Next
क्रीडानगरी... पुण्यनगरी
आशिष पेंडसे
Friday, January 04 | 03:00 PM
15 0 0
Share this story

ऑनलाइन विक्री करत असलेल्या कंपन्यांचे उच्चाधिकारी पुण्यात विशेष बैठकीसाठी एकत्रित झाले होते. त्याचे कारणही तसेच विशेष होते. क्रीडासाहित्याच्या विक्रीच्या आलेखावर मेट्रो शहरांव्यतिरिक्तची सर्वांत अव्वल बाजारपेठ म्हणून पुण्याने क्रमांक पटकावला होता. त्याचेच कारण शोधण्यासाठी आणि नेमकी हे शहर व क्रीडाबाजारपेठ काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ते उच्चाधिकारी पुण्यात आले होते.
त्यांच्याशी संवाद साधताना मीसुद्धा विचारात पडलो. खरेच, नेमका क्रीडानगरी म्हणून पुण्याचा लौकिक का आहे? त्यातच, अशी बाजारपेठ नेमकी कशी विकसित झाली? पुण्याची क्रीडासंस्कृती नेमकी कशी आहे? त्यानंतर पुढील काही दिवसांमधील विचार आणि निरीक्षणांच्या स्मॅशेसमधून पुण्यनगरी क्रीडानगरी कशी याचा उलगडा पुन्हा नव्यानेच मला होत गेला.
पत्रकार या नात्याने पुण्यातील क्रिकेटचे सर्वच्या सर्व आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची व वार्तांकन करण्याची संधी मिळाली होती. इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका अशा सर्वंच देशांचा त्यामध्ये समावेश होते. तसेच, दुलीप व देवधर करंडकाचे सामनेदेखील पाहात असे. केवळ मीच नाही, तर हजारो क्रीडाप्रेमी त्यासाठी गर्दी करत. कपिलदेव-गावसकर-विश्वनाथपासून नवोदित राहुल द्रविड, क्रिकेटमहर्षि दि. ब. देवधरांच्या हस्ते सचिनने स्वीकारलेला पहिला मॅन ऑफ मॅच पुरस्कार... अशा कितीतरी आठवणी मनात घर करून आहेत. लहानपणी क्रिकेटच्या शिबिरांमध्ये आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर क्रीडासंस्कार रुजवला. कालांतराने फूटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून पुण्यातील फूटबॉलसंस्कृती विकसित होताना, आणि ती घडवण्याचीदेखील संधी मिळाली.
अशा क्रीडासंस्काराची रुजवात झालेली माझ्यासारखी पिढी आता पालक म्हणून तोच संस्कार पुढे नेत आहे. परिणामी, सध्याच्या पुण्यात सकाळ-संध्याकाळी नजर टाकली, तर वॉकिंग-जॉगिंग-सायकलिंग करणारे पुणेकर, बॅडमिंटन-टेनिसची रॅकेट खांद्यावर अडकवून कोर्टवर धाव घेत असलेले पुणेकर, योगाभ्यासाची मॅट खांद्यावर नेत ध्यानस्थ होणारे पुणेकर, गजबजलेल्या टेकड्या, जॉगिंग पार्क, बारमाही ओसंडून वाहणारे स्विमिंग पूल अशा अनेक माध्यमांमधून पुणेकर फिटनेस फंडा आपल्या जीवनशैलीचा भाग बनवत क्रीडासंस्कृती आचरणात आणत आहेत. मॉलच्या टेरेसवर किंवा छोट्या मैदानातदेखील फाइव्ह अ साइड फूटबॉलच्या कृत्रिम हिरवळीच्या मैदानांच्या संख्येने गेल्या दोन वर्षांतच शंभरी ओलांडली आहे. महाराष्ट्र ओपन एटीपी टेनिस स्पर्धा, फूटबॉलची इंडियन सुपर लीग आणि पूर्वी आय-लीग, प्रो कबड्डी लीग, प्रो बॅडमिंटन लीग आदींच्या माध्यमातून पुण्याने सर्वंच खेळांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा-खेळाडूंचे कौशल्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले आहे.
महाराष्ट्रीय मंडळाच्या माध्यमातून कॅप्टन शिवरामपंत दामले आणि शिवाजीमंदिरसारख्या संस्थांनी त्याकाळच्या पेठांमध्ये तंदुरुस्ती व क्रीडासंस्कृती रुजवली. प्रत्येक मुख्य रस्त्यावर असलेली एखादी तरी तालीम ही व्यायामाचा वस्तुपाठ घालून देणारी ठरत होती. तसेच, खो-खो, कबड्डी-मल्लखांब आदी पारंपरिक खेळांची मैदानेदेखील मुला-मुलींनी भरभरून वाहत होती. त्यामुळेच, नृत्य-नाट्य-चित्र आदी कलांच्या जोडीला मैदानी संस्कारदेखील पुणेकर विद्यार्थ्यांवर घडत होता. त्या काळी शाळांना प्रशस्त मैदानेदेखील होती. परिणामी स्वच्छ हवेत मनमुक्त बागडण्याचा आनंददेखील मुलांना लुटता येत होता. आजही इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील शिक्षणसंस्थांना प्रशस्त मैदानांचे वरदान लाभले आहेच.
दिवंगत रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिरासदार यांची गोकुळ वस्ताद तालीम, काका पवार यांचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आता आंतरराष्ट्रीय मल्ल घडवत आहेत. तसेच, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग आदी ऑलिंपिक खेळांमधील निम्मा भारतीय संघ पुण्यातच प्रशिक्षण घेतो आहे.
