
‘मला संगीत नाटक अकादमीचा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला ही बातमी आली तेव्हा मी लंडनला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेलेली होते. बातमी कळल्यावर अर्थातच खूप आनंद झाला. आनंद यासाठी होता की आपण आजवर जे केलं त्याची दखल घेतली गेली, ती जाणीव सुखद होती. मी आजवर कधीच पुरस्कारासाठी काम केलं नाही. प्रामाणिकपणे काम करत आले. तरीही एवढा मोठा पुरस्कार मिळाला याचं समाधान खूप आहे’
प्रख्यात अभिनेत्री सुहासताई जोशी या पुरस्कारानंतर मुलाखत देताना दिलखुलासपणे बोलत होत्या. वय वर्षं फक्त ७२. परंतु उत्साह तोच. रंगभूमीवरची निष्ठा तीच आणि रंगभूमीवर चांगलं काहीतरी यावं, प्रेक्षकांनी ते स्वीकारावं ही आसही तीच!
तीच म्हणजे जेव्हा त्यांनी या क्षेत्रात पाहिलं पाऊल टाकलं तेव्हा होती तीच!
त्यांना खरं तर या क्षेत्राचा वारसा नाही. तरीही या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी दिलेलं योगदान लक्षणीय आहे. त्या सांगत होत्या, ‘मला गाण्याची आवड होती. गाणं शिकायचं म्हटल्यावर वडिलांनी अभिनेता आनंद इंगळेचे आजोबा, इंगळेबुवांच्या क्लासमध्ये घातलं. मी विशारदची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर विनायकबुवा पटवर्धन, केशवराव भोळे यांच्याकडेही गाणं शिकले. मात्र त्या गाण्याचा उपयोग होईल अशी नाटकं कुठे लिहिली गेली मराठीत? मला ‘संगीत मानापमान’, ‘संगीत सौभद्र’ अशासारखी नाटकं करायची नव्हती. पण ड्रामा स्कूलमध्ये आम्ही केल्या तशा ‘थ्री पेनी ऑपेरा’सारख्या संगीतिका करायला नक्की आवडलं असतं. परंतु ‘सख्खे शेजारी’मध्ये आम्ही जे काही थोडंबहुत केलं तेवढंच करता आलं. मी कथक शिकले आहे. बहिणीला घरी येऊन मास्तर शिकवत होते. तिच्याबरोबर मीही शिकले. पुढे दिल्लीला इब्राहीम अल्काझी यांच्याकडे तीन वर्षांचा अभ्यासक्रम केला. तिथे मी अभिनयाची एकमेव विद्यार्थिनी असल्यानं तिथल्या शिक्षिका रीटा कोठारी यांनी माझ्याकडून नृत्याची जबरदस्त मेहनत करून घेतली. परंतु इथे आल्यावर काय? त्याला मराठी रंगभूमीवर वावच नाही! मला खूप कळकळीनं असं वाटतं की संकुचित वृत्ती, संकुचित बुद्धी यातून लिहिणाऱ्यांनी, करणाऱ्यांनी व विशेषतः प्रेक्षकांनी बाहेर यायला हवं.’ त्यांच्या बोलण्यातून येणारी कळकळ स्वाभाविकही आहे. कारण शेवटी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या इब्राहीम अल्काझी यांच्यासारख्या कडक पण दूरदर्शी शिक्षकाच्या त्या विद्यार्थिनी आहेत. त्या सांगत होत्या, ‘पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नाटकांची गोडी लागली. माझा जोडीदार सुभाष हाही मला नाटकाच्या त्या वर्तुळातच भेटला. नाटक आवडायला लागलं. परंतु दिल्लीला जाऊन ‘एनएसडी’मध्ये शिकणं हे मात्र माझ्यासाठी केवळ स्वप्न होतं. नवऱ्याचाही तो आग्रह होता. मात्र हे जमून आलं ते केशवराव भोळे व विठ्ठलराव दीक्षित यांनी एका स्पर्धेत मी सादर केलेलं नाटक बघून… माझा अभिनय पाहिल्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की सुहासला तिथलं ते शिक्षण घेऊ द्या. आणि वडिलांनी परवानगी दिल्यानं मी तिथं गेले.’
