Next
‘# मी टू’ चा झंझावात
संपादकीय
Friday, October 12 | 01:30 PM
15 0 0
Share this story

जगभरात सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच या चळवळीने गेल्या काही दिवसांपासून भारतात झंझावाताचे स्वरूप घेतले आहे. आता हा झंझावात जगावरील पुरुषी वर्चस्वाचा अंत करूनच थंडावण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. खरे तर जगात स्त्री आणि पुरुषांची संख्या जवळजवळ समसमान आहे, पण जगावर पुरुषी वर्चस्व आहे व या वर्चस्वाचा वापर जगात निम्म्या संख्येने असलेल्या स्त्रियांच्या शोषणासाठी व्हावा ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. ‘मी टू’ चळवळीने वेग घेतल्यानंतर पुरुषांच्या स्त्रीविषयक वर्तनाच्या ज्या भयानक वस्तुनिष्ठ कहाण्या पुढे येत आहेत त्या पाहता, हे जग हे पुरुषांनी आजवर चालवलेले जंगलराज्य होते, हे स्पष्ट आहे. कारण स्त्री ही मालमत्ता, उपभोग्य वस्तू, विजेत्याने जिंकून ताब्यात घेण्याची वस्तू असेच तिचे स्थान होते. अर्थात सरसकट सर्व पुरुष या काळात जंगली श्वापदाप्रमाणे वागत होते असे नाही आणि सर्व स्त्रिया अत्याचार सहन करणाऱ्या मुक्या बाहुल्या होत्या असे नाही. परंतु बहुसंख्य पुरुषांच्या स्त्रियांबाबतच्या वर्तणुकीची तुलना जंगली श्वापदाशी होणे अपरिहार्य आहे. ही तुलना जंगली श्वापदाशी करणे हा त्या श्वापदांवर अन्याय आहे कारण तो त्याच्या मादीवर असे अत्याचार करीत नाही. भारतात गेल्या काही दिवसांपासून पुरुषांकडून झालेल्या लैंगिक छळाच्या ज्या कहाण्या पुढे येत आहेत व त्यात अडकलेल्या ज्या मान्यवरांची नावे पुढे येत आहेत ते पाहता हे फक्त हिमनगाचे दिसणारे टोक आहे, हे स्पष्ट आहे. अत्यंत उच्च व मानाच्या पदावर असणाऱ्या व्यक्ती समाजात उजळ माथ्याने मिरवत असताना बंद खोल्यांतच नाही तर अगदी सार्वजनिक ठिकाणीही आपल्या महिला सहकाऱ्यांशी अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने वागत होत्या, हे पाहिल्यानंतर जगात जी माणसे चांगली म्हणून प्रसिद्ध आहेत ती खरोखरीच चांगली आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागते. खरे तर स्त्री-पुरुषसंबंध हा काव्याचा विषय आहे, त्यातले माधुर्य, त्यातील गोडी, त्यातला आनंद ही निसर्गाची एक अमोल अशी देणगी आहे. या संबंधावरच या जगाची सर्जनशीलता अवलंबून आहे. मात्र काही पुरुषांनी त्यात हावरटपणा आणून हे संबंध विकृतीच्या पातळीवर आणून ठेवले आहेत. आज स्त्रिया त्यांच्यावरील पुरुषी अन्यायविरुद्ध पेटून उठल्या आहेत, यात कदाचित ओल्याबरोबर थोडे सुकेही जळत असेल, पण त्याला आता इलाज नाही आणि ते टाळताही येणार नाही. काही लोक यातही वर्गवाद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘मी टू’ ही चळवळ उच्चभ्रू स्त्रियांची आहे, खालच्या वर्गातील स्त्रिया, अजाण बालिका हजारो वर्षांपासून पुरुषी अत्याचाराच्या बळी ठरत आहेत, त्याविरुद्ध आजवर कुणीच काही बोलले नाही, वगैरे आक्षेप घेतले जात आहेत, पण आता ज्या स्त्रिया त्यांचे अनुभव उघड करून सांगत आहेत, ते पाहिल्यानंतर ज्या स्त्रियांचे जग सुरक्षित आहे असे आजवर वाटत होते तेही कधीच सुरक्षित नव्हते हे धक्कादायक सत्य जगापुढे आले आहे. मोठे नट, संपादक, राजकारणी, मंत्री व उच्चपदस्थ हे त्यांच्या महिला सहकाऱ्यांशी जे लैंगिक वर्तन करीत होते, ते पाहून ‘दिसतं तसं नसतं’ या उक्तीवर सहज विश्वास बसेल. ही चळवळ अशीच चालू राहिली व तिला यश प्राप्त झाले तर हे जग आज जसे आहे तसे राहणार नाही, ते पूर्ण बदलेले असेल. विज्ञानातील नवे शोध आणि आर्थिक स्वातंत्र्य यामुळे स्त्रीचे पुरुषावरील अवलंबित्व कमी झाले आहे, हे पुरुषांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘मी टू’ चळवळीचा संदेश एकच आहे, पुरुषांनो स्वत:ला बदला. स्त्री तुमची सहकारी, साथीदार होईल, पण… तुमची बटिक किंवा गुलाम होणे तिला मान्य नाही.                            
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link