Next
आवाजाची दुनिया
Vijay Kuvalekar
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

आजचा दिवस हा ‘दृक्-श्राव्य वारसादिन’ म्हणून पाळला जात आहे. खरे तर आपण मोबाइलच्या माध्यमातून सध्या दिवसभर कुठले ना कुठले व्हिडिओ पाहत असतो किंवा मोबाइलवरच एफएम रेडिओ किंवा गाणी ऐकत असतो. आधुनिक विज्ञानाने दृक्-श्राव्य माध्यमाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग करून टाकले आहे. मात्र एकेकाळी हे माध्यम इतके सहज उपलब्ध नव्हते. त्यासाठी खास वेळ काढायला लागायचा व थोडे श्रमही घ्यावे लागायचे. ज्या काळात टीव्ही नव्हता, त्या काळात फक्त चित्रपटगृहांतच सिनेमे पाहावे लागत. ते सारखे पाहणे परवडत नसले तरी काही शौकिन ते वेळ काढून व पैसे खर्चून पाहत असत. गाणी ऐकण्याचे त्या काळात रेडिओ हे सहजसोपे माध्यम होते, पण तेही सर्वत्र उपलब्ध नव्हते. अगदी सुरुवातीच्या काळात रेडिओ फक्त पैसेवाल्यांच्या घरीच उपलब्ध असत. पुढे ट्रान्झिस्टरचा शोध लागल्यावर रेडिओची उपलब्धता, व्याप्ती व चलता वाढली. ग्रामोफोन, रेकाॅर्ड प्लेअरही फक्त श्रीमंताकडेच असत. दृक्-श्राव्य माध्यमांचा त्या काळापासून आजपर्यंतचा हा प्रवास मनोरंजक तर आहेच, थक्क करणाराही आहे. हा सर्व इतिहास या ‘दृक्-श्राव्य वारसादिना’निमित्त ‘झी मराठी दिशा’ या अंकातील खास विभागातून जागता करीत आहे. तो वाचून अनेकजण स्मरणरंजनात जातील तर नव्या तरुणपिढीला काही आश्चर्यकारक गोष्टी कळतील. सध्या दृक्-श्राव्य माध्यमे ही अतिशय परिणामकारक व ताबडतोब सर्वत्र प्रसार पावणारी झाली आहेत. ती सहज उपलब्धही आहेत, त्यामुळे ती अधिक जबाबदारीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. जे जबाबदारीने ती वापरतात त्यांच्यातील सर्जनशीलतेला त्यामुळे वाव मिळतो आहे. ती वेबसीरिजच्या माध्यमांतून दिसत आहे. परंतु या माध्यमाचा दुरुपयोगही बराच होत आहे. त्याबाबतची जाणीव करून देण्यासाठीच हा ‘दृक्-श्राव्य वारसादिन’. येत्या काळात विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात आणखी काय चमत्कार करणार आहे, याची उत्सुकता आहे. परंतु हे बदल करताना या क्षेत्रात मोठे योगदान देणारे तंत्रज्ञ, कलाकार यांच्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने दृक्-श्राव्य माध्यमे सर्व बंधनातून मुक्त केली आहेत, त्यामुळे गाण्यांची, चित्रपटांची चोरी सहज शक्य झाली आहे. तिला आळा घालण्याचे उपाय मात्र नवे तंत्रज्ञान शोधू शकलेले नाही. या क्षेत्रातील सर्जनशीलतेला चालना द्यायची असेल तर या बौद्धिक संपदेला संरक्षण मिळवून देणे आवश्यक आहे. या विषयावरचा विशेष विभाग कसा वाटला हे वाचकांकडून जाणून घेण्यास ‘झी मराठी दिशा’ उत्सुक आहे. त्यामुळे वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. आता लवकरच दिवाळी येईल. हीपण आवाजाची दुनियाच आहे. हा कर्णकर्कश असा आवाज आहे… फटाक्यांचा. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायूप्रदूषण टाळण्यासाठी सरकार व न्यायालये सतत प्रयत्न करीत असतात, त्याला सर्व लोकांनी साथ देणे आवश्यक आहे. दिवाळीचा आनंद घ्यायलाच हवा, रोशणाई व फटाक्यांची आतषबाजी हे दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते टाळून दिवाळी व्हावी असे म्हणणे नाही, पण मुंबई व अन्य मोठ्या शहरांतील जीवन, वायू व ध्वनी यांच्या प्रदूषणामुळे गुंतागुंतीचे झाले आहे. त्यात फटाक्यांमुळे भर पडू नये एवढीच अपेक्षा आहे. दसऱ्याच्या रावणदहनाच्या वेळी जो भीषण अपघात झाला, तसे अपघात पुन्हा होऊ नयेत असे वाटत असेल तर फटाक्यांचा वापर जपून झाला पाहिजे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link