त्या तिथे गेल्या आणि त्यांना इथला व तिथला फरक पदोपदी जाणवू लागला. तो सांगताना त्या म्हणाल्या, ‘ते शिक्षण अतिशय कडक होतं! त्यामुळे आमच्या दहा जणांच्या बॅचमधले चारजण लगेचच सोडून गेले. आम्ही सहाच जण उरलो. ‘एनएसडी’च्या इतिहासातली आमची सर्वात लहान बॅच. त्यात अभिनय शिकण्यासाठी तर मी एकटीच होते. सहाचजण असल्यानं प्रत्येकाकडे जातीनं लक्ष दिल जायचं. मला तर पुण्यात मी जे काही केलं होतं ते आणि तिथं ज्याप्रकारे शिकवलं जात होत होतं त्यात जमीनअस्मानाचा फरक होता. पुण्यात ‘पीडीए’ किंवा ‘कलोपासक’ ही सगळी चांगली, अभ्यासू मंडळी होती. रंगमंच हा त्यांचाही ध्यास होता. पण त्यांची दृष्टी प्रामुख्यानं नाट्यस्पर्धांपर्यंतच मर्यादित होती. त्यामुळे त्याच त्या प्रकारच्या भूमिका त्याच त्या लोकांच्या वाट्याला येणं, शेवटपर्यंत सगळं अनिश्चित असणं असे प्रकार व्हायचे. पण अल्काझी एखादं नाटक बसवायचं तर तीन महिने आधीपासून त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला असायचा. दिग्दर्शक सांगेल तसंच न बोलता आम्हाला विचाराला प्रवृत्त केलं जायचं, सगळ्या प्रकारच्या भूमिका करता यायला हव्यात या दृष्टीनं अक्षरशः एखादं शिल्प घडवावं तसं ठोकून ठोकून घडवलं जायचं.... त्यामुळे तिथून परत आलेली मी अगदी वेगळी घडले होते. कोणत्याही भूमिका करायच्या दृष्टीनं सक्षम होते आणि माझ्या सुदैवानं तशा वेगवेगळ्या भूमिका मला मिळाल्या. मी कॉमेडीही केली आणि गंभीर भूमिकाही केल्या.’
‘रक्त नको मज प्रेम हवे’ हे ललित कलादर्शचं नाटक हे मुंबईत आल्यानंतरचं त्यांचं पाहिलं नाटक. नंतर ‘ही श्रींची इच्छा’, मग आलं ‘आनंदी गोपाळ’ आणि त्यानंतर बॅरिस्टर... त्या नंतरही ‘अग्निपंख’, ‘कन्यादान’, ‘सावधान शुभमंगल’, ‘नटसम्राट’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘सख्खे शेजारी’सारखी असंख्य दर्जेदार नाटकं त्यांनी केली. या नाटकांबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसते. त्या सांगत होत्या, ‘यातली प्रत्येक भूमिका वेगळी होती. मला त्या करताना खूप मजा आली. ‘बॅरिस्टर’ हे जयवंत दळवींचं नाटक...पूर्णपणे आतून सोलून काढणारे....’अग्निपंख’मधली भूमिका बरीचशी इंदिरा गांधींच्या जवळ जाणारी, ‘कन्यादान’मध्ये सेवादलाची निष्ठावान कार्यकर्ती, ‘सावधान शुभमंगल’मध्ये कॉमेडी आणि गांभीर्य यांचा मिलाप. एकीकडे जगावर राज्य करायला निघणारी ती त्याच वेळी आतून कशी फसत जाते याची ती कहाणी. ते फार चाललं नाही. माझ्या मते ते अप्रतिम नाटक होतं. तसंच चेतन दातार यानं मला व किशोर कदमला घेऊन एक नाटक केलं होतं. ती आमच्या व्यवसायाचीच कहाणी होती. तेही चाललं नाही, पण अतिशय छान होतं. मला त्यामुळेच प्रेक्षकांना अगदी तळमळून विचारावंसं वाटतं, की चाकोरीबाहेरच्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद द्यायला आपण कधी शिकणार? आणि मला समजत नाही की कुणा एखाद्या नटाची क्रेझ असते म्हणून ते नाटक चालतं याला काय अर्थ आहे? नाटक चाललं पाहिजे, तेच मनात ठसलं पाहिजे. उदाहरणच घ्यायचं तर एखादा हिट संवादच नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात राहिला तर मला ते नाटकाचं अपयश वाटतं. ते नाटक पूर्णांशानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंच नाही असं वाटतं. प्रेक्षकांमध्ये पठडीच्या बाहेरची नाटकं बघण्याची प्रगल्भताही यायला हवी तरच मराठी रंगभूमी पुढे जाऊ शकेल.’
