Next
वनराज
अतुल साठे
Friday, May 31 | 02:30 PM
15 0 0
Share this story


राजाच्या आसनाला सिंहासन उगाच नाही म्हणत. अनादी काळापासून सिंह हा शक्ती व शौर्याचे प्रतीक मानला गेला आहे. पूर्वी युद्धकलेत निपुण असणाऱ्या उत्तर भारतातील घराण्यांची उपाधी किंवा आडनावे अनेकदा सिंह/सिंग अशी असतात. दुर्गादेवीचे वाहन म्हणून, महावीराच्या मूर्तीसह व अशोकस्तंभावर आपल्याला सिंह दिसून येतात. महाभारतात सिंह व वाघाची तुलना वाचायला मिळते. प्राचीन मेसोपोटेमिया व रोमन साम्राज्यांतील कोरीवकामात सिंहाच्या शिकारीची चित्रे सापडतात. रोममध्ये ग्लॅडिएटर्स या योद्ध्यांशी झुंझायला सिंह आणले जायचे. पूर्वीच्या काळी अफ्रिकेतील मासाई टोळ्यांतील तरुण स्वतःची कुवत सिद्ध करण्यासाठी एकट्याने सिंहाची शिकार करून दाखवात. मात्र, शक्तीचा उपयोग दुर्जनांच्या विरूद्धच करण्याचा बोध आपल्याला विष्णूचा चौथा अवतार - नृसिंहाकडून मिळतो.
सिंहाच्या सहा उपप्रजाती आज शिल्लक असून त्यातील पाच आफ्रिकेत, तर एक भारतात सापडते. आशियाई सिंह एके काळी ग्रीसपासून भारतापर्यंत सर्वत्र आढळत. शुष्क पानझडी व खुरटी जंगले आणि गवताळ प्रदेश हे सिंहांचे मुख्य अधिवास आहेत. भारतीय उपखंडात बलुचिस्तान, अफगाणिस्तान व हिमालयाच्या पायथ्यापासून बिहार व दख्खनच्या वेशीपर्यंत सिंह सापडत. प्राचीन काळी दक्षिण भारतातही ते असावेत. कारण दाक्षिणात्य भाषांत सिंहाला नावे आहेत. परंतु ब्रिटिश अधिकारी, राजे व नवाबांकडून अनिर्बंध शिकार झाल्याने आजमितीस फक्त गुजरातमधील गीर अभयारण्य व आसपासचा प्रदेश आणि गिरनार पर्वत येथेच सिंह आढळतात. या भागातील त्यांची एकूण संख्या चांगल्या प्रकारे वाढून आता ६५० झाली आहे.
आशियाई सिंहाचे शास्त्रीय नाव पँथेरा लिओ लिओ असे असून मराठी, हिंदी, गुजराती व संस्कृतमध्ये सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बलवान प्राण्याला लायन (इंग्रजी), शेर (उर्दू, फारसी), सावच (काठियावाडी), सिंहम (मल्याळम) व सिंघम (तमिळ) असेही म्हणतात.

