Next
पर्वतकन्या अॅनी पेक
मिलिंद आमडेकर
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

अॅनी बर्फातून वाट काढत होती. समोरचा चढ तिला लवकर चढून जायचा होता. हातातल्या आइसअॅक्स किंवा हिमकुऱ्हाडीने ती बर्फात चाचपून बघत होती. हिमखाईत पडण्याची भीती होती. तिला तिच्या मार्गदर्शकांनी आवाज दिला. त्यांना हिमस्खलनाची भीती वाटत होती. पण सूर्य आता डोंगराच्या धारेच्या पल्याड गेला होता त्यामुळे हिमस्खलन होणार नाही असं तिला वाटलं होतं. ती पुढे जात राहिली. एका हिमखाईने तिची वाट अडवली. तिनं मागं वळून बघितलं आणि ती हादरलीच. तिच्या रोपपार्टनरनं त्याला बांधलेला दोर सोडून टाकला होता. तिला बांधलेला सुरक्षा दोर तसाच मोकळा तिच्यामागे खेचला जात होता. अशा परिस्थितीत ती जर हिमखाईत पडली असती वा बर्फावरून घसरू लागली असती तर तिला वाचवणं अशक्यच झालं असतं. आपला सुरक्षा दोर मोकळा असून आपण एकटेच आहोत, तेव्हा आपल्याला सावधपणे परतायला हवं याची तिला जाणीव झाली. दोर सोडून देण्याच्या मार्गदर्शकाच्या कृत्यामुळे ती खूप नाराज झाली होती.
ही गोष्ट आहे १९०४ सालची. म्हणजेच ११५ वर्षांपूर्वीची. दक्षिण अमेरिकेतल्या अॅंन्डीज पर्वतरांगेतील ‘माउंट सोराटा’ या शिखरचढाईच्या मोहिमेच्या वेळी ही घटना घडली होती. अॅनी स्मिथ पेक ही अमेरिकन महिला मोठ्या जिद्दीने या शिखरमोहिमेसाठी दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशात आली होती. परंतु तिच्या पुरूष सहकाऱ्यांनी तिची अगदीच निराशा केली. ती अमेरिकेला परतली.
अॅनी पेकचा जन्म १९ ऑक्टोबर १८५० रोजी अमेरिकेत ऱ्होड आयलंड येथे झाला. तिला तीन मोठे भाऊ होते. ती सर्वात धाकटी आणि एकटीच मुलगी त्यामुळे तिघे भाऊ मिळून तिच्या खूप खोड्या काढायचे. शिक्षणासाठीही ती खूप झगडली. प्राचीन इतिहास आणि ग्रीक भाषा घेऊन ती एम.ए. झाली आणि तिला पर्ड्यू विद्यापीठात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. १८८५ साली तिला युरोप फिरण्याची संधी मिळाली. जो इतिहास आपण शिकलो, तो जेथे घडला ती ठिकाणं पाहण्याची तिला संधी मिळाली. याच प्रवासात तिला स्वित्झर्लंडमधील ‘मॅटरहोर्न’ शिखर पाहायला मिळालं. त्या शिखराच्या ती अक्षरशः प्रेमात पडली. कधीतरी आपण या शिखराच्या माथ्यावर पोहचायचं हे स्वप्न तिनं मनाशी बाळगलं. ती संधी त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १८९५ साली चालून आली.
त्यासाठी ती पुन्हा युरोपात पोहोचली. मॅटरहॉर्न शिखरचढाईसाठी तिने जीन आयमोनॉड हा निष्णात मार्गदर्शक आणि त्याचा पंचवीस वर्षीय सहकारी सिल्व्हेन पेशन या दोघांची नियुक्ती केली. शिखराच्या पायथ्याशी त्यांना बराच वेळ हवामान सुधारण्याची वाट पाहावी लागली. अखेर २० ऑगस्टला त्यांनी पहाटे तीनच्या सुमारास चढाईला सुरुवात केली.
