनी घेतला. त्यामुळे या वादात पडायचं नाही असं एडलजी यांनी सांगितलं.
उपांत्य सामन्यात पराभव झाल्यानंतर मिताली राजनं साबा करीम आणि राहुल जोहरी यांना पाठवलेल्या इमेलमध्ये धक्कादायक आरोप केले आहेत. या सामन्यातून आपल्याला वगळण्याचा निर्णय प्रशिक्षक रमेश पोवार यांनीच घेतल्याचं तिनं म्हटलंय. कर्णधार हरमनप्रीत कौरबद्दल मला काही बोलायचं नाही, मात्र मला संघातून वगळण्याचा निर्णय कळल्यानंतर तिनं या निर्णयाचं समर्थन केल्याचं कळल्यावर मला प्रचंड दुःख झालं. तसंच एडलजी यांचा मी कायम सन्मान केला, मात्र त्यांना माझ्या कामगिरीची जराही कदर नाही, असं मला सातत्यानं जाणवलं. त्यांनी मला सतत अपमानित केल्याचाही मितालीचा आरोप आहे. तसंच प्रशिक्षक रमेश पोवार यांनीही कायम टाळण्याचा प्रयत्न केल्याचं तिनं नमूद केलं आहे. जेव्हा जेव्हा मला प्रशिक्षकांशी बोलायचं होतं तेव्हा रमेश पोवार मला टाळून निघून जायचे किंवा मोबाइलमध्ये डोकं घालून बसायचे. त्यामुळे सतत अपमानित झाल्याची भावना माझ्या मनात येत होती. त्यानंतरही मी आत्मविश्वास न गमावता या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होते. माझा खेळही चांगला होत होता. तरीही मला वगळल्यानं माझं खच्चीकरण झालं आहे. मला ही स्पर्धा देशाकरता जिंकायची होती. आपण एक सुवर्णसंधी गमावली असं मला वाटतं. माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मला पहिल्यांदाच माझं योगदान महत्त्वाचं नाही, असं वाटल्याचंही मितालीनं इमेलमध्ये नमूद केलं आहे.

प्रशिक्षक रमेश पोवार यांनी स्वतःची बाजू बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि महाप्रबंधक साबा करीम यांची भेट घेऊन स्पष्ट केली. मिताली राज हिच्यासोबत असणारे मतभेद प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मान्य केले आहेत. मात्र उपांत्य सामन्यातून मितालीला वगळण्याचा निर्णय हा पूर्णपणे क्रिकेटशी संबंधित होता. यामध्ये कोणतेही वैयक्तिक हेवेदावे नाहीत, असं रमेश पोवार यांनी स्पष्ट केलं आहे. मितालीच्या स्ट्राइक रेटमुळे तिला संघात स्थान न दिल्याच्या खुलासा पवार यांनी केला आहे, मात्र मग हाच मुद्दा तिच्या आधीच्या सामन्यातल्या समावेशावेळी का जाणवला नाही, हा प्रश्न उपस्थित होतोच. खरं तर मितालीनं दोन सलग सामन्यांत अर्धशतकं झळकावून त्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. त्यामुळे इथं संशय घ्यायला जागा आहे. तसंच बड्या अधिकाऱ्याचा मितालीला संघातून वगळण्यासाठी दबाव होता असंही बोललं गेलं. त्याचंही खंडन रमेश पोवार यांनी केलं आहे.
क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर हे वाद नवे नाहीत. मिताली राजबाबत घडलेल्या प्रकारानंतर भारतीय पुरुष संघाचा माजी यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीनं त्याच्याबाबतीत घडलेला असाच एक किस्सा सांगितला. मी सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना मला अचानक एका सामन्यात बाहेर बसवलं गेलं होतं. खरं तरं त्यावेळी मी माझ्या एकदिवसीय कारकिर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होतो. मात्र कर्णधार जे सांगेल ते ऐकणं हिताचं ठरेल, असा सल्ला मला दिल्यांचं गांगुली म्हणाला. त्यानं मितालीला आशा न सोडता, प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसंच आपण आपल्यावरचा विश्वास कधीही न गमावता सातत्यानं प्रयत्न करत राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. संधी पुन्हा मिळणार यात शंकाच नाही. तेव्हा प्रयत्नशील राहा, असा मोलाचा सल्ला सौरवनं दिला आहे.

भारतीय क्रिकेटविश्वात महिला संघाची खरं तरं एवढी चर्चा यापूर्वी फारच कमी झाली होती, मात्र एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्यानंतर हा संघ आणि खेळाडू मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. आता टी-२० विश्वचषकातील कामगिरीनंही त्यांची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. मात्र त्याचवेळी दुधात मिठाचा खडा पडावा तसं झालं आणि उपांत्य सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. आणि मग लक्षात आलं की दूध नास‌लंय. याचा परिणाम संघातील इतर क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवरही होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर यातून मार्ग काढून संघाची एकी कायम ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. बीसीसीआय या प्रकरणी नेमकं कोणतं पाऊलं उचलते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link