समूहप्रिय व ताकदवान
सिंह समूहाने राहणारा व शिकार करणारा प्राणी असून बहुतांश वेळा ही शिकार संध्याकाळी, रात्री किंवा पहाटे केली जाते. आशियाई नर सिंह एकटा किंवा एक-दोन अन्य नरांसोबत राहतो व सामान्यपणे विणीच्या काळात मुख्य कळपाला येऊन मिळतो. अन्य वेळेस कळपात सिंहिणी व त्यांचे छावे असतात. एकावेळी सिंहिणीला २-३ पिल्ले होतात. लहान पिल्लांच्या अंगावर ठिपके असतात. आशियाई सिंहाच्या भक्ष्यामध्ये चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर व गुरे यांचा प्रामुख्याने समावेश असतो. कळपातील सिंहिणी एकत्र येऊन शिकार करतात. नर सिंह एकट्याने किंवा त्यांच्या सोबतच्या एक-दोन नरांसोबत शिकार करतो. उन्हाळ्यात भक्ष्याच्या मागोमाग सिंह नदीलगतच्या तुलनेने दाट रानात वास्तव्य करतात. लायन किंग या कार्टूनपटात प्राण्यांच्या या राजाचे आयुष्य छान प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडले होते.
एस. एच. प्रॅटरनुसार नर आशियाई सिंहाची नाकापासून शेपटीच्या टोकापर्यंत लांबी ९ फुटांहून थोडी जास्त असते. नराचे वजन साधारण १६०-१९० किलो असते. भुरकट तपकिरी रंगाच्या या मजबूत प्राण्याचे सर्वात ठळकपणे जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे नरांमध्ये मानेभोवती असणारी आयाळ. आफ्रिकी प्रजातींमध्ये ती जास्त दाट व मोठी असते, तर आशियाई सिंहाची आयाळ कमी असते. याउलट, शेपटीच्या टोकावर व पुढील पायांच्या कोपरांवर असणारे केसांचे पुंजके आशियाई सिंहामध्ये मोठे असतात, तसेच आशियाई सिंहाच्या पोटावर मोठ्या केसांची एक कडा असतो. क्वचित काही नरांना आयाळ नसते. पूर्व आफ्रिकेतील त्सावो भागातील दोन आयाळरहित नरभक्षक सिंहांची सत्यकथा ‘द घोस्ट अँड द डार्कनेस’ या चित्रपटात पाहावयास मिळते. वाघ व सिंहाच्या ताकदीची अनेकदा तुलना केली जाते. जेव्हा हे दोन तुल्यबळ प्राणी एकाच भागात आढळत, तेव्हा अभ्यासकांच्या मते अनुक्रमे दाट जंगल व विरळ जंगल अशी अधिवासांची विभागणी करून राहत असत. आज आशियाई सिंहाच्या अधिवासात बिबट्या हा एकच वाटेकरी उरला आहे.

संवर्धन

गेल्या काही वर्षांत गीरमधील अतिरिक्त सिंह आसपासच्या प्रदेशात शिरून आपला जुना अधिवास पुन्हा वापरात आणत आहेत. जुनागढ, आमरेली व भावनगर अशा तीन जिल्ह्यांत आता त्यांचा वावर आहे. भारतीय परंपरेतील ‘जगा व जगू द्या’ या उक्तीला अनुसरून स्थानिक लोकंही या विस्तारलेल्या सिंह क्षेत्रात त्यांच्याशी जुळवून घेऊ लागले आहेत. सोशल मीडियावर गीर परिसरातील काही ग्रामीण रस्त्यांवरून सिंह जात असताना शांतपणे थांबलेली वाहने आपण पाहिली असतील. काही प्रमाणात पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांकडेही स्थानिक लोक दुर्लक्ष करतात.
गुजरातमधील सिंहांचे संवर्धन ही एक यशोगाथा आहे. परंतु संसर्गजन्य रोग उद्भवल्यास एकाच वेळी सर्व सिंह बळी पडू नयेत म्हणून या भागातील काही सिंह देशाच्या अन्य एखाद्या भागांत स्थलांतरित करणे गरजेचे आहे असे म्हटले जाते. स्थलांतर करण्यासाठी राजस्थानात कुंभलगड, सीतामाता व दर्रा, गुजरातमध्ये बारडा व मध्य प्रदेशात पालपूर-कुनो या अभयारण्यांचा विविध पातळ्यांवर विचार करण्यात येत आहे. आशियाई सिंह फार छोट्या अधिवासात शिल्लक असल्याने इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने ‘संकटग्रस्त’ या वर्गात ठेवले आहे. मानव व सिंहासारखे अन्न साखळीच्या अग्रस्थानी असलेले प्राणी हे आपापल्या अधिवासातील राजेच आहेत. शेजारी राहणारे तुल्यबळ व सुज्ञ राजे कधीच एकमेकांशी पंगा घेत नाहीत कारण त्यातून दोघांचेही नुकसान होते. ही गोष्ट आपल्या पूर्वजांना चांगली समजली होती. आशा करूया आधुनिक मानवही असाच वागेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link