सुरुवातीला मेणबत्ती व कंदिलाच्या उजेडात ते चढत होते. सगळ्यात पुढे आयमोनॉड, मध्ये अॅनी आणि शेवटी सिल्व्हेन असे ते चालले होते. तिघांमध्ये एक दोर बांधलेला होता. थोड्या वेळाने उजाडलं, आता चढाई अधिक तीव्र होणार होती म्हणून त्यांनी एके ठिकाणी कंदील, काही सामान आणि पायघोळ झगे इत्यादी वस्तू बाजूला ठेवल्या व चढाई आरंभली. आयमोनॉडच्या पावलावर पाऊल ठेवत, कुठलीही तक्रार न करता व त्या दोघांना सहकार्य करत ती चढत होती. सकाळी ९:३० वाजता ते मॅटरहॉर्न शिखरावर पोहोचले. हे शिखर सर करणारी ती तिसरी महिला ठरली. त्या आधी मेटा ब्रेव्हूट आणि ल्युसी वॉकर या दोन अमेरिकन महिलांनी हे शिखर सर केले होते. मॅटरहॉर्न शिखरावरील यशस्वी चढाईमुळे अॅनी पेकचा उत्साह व आत्मविश्वास वाढला. तिला वाटू लागलं की ज्या शिखरांवर महिलांनी चढाई केलेली नाही अशा शिखरांकडे आपण वळलं पाहिजे. मग त्यादृष्टीने तिने आपलं लक्ष इतर शिखरांवर केंद्रित केलं. अधिक उंच शिखरावर चढाई करण्याचं आव्हान तिला पेलायचं होतं.
आता प्राध्यापिका म्हणून नोकरीत तिचं मन लागेना. ती गिर्यारोहण कसं करावं यावर व्याख्यान देऊ लागली व त्याद्वारे पुढच्या गिर्यारोहणमोहिमेसाठी पैसे जमवू लागली. १८९७ साली तिने मेक्सिकोतील १७,८८3 फूट उंचीचं ‘माउंट पोपोकाटेपटेल’ आणि १८,६६० फूट उंचीचे ‘माउंट ओरीझाबा’ ही दोन शिखरं सर केली. ही चढाई करून तिने, महिलांमध्ये सर्वाधिक उंचीवर पोहोचल्याचा दावा केला. परंतु फॅनी वर्कमनने हिमालयात १९००० फूट उंचीवर पोहोचून अॅनीचा विक्रम मोडीत काढला. तेव्हा अमेरिका खंडातलं सर्वोच्च शिखर सर करावं असा ध्यास अॅनीने घेतला. दक्षिण अमेरिकेतल्या अॅंन्डीज पर्वतरांगेत अधिक उंचीची शिखरं आहेत असं कळल्यावर तिने बोलीव्हिया आणि पेरू देशातल्या शिखरांवर मोहीम आखली. त्यासाठी लागणाऱ्या तंबू, दोर, स्लीपिंग बॅग्ज, लोकरीचे गरम कपडे, आइसअॅक्स, खाद्यपदार्थ इत्यादी सामानाची जमवाजमव करणं म्हणजे वेळकाढू काम असे. परंतु अॅनी मोहिमेच्या विचाराने भारावून गेलेली असे. पुरेसे पैसे उभे करता येतील ना, गाईड ऐनवेळी काही गडबड तर करणार नाहीत ना, याची तिला चिंता लागलेली असे. अखेर पाच वर्षांच्या तयारीनंतर १९०३ साली तिनं बोलीव्हिया देशातल्या ‘माउंट सोराटा’ या तोपर्यंत अजिंक्य असलेल्या शिखरावर चढाई करायची मोहीम आखली. हे शिखर सर करण्याचा प्रयत्न त्याआधी मॉर्टीन कॉनवे या गिर्यारोहकाने केला होता. परंतु त्याला अर्ध्या वाटेवरून परतावं लागलं होतं.. म्हणून अॅनी पेक हे शिखर सर करण्यास जास्त उत्सुक होती. मात्र गाईडनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे लेखाच्या सुरुवातीला सांगितला तो प्रसंग घडला. त्यानंतर तिने ‘हुआस्करन’ या शिखरावर चढाईचा प्रयत्न केला. परंतु खराब हवामानामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