या क्रीडासंस्कृतीला पुण्यनगरीमध्ये १९९४-९५च्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमुळे मोठी भरारी मिळाली. १९८२च्या एशियाडप्रमाणे दिमाखदार आयोजन, शुभंकर म्हणून राजू हा वाघाचा बछडा, ‘कम ऑन राजू कम ऑन’ म्हणत नृत्य-क्रीडाविष्कार घडवणारे हजारो मुले-मुली अशा भारावलेल्या वातावरणात पुण्याने क्रीडानगरी म्हणून अधिकृत स्थान मिळवले. या स्पर्धेसाठी महाळुंगे बालेवाडी येथे उभारण्यात आलेली श्री शिवछत्रपती क्रीडानगर पुण्यनगरीच्या या क्रीडावैभवात मानाचा तुरा ठरली. आजही अनेकविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या माध्यमातून बालेवाडीत क्रीडासंस्काराचा गजर होत असतो.
पुणे मॅरेथॉनने १९८०-९०च्या दशकापासून पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात मानाचे स्थान दिले. अर्थात, मुंबई-दिल्ली, लंडन-बोस्टन आदी शहरकेंद्रित मॅरेथॉनप्रमाणे या धावण्याच्या उत्सवाचे मार्केटिंग करण्यात पुणेकर कमी पडले. परंतु सध्या जवळपास दर आठवड्यालाच होत असलेल्या छोट्या-मोठ्या मॅरेथॉन आणि उपनगरांमधील अनेकविध रनिंग ग्रुपच्या माध्यमातून पुणेकर धावण्याचा हा संस्कार प्रत्यक्ष आचरणात आणत आहेत.
दहा वर्षांपूर्वी, २००८ साली झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धांच्या यजमानपदाच्या माध्यमातून पुण्याच्या क्रीडासंस्कृतीचा आणखी एक गौरव झाला. पुणेकरांनीदेखील ही स्पर्धा यशस्वी करून हा लौकिक सार्थ ठरवला. साईना नेहवाल आदी भारतीय क्रीडासंस्कृतीचा नवीन अध्याय घडवत असलेल्या क्रीडापटूंचा उदय हा याच स्पर्धांच्या माध्यमातून आणि पुण्यामधूनच झाला, याचा विशेष अभिमान पुण्याला आहे.
आता ऑलिंपियन गगन नारंग शूटिंगरेंज, निखिल कानेटकर बॅडमिंटन प्रशिक्षण संस्था, हॉकी-बॉक्सिंग, कुस्तीची राष्ट्रीय शिबिरे, महाराष्ट्रातील आघाडीची क्रीडाप्रबोधिनी आदींच्या माध्यमातून ही क्रीडानगरी वर्षभर क्रीडाविकासाचा गोल साध्य करत असते.
खेळांचा प्रचार-प्रसार हा क्रीडासंस्कृती रुजवताना मनोमन व्हावा लागतो, तसाच तो पायाभूत सुविधांच्या माध्यमातूनदेखील प्रत्यक्षात उतरावा लागतो. आज इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात क्रीडासंकुलांची संख्यादेखील अधिक आहे. कमीअधिक प्रमाणात त्यामध्ये सुविधांची उपलब्धता किंवा वानवा ही आहेच, पण तो आपल्या व्यवस्थापकीय-प्रशासन संस्कृतीचा एक भागच आहे ना! तालमींची जागा आता खासगी पंचतारांकित जिमने घेतली आहे. तसेच, उपनगरांमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळी भरणारे क्रीडाप्रशिक्षणवर्ग हे क्रीडासंस्कृतीची बॅटन नवीन पिढीपर्यंत पोचवत आहेत. स्पोर्ट्स बार, क्लब्जमधून इंग्लिश प्रीमियर लीग, स्पेनमधील ला-लिगा आदी आंतराष्ट्रीय फूटबॉल सामन्यांच्या स्क्रीनिंगसाठी पाचशे-हजार युवक-युवती रोनाल्डो-मेस्सीचा फूटबॉल नियमितपणे एन्जॉय करतात.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये पुणे विद्यापीठातील मुले-मुली खेळाडू पदकविजेती कामगिरी करत आहेत. तसेच, आंतरविद्यापीठीय क्रीडास्पर्धांच्या विजेतीपदाची ढाल-करंडक पुणे विद्यापीठातच विराजमान होत आहे. राज्य शासनाच्या शिवछत्रपती आदी क्रीडा पुरस्कारांमध्ये पुणेकर खेळाडूंचेच वर्चस्व राहिले आहे.
याच क्रीडासंस्कृतीच्या जोरावर २०१६ मध्ये यशस्वीपणे साकारलेले पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडाप्रदर्शन हे पुण्याच्या क्रीडासंस्कृतीची पोचपावती देणारे ठरले.
आता जानेवारीमध्ये पुण्यात खेलो इंडियाचा नारा देत राष्ट्रीय क्रीडामहोत्सव होत आहे. जवळपास सात हजारांहून अधिक मुले-मुली आणि अडीच-तीन हजारांहून प्रशिक्षक पुण्यनगरी-क्रीडानगरीमध्ये महिनाभरासाठी डेरेदाखल होत आहेत. त्यांच्या माध्यमातून देशभरातील पुढची पिढी या क्रीडासंस्कारावर आधारित संवाद साधेल. त्यामधूनच पुढील किमान दोन दशकांची क्रीडासंस्कृती रुजेल, यात शंका नाही.
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत, तालमींपासून पंचतारांकित जिमपर्यंत आणि गल्लीतील क्रिकेट-फूटबॉल, विट्टी-दांडू, लगोरी, गोट्यांच्या डावांपासून श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी वा गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय सामन्यांपर्यंत... पुण्यनगरी क्रीडानगरीचा हा आविष्कार असाच बहरत राहणार, यात शंकाच नाही!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link