‘स्मृतिचित्रे’ हा सुहासताईंच्या आयुष्यातला एक मैलाचा दगड. त्याची चर्चा केल्याशिवाय ही मुलाखत पूर्ण होणं अशक्यच. त्याची निर्मिती त्यांची होती, नाट्यसंहिताही त्यांनी तयार केलेली होती. याबद्दल त्या म्हणाल्या, ‘स्मृतीचित्रेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्तानं त्याचा एकच प्रयोग करायचा असं आधी ठरलं होतं. ती कल्पना पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांची. कुसुम कुलकर्णी आधी ते करायच्या. ती संहिता विजय तेंडुलकर यांची होती. विजया मेहता यांनी यावर काढलेल्या चित्रपटात मी काम केलं होतं. पण मला दोन्हींचे शेवट पटले नव्हते. त्याचा शेवट लक्ष्मीबाईंच्या अखेरपर्यंत न्यायला हवा असं मला वाटत होतं. टिळकांच्या मृत्यूनंतर त्या एका अनाथालयाच्या मेट्रन झाल्या होत्या. तिथल्या मुलांना त्या एकदा समुद्रावर फिरायला घेऊन गेल्या आणि त्यातली ११ मुलं बुडून मेली... काय झाली असेल त्या बाईची मनःस्थिती? हे सगळं घेणं मला आवश्यक वाटलं. त्यामुळे, ‘स्मृतिचित्रे’ पूर्ण झाल्यावर त्यांचा जो सत्कार नाशिकमध्ये आचार्य अत्रे यांच्या हस्ते झाला तिथे ते मी संपवलं. फक्त कॉस्च्युम, एक खांब व एक लेव्हल एवढ्याच नेपथ्यावर मी ते करायची. अर्थात त्याचे प्रयोग मोजकेच झाले. कारण पुन्हा तेच. नेहमीच्या पठडीबाहेरचं! ही खंत त्यांच्या बोलण्यात वारंवार डोकावत होती.
नाटकांत जितक्या चांगल्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या तेवढ्या चित्रपटांत आल्या नाहीत. अन्य कलाकारांप्रमाणे त्या अन्य भाषिक चित्रपटांतही फारशा दिसल्या नाहीत! त्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं, ‘एक तर मी तरुण होते तेव्हा इथे वेगळ्या प्रकारचे चित्रपट केले जात होते. दुसरं म्हणजे वृद्ध सासू-सासरे, लहान मुलं हे सगळं सांभाळत मी काम करत असल्यानं काही मर्यादा होत्या. त्यामुळे मी चित्रपटात आले ती आई बनूनच आले आणि हिंदीमध्येही मी काम केलं पण तिथलं वातावरणही मला फारसं भावलं नाही. शेवटी तर धर्मेंद्रची आई व कादर खानची बायको अशी भूमिका मिळाल्यावर मी थांबलेच. त्याला काही अर्थच नव्हता आणि इतर भाषांचं म्हणाल तर जी भाषा मला बोलता येत नाही त्या भाषेत काम करणं मला जमलंच नसतं.’ आज अभिनयाचा एक मापदंड प्रस्थापित करून सुहास जोशी कृतार्थ जीवन जगत आहेत. आणि ‘ललित २०५’ सारखी मालिका असेल किंवा ‘बोगदा’सारखा किंवा येऊ घातलेल्या ‘झिम्मा’सारखा धमाल सिनेमा असेल..कामही करतायत! संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही त्या ध्यासपूर्ण जीवनावर उमटलेली पुरस्काराची मोहर आहे!