मात्र हुआस्करन शिखर अजिंक्य राहिल्याने तिने पुन्हा एकदा त्या शिखरावर लक्ष केंद्रित केलं. पुढे तिने हुआस्करन शिखरावर सहा वेळा मोहिमा काढल्या. परंतु कधी खराब हवामानामुळे, कधी अतिबर्फवृष्टी झाल्यामुळे, कधी हिमस्खलनामुळे तर कधी मार्गदर्शकाने असहकार पुकारल्याने तिला चढाईचे प्रयत्न सोडून द्यावे लागले. त्यानंतर २८ ऑगस्ट १९०८ रोजी ती पुन्हा हुआस्करन शिखर सर करण्यासाठी सज्ज झाली. युंगे या बेसकॅम्पवरून निघताना तिच्याबरोबर रूडॉल्फ आणि गॅब्रिएल हे दोन अनुभवी स्विस गाईड आणि चार स्थानिक हमाल होते. हिमखायांमधून वाट काढत असताना अचानक एका हमालाच्या पायाखालचा बर्फ खचला आणि तो हिमखाईत पडला. त्याला दोर बांधलेला असल्याने त्याआधारे बाहेर काढण्यात आलं, परंतु त्याच्या पाठीवरच्या सामानातील स्टोव्ह त्या खाईत पडला. तो तिथून काढणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून गॅब्रिएल त्या खाईत उतरला आणि स्टोव्ह घेऊन वर आला. त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. दोन दिवसानंतर ते हुआस्करनच्या दोन शिखरांमधील खिंडीत पोहोचले. तिथे पोहोचेपर्यंत त्यांची खूप दमछाक झाली होती. जोरदार वाऱ्यात त्यांनी कसाबसा तंबू उभारला. आता वारा थांबण्याची वाट पाहायचं त्यांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी ८ वाजता उत्तर शिखराकडे प्रस्थान केलं. रूडॉल्फ आणि गॅब्रिएल यांच्याबरोबर अॅनी शिखर चढाईसाठी पुढे जायला निघाली. वाऱ्याचा जोर कमी होत नव्हता. हातापायाची बोटं पार गारठली होती. तशातच अॅनीचा चामड्याचा हातमोजा वाऱ्याने उडवून लावला. त्यामुळे तिचा डावा हात अधिकच गारठू लागला. मध्येच तो चोळत, गरम करत ते चालत होते. रुडॉल्फचे हातही गारठू लागले होते. ‘आता यापुढे मी येणार नाही’ असं तो म्हणाला. गॅब्रिएलने त्याचं सामान आपल्या पाठीवर घेतलं. अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास ते शिखरावर पोहोचले. वारा कमी होतच नव्हता. तशातच अॅनीने चारही बाजूंचे फोटो काढले. गॅब्रिएलचाही तिने फोटो काढला. फोटो काढताना तिच्या कॅमेऱ्यातून काहीतरी वेगळाच आवाज आल्याने तिने कॅमेरा ठेवून दिला. सूर्य मावळतीकडे झुकला होता. अॅनीच्या हाताच्या संवेदना कमी झाल्या होत्या. शिखराची उंची मोजण्यासाठी त्यांनी हिपसोमीटर घेतला होता. पण तो वापरण्यासाठी त्याच्या द्रव्याखाली आग पेटवणं गरजेचं होतं. गॅब्रिएलने अनेक काड्या ओढून बघितल्या, पण त्या वाऱ्याने विझल्या. तेव्हा त्यांनी प्रयत्न सोडून दिला. ते परत निघाले. रूडॉल्फ आणि अॅनीला उतरताना खूप त्रास होत होता. ते अनेकदा घसरत होते. गॅब्रिएल शर्थीने त्यांना सावरत होता. अखेर रात्री साडेदहा वाजता ते तंबूपाशी पोहोचले. त्यांच्या इंधनाचा कॅन मात्र सापडेना. तो बर्फात जिथे ठेवला होता ती जागा सापडेना. त्यामुळे न खाता, न पिता गारठलेल्या अवस्थेतच ते कसेबसे खाली उतरले.
रुडॉल्फच्या डाव्या हाताची आणि डाव्या पायाची काही बोटं हिमदंशामुळे कापावी लागली. त्यांना उंची तर मोजता आलीच नाही. ती नंतर मोजली गेली तेव्हा ती २२,२०५ फूट भरली. पेरू सरकारने त्या हुआस्करन शिखराच्या उत्तर शिखराला ‘कुम्ब्रे अॅनी पेक शिखर’ असं नाव दिलं. त्यानंतर १९११ साली अॅनीनं पेरू देशातील दोन नंबरचं २१००० फूट उंचीचं ‘नेवाडो कोरोपुना’ हे शिखर सर केलं. १९१७ साली लंडनच्या रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीचं सन्माननीय सदस्यत्व तिला बहाल करण्यात आलं. तिने आपल्या मोहिमा पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या. ‘हुआस्करन’ हे महत्वाचं शिखर पहिल्यांदा सर करणारी अॅनी पेक गिर्यारोहणाच्या इतिहासात आपलं नाव ठळक अक्षरात कोरून १८ जुलै १९३५ रोजी काळाच्या पडद्याआड गेली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link