Next
हसाहसवा
पुरुषोत्तम अत्रे
Friday, September 06 | 04:00 PM
15 0 0
Share this story

खरा क्रिकेट मॅच पाहतोय!


मिर्झा बेग नावाचे मराठी कवी आहेत. त्यांनी हास्यसम्राटच्या मंचावर सांगितलेला हा भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचा किस्सा.
एकदा एका शाळेत शाळातपासनीस येतात. एका विद्यार्थ्याला हे एकामागोमाग पाच प्रश्न विचारतात. त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्या विद्यार्थ्याला येत नाही. तेव्हा संतापलेले शाळातपासनीस त्या मुलाला म्हणतात,
“चल, शाळेबाहेर जा. आजपासून तू शाळेत यायचं नाही.”
विद्यार्थी म्हणतो,
“कोण? मी? अहो, मी तर कधीच शाळेत येत नाही. आज डमी म्हणून आलोय. या शाळेचा खरा विद्यार्थी रमेश तिकडे क्रिकेटची मॅच पाहतोय.”
शाळातपासनीस रागारागानं शिक्षकाला ओरडतात. म्हणतात,
“आजपासून मी तुम्हाला निलंबित करतो आहे.”
शिक्षक म्हणतात,
“कोणाला? मला? अहो, मी तर डमी... खरा शिक्षक तिकडे मॅच पाहतोय.”
रागानं लाल झालेले शाळातपासनीस तरातरा चालत हेडमास्तराच्या केबिनमध्ये जातात आणि त्यांना म्हणतात,
“अहो, तुमचा विद्यार्थी डमी आहे... तुमचा शिक्षक डमी आहे... आता मी तुमच्यावरच कारवाई करतो.”
तर हेडमास्तर म्हणतात,
“माझ्यावर खुशाल कारवाई करा. मी तरी कुठे खरा आहे. हेडमास्तर तिकडे मॅच पाहतोय...”
त्यावर शाळातपासनीस मोठमोठ्यानं हसू लागतात आणि म्हणतात,
“तरी बरं झालं. शाळा तपासायला मी आलो आहे. खरे शाळातपासनीस तिकडे मॅच पाहत आहे...”
---------------------------------------

साहेबांचा मूड


एक सुशिक्षित, सुंदर दिसणारा तरुण वेगानं गाडी चालवत जाताना दिसला. ट्रॅफिक हवालदारानं त्याला अडवलं.
तरुण म्हणाला, “साहेब, माझे ऐका.”
तर ट्रॅफिक हवालदार म्हणाला, “शांत बस. काहीही बोलण्याची गरज नाही.”
तरुण म्हणाला, “पण साहेब...”
हवालदार म्हणाला, “एक शब्द बोलू नको. तुला थेट कोठडीत टाकणार आहे.”
हवालदारानं त्या तरुणाला आणून कोठडीत टाकलं.
थोड्या वेळानं तो त्या कोठडीत जवळ आला आणि त्याला म्हणाला,
“तरुणा, तू नशीबवान आहेस. साहेब आज त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेले आहेत. तिथून येणार आहेत. त्यामुळे खूश असतील. ते तुला माफ करतील.”
तरुण म्हणाला,
“साहेब, मघापासून तुम्ही मला बोलू देत नाही. आता तरी बोल बोलू द्या.”
आता शांत झालेला हवालदार म्हणाला,
“बोल, काय म्हणायचं तुला?”
“साहेब, तुमच्या साहेबांचा मूड चांगला नाही, वाईट झालेला असणार...”
हवालदार म्हणाला,
“का रे, का?”
“साहेब, कारण मी त्यांच्या मुलीचा होणारा नवरा आहे...”
---------------------------------------

कौतुक
एक ग्रामीण बाई एसटीच्या प्रवासात दुसऱ्या बाईला आपल्या नवऱ्याचं कौतुक सांगत होती.
मागच्याच महिन्यात तब्बल पाचशे रुपये मनीऑर्डरनं पाठवले. परवा फोन आला शेजाऱ्यांच्या फोनवर. तेव्हा सांगत होते, चांगली नोकरी मिळाली आहे. अख्ख्या ऑफिसात कुणाला वर न्यायचं आणि कुणाला खाली उतरवायचं ते माझ्या हाती आहे, म्हणत होते. माझे बाबा गिरणीत फोरमन होते. आता नवराही महत्त्वाच्या पदावर लागलाय. लिफ्टमन झाला...’
---------------------------------------

अशुभ योग


एकदा एका नाटकाचा प्रयोग सुरू होता. सत्तरीचे नानाराव शेजारच्या माणसाला म्हणाले,
“किती बकवास नट आहे हा!”
शेजारी बसलेला माणूस म्हणाला,
“नाही आवडला का तुम्हाला? माझा मुलगा आहे.” कसनुसा चेहरा करून नानाराव पुन्हा नाटक पाहू लागले. मग थोडं सावरल्यावर शेजाऱ्याला म्हणाले,
“तसा त्याचा दोष नाही म्हणा, दिग्दर्शकच गाढव आहे. त्याला काम करून घेता आलं पाहिजे ना!”
शेजारी म्हणाला,
“काय चुकलं त्यात दिग्दर्शकाचं? मीच दिग्दर्शक आहे.”
नानांचा चेहरा पुन्हा कसनुसा झाला. मग पुन्हा नाटक बघण्यात गुंतल्यासारखं त्यांनी दाखवलं आणि विचार करत बसले.
काहीतरी सुचल्यासारखं पुन्हा त्याला म्हणाले,
“माफ करा, थोडा विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं आहे, दिग्दर्शकाचा आणि नटाचा दोष नाही. या नाटककार गाढवानं सगळागोंधळ घालून ठेवलाय.”
त्यावर शेजारी म्हणाला,
“माफ करा... पण तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला नाही ऐकवल्या तर बरं होईल. हे नाटक माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे.”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link