Next
निवड - मुलांची की पालकांची?
मंगला मराठे
Friday, February 08 | 05:00 PM
15 0 0
Share this story

एक गृहस्थ एका वधूवर मेळाव्याचा अनुभव सांगत होते. हॉल भरलेला होता, पण त्यात तरुणाई कमीच दिसत होती. तरुण मुलामुलींपेक्षा पालकांची संख्या खूपच जास्त होती, असे वाटले की हा वधूवर मेळावा आहे की पालकसभा? कार्यक्रमाचे स्वरूप असे होते- आयोजकांनी मंचावरून एकेका फॉर्ममधली माहिती वाचून दाखवली. प्रत्येकाचे वय, उंची, शिक्षण, जात, रास, गोत्र वाचून दाखवले. जमलेल्या पालकांनी आपल्या मुलांना ‘चालू शकतील’ अशी स्थळे लिहून घेतली. जी मोजकी मुले आली होती, त्यांनी पुढे येऊन स्वत:ची ओळख करून दिली, मात्र त्यांनीही आपले नाव गोत्र, उंची, पगार अशीच वरवरची माहिती सांगितली. पालकांनी ती लिहून घेतली. नोंदणी झालेली बहुतेक स्थळे सुशिक्षित, सुस्थित होती. त्यातील अनेक मुले उच्च शिक्षितही होती. मनात सहज एक विचार डोकावला- जनरेशन गॅप, जनरेशन गॅप म्हणतात, पण इकडे बघा कुठे आहे जनरेशन गॅप (?) पालकांची व मुलांची वधूवर संशोधनाची पद्धत तीच तर आहे!’

  वधूवर मेळावे आयोजित करणाऱ्या प्रत्येकाला पालकांकडून काही ठरावीक प्रश्न येतातच. ‘फक्त आम्हीच आलो तर चालेल का? मुलगा/मुलगी यायला तयार नाही.’ ‘मुलाला/मुलीला एकटे कसे पाठवणार?’ इत्यादी. जणू काही मेळाव्याचे आयोजक तिथल्या तिथे मुलांची लग्ने लावून टाकणार आहेत.

विवाहेच्छुक मुलामुलींबद्दल आणि त्यांच्या पालकांबद्दल मनात अनेक प्रश्न उभे राहतात-
  •  पालकांना आपली मुले अजून लहान आहेत असे वाटते का?
  •  पालकांना मुलांबद्दल विश्वास वाटत नाही का? मुले पटकन काहीतरी निर्णय घेऊन टाकतील असे वाटते का?
  • पालकांना निर्णय स्वत:च्या हातात ठेवायचा आहे का?
  •  ज्या मुलांना रुमालसुद्धा स्वतःच्या चॉइसचा लागतो, ती आयुष्याच्या जोडीदराबाबत इतकी उदासीन कशी?
  • ह्या मुलांचा पालकांच्या निवडीवर खरोखरच १०० टक्के विश्वास आहे का?
  • या मुलांना स्वतः निर्णय घेण्याची भीती वाटते का?
  • आपली निवड पालकांच्या पसंतीस आली नाही तर पुढे ते मदतीचा हात आखडता घेतील आणि आपल्या शिरावरची जबाबदारी वाढेल, असे वाटते का?
  • आपण स्वतः पुढे येणे, निवड करणे आगाऊपणा केल्यासारखे दिसेल, आपल्याबद्दल लोकांचे मत वाईट होईल, अशी भीती या मुलांना वाटते का?
   
यातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘होय’ अशीच येतील. इतकी शिकलेली, जगात स्मार्टली वावरणारी ही मुले लग्नाच्या बाबतीत अशी कोशात का जातात? की पालक त्यांना सहभागी करून घेत नाहीत?

