Next
मानपानाचं ओझं
मंगला मराठे
Friday, September 06 | 03:00 PM
15 0 0
Share this story


लग्न म्हणजे सहजीवनाची सुरुवात.  अनेक नवीन नात्यांची सुरुवात.  लग्नसोहळा म्हणजे खरेदी, नटणं-सजणं, मौजमजा, धमाल असं सगळंच असतं. लग्न म्हणजे मानपानाचा खेळही असतो. पूर्वीच्या लग्नांतल्या गोष्टी आपण ऐकतो- वरमाय रुसून बसली; नवरदेव घड्याळ हवं म्हणून हट्ट धरून बसले; कोणालातरी जेवायला आधी बोलावलं नाही म्हणून ते रागावले आणि अख्खी पंगत खोळंबून राहिली... आता शहरी सुशिक्षित लोकांच्या लग्नात अशा गोष्टी फार क्वचित होतात. मात्र याचा अर्थ मानपानाच्या कल्पना धुऊन गेल्यात असं नाही, पण लोक त्या वेळेला अडवून न धरता कार्य निभावून नेतात.
लग्नकार्य आटोपलं की मानपानाच्या सिंहावलोकनाचा एक कार्यक्रम प्रत्येक जण आपापल्या जागी आपापल्या गटात करत राहतात. हा विषय आपापसात चघळत राहतात. ‘त्या’ माणसांवर रितभात नसल्याचा, मुद्दाम अपमान केल्याचा शिक्का मारला जातो. माणसं मनात राग धरून राहतात. रागात कधी कधी या जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातात. त्यामुळे मानपानाच्या वस्तू, साड्या, कपडे हे लग्नाच्या तयारीतलं सर्वात मोठं ‘ओझं’ असतं. ‘नंतर कोणी नाव ठेवायला नको’ असं म्हणत ही खरेदी होते.
यात मुलीच्या सासरच्या मंडळींना करायचे अाहेर हा महत्त्वाचा विषय असतो. मुलीच्या आईवडिलांना वाटतं की नंतर त्यांना काही बोलायला जागा राहू नये, आपल्या मुलीला काही ऐकावं लागू नये. यात लग्नानिमित्त द्यायच्या भेटवस्तू असतात, त्याशिवाय काही पारंपरिक ठरीव गोष्टी असतात. मुलाच्या आईसाठी गुळाची ढेप, साबण, पावडर, काजळ अशा प्रसाधनसाधनांचा संच, वगैरे. अशा आज निरर्थक वाटणाऱ्या वस्तूही असतात.
‘वरपक्षाचे मानपान’ हा लग्नसोहळ्यातला लग्नविधींइतकाच महत्त्वाचा भाग असतो. पूर्वी मानपानाच्या चोख याद्या केल्या जायच्या. हल्ली असे कुणी करत नाहीत. शिवाय वरपक्षही मुलीच्या घरच्या माणसांना अहेर करतात. हल्ली कोणी रागावून कार्याचा खोळंबा करत नाहीत. पण सगळं यथास्थित मिळालं तर मुलाकडच्यांना ते हवं असतं. त्यात त्यांचा इगो सुखावतो. ‘मान मागून मिळत नाही तो कर्तृत्वानं मिळवावा लागतो,’ हे इतरवेळी बोलायचं, पण लग्नाच्या वेळी नाही. हे मुलाचं लग्न आहे, यांच्या पोटी मुलगा जन्माला आला आणि व्याह्यांच्या पोटी मुलगी. यांचा मुलगा यांच्याकडे राहणार, त्यांची मुलगी यांच्याकडे येणार, म्हणून हे डावंउजवं! पोटची पोर तिकडे नांदायला जाणार म्हणून मुलीचे आईवडील वरपक्षाला आंजारतगोंजारत राहतात; स्वत:कडे कमीपणा घेतात.
‘आता काळ बदलला आहे. वरपक्ष-वधुपक्ष असं काही राहिलं नाही’ असं म्हणतात. हे खरं असलं तर मुलीच्या घरचे मुलाच्या घरच्यांच्या आधी जेवतात का? समजा, तसे जेवले तर कुजबुज होईल की नाही? आता मानपान, पाय धुणं, अमकी ओटी, तमका अहेर हे हौस म्हणून करायचं असं म्हणून करतात. मुलीच्या आईवडिलांना हौस असते. मुलाच्या आईवडिलांना काही करण्याची हौस नसते. फक्त करून घेण्याची असते. आणि त्यांच्या मुलीच्या लग्नात ते एकदम हौशी होतात. ही काय जादू आहे? जादू नाही. तेव्हा त्यांचा वधुपक्ष असतो.
हे डावंउजवं सोहळ्यापुरतं नाही, तर कायम असतं. मुलाच्या लग्नात ‘वरमाय’ म्हणून मिरवणाऱ्या मुलाच्या आईच्या डोक्यावर तिच्या स्वत:च्या सासरच्या मंडळींचं, स्वत:च्या जावयाचं आणि त्याच्या माणसांचं ओझं असतं. ‘त्यांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर नंतर ऐकवतील.’