___________________________________________________________________________________________________________________
राणादाच्या गावालाही पुराचा तडाखा
सांगली-कोल्हापूर शहरांत आलेल्या महापुराचा तडाखा ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या चित्रीकरणाला बसला आहे. चित्रीकरण होत असलेल्या वसवडे गावातील घरांत, शेतांत पाणी शिरले आहे. या जलप्रलयामुळे चित्रीकरण झालेले नाही. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच चित्रीकरणाला केले जाईल. दरम्यान मालिकेत अंजलीबाईंचे काम करणारी अक्षया देवधर आणि नंदिताचे काम करणारी धनश्री काडगावकर यांनाही पुरामुळे घर सोडून हॉटेलमध्ये जावे लागले आहे.
यासंदर्भात अक्षयाशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, त्या राहत असलेल्या इमारतीमध्ये सोमवारी संध्याकाळपासून पाणी साचायला सुरुवात झाल्याने रात्रभर त्या जाग्याच होत्या. मंगळवारी भल्या पहाटे हार्दिकला फोन करून सर्व परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर हार्दिक व इतर सहकारी धावत आले. या दोघींनी आवश्यक ते सामान, चार कपडे बॅगेत भरून त्या बाहेर पडल्या. इमारतीबाहेर साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी पोहोचल्या. इमारतीमधील अनेक नागरिकही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाल्याचे अक्षयाने सांगितले.
कोल्हापूरवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीबाबत हार्दिक जोशी यानेही तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हार्दिक आणि या मालिकेतील इतर सदस्य शहरातील हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. त्याने सांगितले की, म्ी मुंबईचा असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे हे नवीन नाही. २००५ ला आलेल्या पुराच्या अनुभवही होताच. परंतु कोल्हापूर शहरावर ओढावलेली ही आपत्ती खरोखरच भीषण आहे. आर्थिक नुकसानही मोठे असून पाणी ओसरल्याशिवाय त्याचा अंदाज येणे ही कठीण आहे. आठ ते नऊ फूट पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा बंद ठेवला आहे. मालिकेच्या क्रू मेंबरपैकी काहींंची घरे पाण्याखाली गेली आहेत. मात्र, त्यांच्या घरातील सदस्यांना आधीच सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मालिकेचे चित्रीकरण होणाऱ्या वसगडे गावातही पाणी शिरले आहे. ज्या शेतात चित्रीकरण होते तिथला ऊस पाण्याखाली गेला आहे. सुदैवाने ज्या वाड्यात चित्रीकरण होते तिथे पाणी नसले तरी आसपासच्या परिसरात पाणी असून ते ओसरल्यानंतरच चित्रीकरण सुरू होईल.

होम मिनिस्टर’च्या स्वातंत्र्यदिन विशेष भागात कनिका राणे
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या अधिकाऱ्याच्या वीरपत्नीने वर्षभरातच लष्करात भरती होण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अभ्यास केला… परीक्षेत अव्वल गुण मिळवत ती आता लष्करात जाऊन देशसेवेसाठी सज्ज झाली आहे… ही वीरपत्नी म्हणजे मेजर कौस्तुभ राणे यांची अर्धांगिनी कनिका राणे. या वीरपत्नीच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करण्यासाठी आणि तिच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी ‘होम मिनीस्टर’चा स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रसारित होणारा विशेष भाग कनिका राणे आणि त्यांच्या कुटुंबासह चित्रित केला आहे. भारतीय सैन्याच्या ३६ रायफल बटालियनमध्ये मेजर असलेले कौस्तुभ राणे यांना ७ ऑगस्ट२०१८ रोजी दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झाले. पतीनिधनाचे दु:ख धैर्याने सोसत कनिका कौस्तुभ राणे यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेत पतीचे देशसेवेचे व्रत पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. लष्करात भरती होण्यासाठी काय तयारी केली, अभ्यास कसा केला, त्यांना घरच्यांची साथ कशी मिळाली याबरोबरच मेजर कौस्तुभ राणे यांच्या आठवणींना उजाळा ‘होम मिनिस्टर’मध्ये कनिका राणे यांनी दिला आहे. हा विशेष भाग पाहायला विसरू नका फक्त ‘झी मराठी’वर गुरुवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वाजता.