 बहुतेक पालकांची कल्पना अशी असते की मूल तीन वर्षांचे झाले की त्याला बोट धरून बालवाडीत न्यायचे, तसे त्यानंतर पंचवीसएक वर्षांनी बोहल्यावर न्यायचे. मुलाचे लग्न करून त्यांचा संसार मांडून देणे, ही पालकांना आपली सांसारिक जबाबदारी वाटते. मुलांच्या लग्नाचा निर्णय मुलांवर सोडणे त्यांना धोक्याचे वाटते आणि मुलांनी परस्पर निर्णय घेणे त्यांच्या पचनी पडत नाही. “मुलं  वरवरच्या दिखाऊ गोष्टींना भुलून चुकीचा निर्णय घेतील... मुलांचं वय वेडं असतं... सिनेमा आणि टीव्हीच्या पगड्यामुळे मुलांच्या डोक्यात भलत्या कल्पना घुसतात... त्यांना कधी कशाची क्रेझ वाटेल ते सांगता येत नाही... आपण संसारात इतके उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत, आपल्या मुलाचं भलं आपल्यालाच जास्त कळतं...” अशी मते पालक मांडतात. 

    संसाराचा अनुभव असणारे पालक मंडळात स्थळे किंवा फॉर्म भरायला आले की पहिला निकष असतो- मुलासाठी गोरी, सुस्वरूप, समंजस मुलगी हवी. मुलीसाठी उच्च शिक्षित आणि सुस्थित मुलगा हवा. वधूवर मंडळांचे फॉर्म भरायला काही अगदी मोजके अपवाद सोडल्यास फक्त पालकच येतात आणि तिथल्या तिथे फॉर्म भरून देतात. ‘आता स्थळ बघू या’ याखेरीज त्यांचे त्यांच्या  मुलांशी काही बोलणे झालेले नसते. फॉर्म भरताना नाव पत्ता, जात, उंची, शिक्षण अशी माहिती ते पटापट लिहितात आणि ‘स्वत:विषयी अधिक माहिती’ आणि ‘जोडीदाराबाबत अपेक्षा’ हे दोन रकाने भरताना हमखास थबकतात. मुलगी समंजस, मिळून मिसळून राहणारी असावी... मुलगा समजून घेणारा, निर्व्यसनी असावा... असे लिहून मोकळे होतात!   
 
प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपण आपल्या मुलाचे मन जसे जपले तसे पुढेही जपले जावे. त्यांना लग्नानंतर फारशा तडजोडी कराव्या लागू नयेत. एकुलते एक मूल असणाऱ्या पालकांची मन:स्थिती तर आणखी विचित्र झालेली असते. एकुलती एक मुलगी असेल तर तिची पाठवणी पालकांना खूपच त्रासदायक वाटते आणि मुलगा असेल तर त्याच्या बाबतीतील पझेशन त्रास देते.

पालक स्वत:च्या नजरेतून मुलांच्या संसाराचे चित्र रेखाटतात. मुलांना नेमके काय हवे आहे, त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत याची पालकांना अनेकदा कल्पना नसते, कारण ह्यावर बोलणे झालेले नसते. अनेकदा मुलांनीसुद्धा स्वत:च्या आयुष्याचा काहीतरी विचार केलेला असतो. त्यांच्या विचारात त्रुटी असतीलही. त्या पालकांच्या विचारातसुद्धा असतात. (प्रत्येक माणसाच्या विचारात आहेत.) एकमेकांशी संवाद, चर्चा होत राहिल्या तर या त्रुटी कमी होतात.  कितीही चिकित्सा केली तरी अगदी १०० टक्के मनासारखे कुणीच मिळत नाही. मात्र ‘जुळवून घेतलं की सगळं जुळतं. फक्त समोरच्याची जमवून घेण्याची इच्छा हवी...’ असे म्हणण्यापेक्षा आपल्या मुलाला/मुलीला स्वत:ला काय चालवून घेता येईल, काय नाही, हे त्यांचे त्यांना ठरवण्याचा वाव त्यांना देणे गरजेचे आहे.
   लग्न ठरवण्यातील प्रत्येक पायरीवर मुलांशी संवाद साधणे, त्यांना सहभागी करून घेणे फार आवश्यक आहे. या संवादातून मुले नकळत अनेक गोष्टी शिकतात. एका परीने हा संवाद ही मुलांना त्यांच्या संसारासाठी मिळालेली शिदोरी असते.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link