त्यानंतर येतं ते आपल्याच नातेवाईकांचं मानपान. ही घरातल्या कार्यानिमित्त प्रेमाची भेट असते. त्यात परत गट असतात. काही माणसं जवळच्या नात्यात असतात आणि जिव्हाळ्याचीसुद्धा असतात. काही लौकिक अर्थानं जवळच्या नात्याची नसतात, पण जिव्हाळ्याची असतात. अशा जिव्हाळ्याच्या मंडळीना जरा महागडी भेटवस्तू दिली जाते. काहींचं नातं जवळचं असतं पण फारसा संपर्क, सहवास नसतो. अशा मंडळींसाठीही तेवढाच खर्च करायचा आणि त्यांना आयतं मोठेपण द्यायचं यजमानानांच्या मनात नसतं. म्हणून अशी माणसांची प्रतवारी करून त्याप्रमाणे त्यांचा मान करतात. त्यामुळे एक तर हे काम किचकट होतं, शिवाय एक प्रश्न मनात येतो की आपल्या मुलाचं/मुलीचं लग्न झाले, त्यासाठी ही मंडळी आवर्जून आली म्हणून त्यांचं आतिथ्य करायचं, आपला आनंद व्यक्त करायचा यासाठी ही भेटवस्तू देतात. त्यात अशी कशाला प्रतवारी करायची? अशानं चघळायला एक विषय तयार होतो. लौकिकदृष्ट्या पहिल्या वर्गात नसूनही त्या गटात घेतलेली माणसं प्रचंड सुखावतात. काहींसाठी स्वत:चं महत्त्व दाखवून द्यायची सोय होते.
तिसरा वर्ग म्हणजे आलेल्या प्रत्येकाला काहीतरी छोटीशीतरी भेटवस्तू द्यायची. आलेल्यांची सन्मानानं पाठवणी करावी हा उद्देश असला तरी त्याची पद्धत फारच गंमतशीर असते. कुणातरी एका ज्येष्ठ बाईवर ही जबाबदारी असते. बाहेर निरोप घ्यायला आलेल्या प्रत्येकाला त्या बाई सांगतात- “जाताना वहिनींना भेटून जा.” मग त्या वाहिनी खोलीत समोर येईल त्या प्रत्येक बाईला कुंकू लावून पोत्यातली वस्तू तिच्या हातात ठेवतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आता हे होत नाही, पण बाकी ठिकाणी लग्नात आजही हे दृश्य दिसतं. यजमानांनी ‘कोणी तसंच गेले नाही ना?’ याची चिंता करायची. वाटप-वहिनींनी खोलीतच या कामात गुंतून राहायचं आणि इतकं करूनही दिलेली वस्तू म्हणजे बहुतेकंच्या घरात खोगीरभरती होते. प्रत्येक लग्नाला जाऊन आल्यावर आपण या पद्धतीवर टीका करतो. “हा सगळा फालतूपणा आहे. सगळ्या देणं-घेणं प्रकाराला फाटा दिला पाहिजे,” असं बरंच काही बोलतो. आणि आपल्या घरात लग्न उभं राहिलं की आपणही कोणी आपल्याला नाव ठेवायला नकोत, म्हणून निमूटपणे तेच सगळं करतो.
पूर्वी सकाळी नातेवाईकांना बोलावून लग्न लावायचे आणि संध्याकाळी बाकी परिचितांसाठी स्वागतसमारंभ, अशी पद्धत होती. आता अर्ध्या दिवसाच्या सोहळ्यात सगळ्यांना एकावेळी बोलावलं जातं. पूर्वी लग्नात अहेर घेण्याची पद्धत होती. या अहेरात चालू फॅशनच्या एकाच प्रकारच्या अनेक वस्तू येत. त्याचं काय करायचं म्हणत अहेराची पद्धत बंद झाली. आपणही रिकाम्या हातानं लग्नाला जाऊ लागलो. या गोष्टी कालानुरूप म्हणून आपल्याला पटल्या आणि आपण स्वीकारल्या. सुरुवातीला खटकल्या असतील, आता त्याच योग्य आणि सोयीच्या वाटत आहेत.
तशीच सवय देणं-घेणं, मानपान न करण्याची होऊ शकेल. हे बाहेरून कुठून रिमोटनं होणार नाही; आपल्यालाच करावं लागणार. आपण हे सहज करू शकतो. त्यासाठी फक्त मोठेपणाच्या दिखाऊ कल्पनांमधून बाहेर यायला हवं. कुणी काय दिलं, कधी दिलं, असंच का दिलं, अशा चर्चा करणं बंद करायला हव्या. लोक काय म्हणतील, हा ताण दूर केला तर अनेक निरर्थक गोष्टी आपोआप बाद होतील. कार्यातले टेन्शन जाईल. नवीन नात्यांची सुरुवात निकोप आनंदसोहळ्यानं होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link