Next
परिचय काळ मोलाचा!
मंगला मराठे
Friday, July 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

समीर आणि नेहाचे लग्न ठरले. पसंती झाली, बैठक झाली, लगेचच्या रविवारी घरातल्या घरात साखरपुडा झाला. लग्नही लवकरात लवकर उरकून घ्यावे असे घरच्या मंडळींना वाटत होते. मात्र हॉल आणि मुहूर्त यांची जुळवाजुळव करता करता दहा महिन्यांनंतरची तारीख ठरली. मंडळी जरा नाराज झाली. पण थांबण्याखेरीज पर्याय नव्हता. नेहा व समीर भेटू लागले. एकमेकांच्या घरी येऊ-जाऊ लागले. प्रत्येक वेळी नेहाचे आईवडील तिला विचारीत, “कसा आहे ग समीर, वागाबोलायला बरा आहे ना? समजूतदार आहे ना? तुमचं पटतंय ना? त्याच्या घरातले तुझ्याशी कसे वागले? माणसं चांगली आहेत ना?” तिकडे समीरच्या घरूनही हेच प्रश्न येत होते.

दोघांनाही एकमेकांचा चांगला परिचय होऊ लागला. त्यांना एकमेकांच्या स्वभावांचा; आवडीनिवडींचा अंदाज आला. दोघे एकमेकांच्या घरातही रुळायला लागले. नेहाच्या आईवडिलांना बरे वाटले. “मुलीला सासरी जाताना जड जाणार नाही.” नाही म्हटलं तरी समीरच्या घरच्यांनाही थोडे बरे वाटले की ‘एक मुलगी एकदम घरातली होऊन येणार. आधीच चांगली ओळख झाली आहे ते बरे झाले.’ समीर आणि नेहाला तर हा काळ खूपच मोलाचा वाटला. रोमँटिक तर होताच. शिवाय एकमेकांना समजून घ्यायची संधी मिळाली. 

आता कुणीही म्हणेल की आता असे वाटते आहे तर मग तेव्हा सगळेजण घाई का करत होते? कारण एकच- आपल्याकडे तशीच पद्धत आहे! एकदा लग्न जमले की लवकरात लवकर ते उरकून घ्यायचे. पालक इतकी घाई करतात कारण त्यांना भीती असते की मध्ये वेळ काढला आणि काही कुरबुरी होऊन लग्न मोडले तर…! आणखी एक भीती असते ती मुलांच्या तरुण वयाची. मुलं एकमेकांना भेटत राहिली, त्यांचे शारीरिक संबंध आले तर…! पण या दोन्हींत खऱ्या  भीतीपेक्षा बागुलबुवा जास्त आहे. 

घाईघाईने लग्न उरकण्यापेक्षा लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंत किमान सहा-आठ महिन्यांचा वेळ मिळाला तर तो खूप मोलाचा ठरतो. दोघे एकमेकांना भेटत राहिले, एकमेकांच्या घरी जात राहिले की औपचारिकता थोडी कमी होते. औपचारिकता कमी झाली की मनात रुजलेल्या प्रवृत्ती वागण्यात दिसू लागतात. नेहमीच्या भावना, प्रतिक्रिया यायला लागतात. उदाहरणच द्यायचे झाले तर, फिरायला कुठे जायचे, काय खायचे, सिनेमाला जायचे का, अशा गोष्टींवर दुमत होऊ शकते. वरवर बघायला या गोष्टी क्षुल्लक दिसतात. पण अशा वेळी जोडीदाराच्या प्रतिक्रिया काय येतात, कशा येतात, यावरून त्याच्या स्वभाववृत्ती कळतात. आपल्या मतांचा कितपत स्वीकार होतो, हे कळते. घराशी परिचय झाला की घरातल्या मंडळींच्या वागण्याच्या पद्धती, घरातले नातेसंबंध अशा गोष्टी लक्षात येतात. आपल्या कल्पनेतील आणि स्वप्नातील सगळे कुणालाच मिळत नाही. मात्र आपल्याला काय मिळणार आणि काय नाही, त्याचा अंदाज या काळात येतो. जे मिळणार नाही त्याशिवाय आपले चालेल का, ती तडजोड आपल्याला झेपेल का, याचा अंदाज येतो. नवे नाते आपल्याला सुखाचे वाटेल की नात्याचे ओझे वाटेल, याचा अंदाज येतो. 

या सगळ्यांचा मुलींना खूप उपयोग होतो. कारण नवीन घरी जाऊन नांदायचे म्हणून मुलीला काही गोष्टी सांगण्याची, शिकवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. मुलाला मात्र काहीच सांगितले जात नाही. कारण ‘तो त्याच्याच घरात राहणार, त्याला काय फरक पडणार?’ पण प्रत्यक्षात लग्नानंतर मुलाचेही आयुष्य खूप बदलते. त्यालाही अनेक नवीन नात्यांना सामोरे जायचे असते. आजवर अनोळखी असलेल्या व्यक्तीबरोबर सगळे शेअर करायचे असते. त्याच्यासाठीही हा परिचय खूप मोलाचा असतो. दोघांचे सूर जुळले तर दोघे विश्वासाने संसाराला सुरुवात करू शकतात. 

दुर्दैवाने एखाद्याच्या बाबतीत उलटही होऊ शकते. एकाला किंवा दोघांनाही असेही वाटू शकते की आपले इथे जमणार नाही. थोडा परिचय झाल्यावर मुलाला व्यसन असल्याचे लक्षात येते, एखादा आजार लक्षात येतो. दोघांपैकी एक जण अतितापट, अति-हेकेखोर असा असेल तर दुसऱ्याला वाटते की, आयुष्यभर सतत दबून, घाबरून जगणे आपल्याला शक्य नाही. काही वेळा दोघांच्या जीवनशैली, दृष्टिकोण खूप वेगवेगळे असल्याचे लक्षात येते. इतक्या थोड्या सहवासातही नात्याचे ओझे वाटू लागते. अशा बाबतीत ‘सह’जीवनाला मार्ग उरत नाही. असे काही झाले तर त्यांना लग्नाच्या निर्णयाचा फेरविचार करता येतो आणि तो जरूर करावा.

