Next
मुंबईला फायदा खडूसपणाचा
नितीन मुजुमदार
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

तब्बल एका तपानंतर मुंबई क्रिकेटसंघाने एकदिवसीय क्रिकेटची राष्ट्रीय स्पर्धा जिंकून विजय हजारे करंडकावर नाव कोरले. एकेकाळी भारतीय क्रिकेटवर मुंबईचे जबरदस्त वर्चस्व होते. अगदी दादा म्हटले तरी चालेल. एकदिवसीय क्रिकेटच्या प्रस्थाआधी राष्ट्रीय वर्चस्वाचा एकमेव मानदंड मानली गेलेली एकमेव स्पर्धा म्हणजे रणजी करंडकस्पर्धा होती. या रणजी करंडकस्पर्धेत १९५५-५६ पासून १९७६-७७ पर्यंत २२ पैकी २० वेळा मुंबईने अजिंक्यपद मिळवले. यावरून मुंबईची दादागिरी लक्षात येते. परंतु काळाच्या ओघात इतर संघही प्रबळ झाले आणि १९८५-८६ ते १९९२-९३ दरम्यान सलग आठ रणजीस्पर्धांमध्ये मुंबईचा संघ अजिंक्यपदापासून दूर राहिला. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये परिस्थिती मुंबईसाठी तुलनात्मकदृष्ट्या अधिक चांगली आहे. गेल्या २६ वर्षांमध्ये मुंबईने ११ वेळा जेतेपद मिळवले आहे. गतवर्षी मात्र मुंबई संघाला रणजी, एकदिवसीय व टी-२० अशा  तीनही स्पर्धांमध्ये धक्का बसला. रणजी व एकदिवसीय स्पर्धांत मुंबई संघ उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे कर्नाटक व महाराष्ट्राकडून पराभूत झाला होता. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही मुंबईने चारपैकी तीन सामने गमावले होते. त्यामुळेच मुंबई क्रिकेटसाठी यंदाच्या हंगामाची एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धा जिंकून केलेली सुरुवात खूपच महत्त्वाची आहे. मागील दशकात मुंबईचा विकेटकीपर म्हणून अनेक हंगाम खेळलेल्या विनायक सामंतने मुंबईचा प्रशिक्षक म्हणून जेमतेम तीन महिन्यांपूर्वी धुरा सांभाळली. हजारे करंडक जिंकल्यावर ‘झी मराठी दिशा’शी खास बातचीत करताना विनायक म्हणाला, “प्रशिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर माझ्याकडे वेळ खूप कमी होता. सुरुवातीला मी संघाच्या फिटनेसवर भर दिला. एक महिन्याचे शिबीर घेतले. हैदराबादमध्ये स्पर्धा खेळताना पावसाने दोन दिवस खाल्ले, तेव्हा त्यावेळेचा सदुपयोग आम्ही टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटिजसाठी केला.” दरम्यान, आयपीएलचा प्रभाव वाढतोय. त्यामुळे किमान एक पूर्ण इनिंग खेळायला मिळेल अशा स्पर्धांवरदेखील भर दिला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंच्या संघात असण्याचाही खूप फायदा झाला, असेही त्याने आवर्जून सांगितले.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईची अवस्था दिल्लीच्या १७७ धावांचा पाठलाग करताना ७.५ षटकांत चार बाद ४० अशी होती. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव हे चार खंदे फलंदाज बाद झाले होते. अशा वेळी अनुभवी आदित्य तरे व गतवर्षी सर्व फॉरमॅटमध्ये खोऱ्याने रन्स केलेला सिद्धेश लाड यांच्या शतकी भागीदारीमुळे मुंबईने सामन्यासह स्पर्धा जेतेपदावर मोहोर उमटवली. मोलाच्या ७१ धावा केल्यामुळे आदित्य ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरीदेखील ठरला. अंतिम सामन्यात सिद्धेश लाडचे अर्धशतक थोडक्यात हुकले. गतवर्षीच्या मोसमातील उत्तम कामगिरीसाठी सिद्धेशचा नुकताच स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईच्या वार्षिक सोहळ्यात ‘रणजी क्रिकेटर ऑफ दी इयर’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. सिद्धेश त्याच्या आदित्यबरोबरच्या शतकी भागीदारीबद्दल बोलताना म्हणाला, “नवदीप सैनी व कुलवंत खेजरोलिया या भरात असलेल्या जोडीचा स्पेल खेळून काढायचा असे आम्ही ठरवले होते व त्यात यशस्वीही झालो.”  या स्पर्धेत मुंबईने खेळलेल्या जवळपास सर्वच सामन्यांत एकतर्फी विजय मिळवला. अंतिम सामन्यात १७७ धावांचे लक्ष्य गाठताना चार बाद ४० ही अवस्था अथवा मुंबईच्या २४६ धावांचा पाठलाग करताना दोन बाद १४३ अशा मजबूत स्थितीवरून पंजाबची झालेली घसरगुंडी असे प्रसंग अपवादात्मकच. मुंबईचा प्रशिक्षक विनायक सामंतच्या म्हणण्यानुसार, “ही आश्वासक सुरुवात चांगलीच, मात्र अजूनही मोठा व महत्त्वाचा हंगाम बाकी आहे. रणजी करंडकस्पर्धा ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.” मुंबईचा संघ रणजीस्पर्धेतील आपला पहिला सामना १ नोव्हेंबर रोजी रेल्वेविरुद्ध खेळेल.n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link