अशी वेळ आलीच तर ती मुलांबरोबर पालकांचीही कसोटी असते. पालक मुलांना लग्न मोडण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. ‘हळूहळू ठीक होईल. लग्नानंतर माणसं बदलतात. थोड जमवून घ्यायचे.’ वगैरे वगैरे. पण इथे पालकांनी मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे असते. सगळ्यांनी बसून यावर बोलावे. काही गैरसमज असल्यास दूर करण्याचे प्रयत्न करावेत. मार्ग निघाला तर उत्तम. नाहीतर शांतपणे प्रस्ताव मागे घ्यावा. पुढे आयुष्यभर डोक्याला डोके आपटत, फरफटत जगण्यापेक्षा वेळीच मागे फिरलेले केव्हाही चांगले! मुलींच्या पालकांना हे जास्त कठीण जाते. हा विचार त्यांच्या बुद्धीला पटला तरी मनाला पटणे अवघड होते. त्यांची ही भावना अगदीच अनाठायी आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्याकडे एखाद्या मुलीचे लग्न ठरून मोडले की दुसऱ्या  ठिकाणी जमणे कठीण होऊन बसते. हे चुकीचे असले तरी ते आपले वास्तव आहे. त्यामुळे मुलगी लग्न मोडायला निघाली तर पालक हरप्रकारे तिला थोपवतात. समजवतात. समाजाचा धाक दाखवतात. भावनिक भीतीही घालतात. पण मुलीचे ठरलेले लग्न मोडण्यास तयार होत नाहीत. त्यांना मुलीची काळजी वाटत नाही असे नाही, पण सामाजिक संकेतांपुढे ते अगतिक होतात. 

यालाही एक महत्त्वाचे कारण आहे. मुलाचा, पालकांचा दृष्टिकोनही याला कारणीभूत आहे. बरेचजण ज्या मुलीचे लग्न मोडले आहे अशा मुलीचे स्थळ विचारात घेत नाहीत. मुलीचे ठरलेले लग्न मोडले म्हणजे मुलीत काहीतरी दोष असला पाहिजे असे धरून चालतात. ‘ही मुलगी समजूतदार नाही’ असा ग्रह बनवतात. विषाची परीक्षा नको म्हणत ते स्थळ बाजूला करतात. एखादे लग्न मोडते त्याचा हा एकच अर्थ लावायचा आपल्याला माहीत आहे. एक लग्न मोडते तेव्हा एका मुलीचे आणि त्याच वेळी एका मुलाचेही लग्न मोडते. स्वभावाचा, वागण्याचा दोष मुलाचाही असू शकतो. मग दोघांवर वेगवेगळे शिक्के का मारायचे? 

दुसरी गोष्ट अशी की, दोघांपैकी एकजण वाईट असला तरच लग्न मोडते असे नाही. दोघेही आपापल्या जागी बरोबर असू शकतात. केवळ आपली व्यक्तिमत्त्वे खूप वेगळी आहेत, आपण एकत्र प्रवास करू शकणार नाही, हे लक्षात आल्यामुळे त्यांनी लग्न मोडले, असे होऊ शकते. दुसऱ्या  मिळत्याजुळत्या व्यक्तिमत्त्वाच्या जोडीदाराबरोबर ते सुखाचा संसार करू शकतात. म्हणूनच आधीचे लग्न मोडण्याची कारणे जरूर जाणून घ्यावीत. सांगणाऱ्यानेही ती प्रामाणिकपणे सांगावीत. शक्य तितकी सगळी चौकशी करावी, पण नकारात्मक पूर्वग्रह अजिबात बाळगू नये. आणि पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला तर उपकार केल्याची भावना कधीही मनात येऊ देऊ नये. समोरची व्यक्ती आपल्याला पसंत पडते म्हणून आपण होकार देतो. तिथे उपकार वगैरेचा काही प्रश्नच असू शकत नाही. 

लग्न ठरल्यावर ते होण्यापूर्वी मोडते, तेव्हा पालकांवर आणखी एक जबाबदारी येते - पुन्हा लग्न जमविण्याची घाई न करण्याची. मुलीचेच नाही तर मुलाचे पालकही अशा वेळी घायकुतीला येतात, दुसऱ्या  ठिकाणी लग्न जमवून लवकरात लवकर ते उरकून टाकायला बघतात. असे न करता मुलांना पहिल्या धक्क्यातून सावरायला वेळ द्यायला हवा, तरच दुसरा निर्णय शांत मनाने विचार करून घेणे शक्य होईल.

लग्न झाल्यावर घटस्फोट घेण्यापेक्षा किंवा विटलेल्या मनाने आयुष्य ढकलत राहण्यापेक्षा लग्नापूर्वी लक्षात आलेली चूक वेळीच सुधारणे केव्हाही श्रेयस्कर. आपला रस्ता चुकला तर परत फिरण्यात शहाणपण असते ना! लग्नपूर्व परिचय काळात आपला रस्ता बरोबर आहे की नाही हे पारखण्याचा अवधी मिळतो, तो जरूर घ्यायला हवा. खरेतर, हा अवधी प्रत्येकाला मिळायला हवा. जी जोडी चुकीची असेल त्यांना चूक सुधारायला अवसर मिळतो, तर नेहा- समीरसारख्या जोडीला हातात हात गुंफून सुरेल सुरुवात करता येते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link