Next
अभिनयाची कळी खुलली !
योगिता राऊत
Friday, August 31 | 03:00 PM
15 0 0
Share this story

माझं बालपण वसईतील. माझे बाबा उदय भावे इंजिनिअर तर आई हेमांगी भावे अंधेरीतील बर्फीवाला हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. आई शिक्षिका असली तरी अभ्यासात मात्र मी खूपच साधारण होते. माझ्या बाबांची नोकरी फिरतीची असल्यानं ते सतत बाहेरच असायचे. त्यामुळे घरात फक्त मी, आई आणि आजी-आजोबाच. मी साधारण ४-५ वर्षांची  असताना बाबांचं पोस्टिंग मुंबईतच असल्यानं एकदम खुश होते. 

शाळेचा पहिला दिवस आजही मला आठवतो. शाळा सुटल्यावर मी स्कूल बसमधून बिल्डिंगच्या गेटजवळ तर उतरले पण घरी गेलेच नाही. घरचे शोधाशोध करायला लागले. दोन तास सगळीकडे शोधाशोध सुरू होती. घरच्यांचा जीव टांगणीला लागला होता. का कुणास ठाऊक, शेजारच्या वाकणकर आजींना विचारूया म्हणून आई- बाबा त्यांच्या घरी गेले. तर समोर डायनिंग टेबलवर मी मस्त पुरणपोळी खात बसलेले त्यांना दिसले. मला पाहिल्यावर सगळ्यांच्याच जीवात जीव आला. लहानच असल्यानं त्यावेळी ओरडा बसला नाही. पण सूचना मात्र भरपूर मिळाल्या.

मी एअरहोस्टेस झाले!
 वसईतील नाझरेथ गर्ल्स स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर रुपारेल महाविद्यालयातून तत्वज्ञान हा विषयात बी. ए. केलं. शाळा किंवा महाविद्यालयात कधीही मी अभिनय केला नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन अभिनयाच्या प्रांतात मी येईन असा विचारही कधी केला नव्हता. बारावी झाल्यानंतर एअरहोस्टेसचा कोर्स केला. कोर्सदरम्यानच पेपरमधील जाहिराती बघून इंटरव्ह्यू देत होते आणि बी. ए.च्या पहिल्या वर्षाला असतानाच नामांकित एअरलाईन्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथं चार वर्षं एअरहॉस्टेस म्हणून काम केलं. बी. ए.च्या शेवटच्या वर्षाला परीक्षेसाठी एक महिन्याची सुट्टी हवी होती. परंतु ती न मिळाल्यानं अखेर मी नोकरीच सोडली. आणि त्यांनतर थोड्या आरोग्यविषयक तक्रारीमुळे मला पुन्हा या क्षेत्रात नोकरी करणं शक्य नसल्यानं मी घरीच होते. यादरम्यान आईनं वृत्तपत्रात आलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत माझं नाव नोंदवलं. या स्पर्धेच्या शेवटच्या राऊंडपर्यंत मी पोहोचले होते. पण पुढे बॅड लक! 

सुरुवातीचा काळ संघर्षाचा 
स्पर्धेदरम्यानच काही हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. अर्थात या भूमिका छोट्याच असल्यानं  एक-दोन दिवसातच चित्रीकरण संपायचं. सलग दोन वर्षं हे असंच सुरू होतं. चांगल्या भूमिका मिळत नसल्यानं अभिनय हा आपला प्रांत नसल्याचं हळूहळू जाणवू लागल्यानं नैराश्य येऊ लागलं. सुदैवानं याच काळात एका मराठी मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. या मालिकेत माझी नकारात्मक भूमिका होती. ही भूमिका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही. मात्र सुरुवातीला भूमिका साकारताना खूप मेहनत घ्यावी लागली.  विशेष करून भाषेवर. वसईत आमच्या आजूबाजूला कॅथलिक समाज असल्यानं आणि माझं सर्व शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झाल्यानं मराठी फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे शब्दोच्चार अचूक यावेत, बोलण्यात भाषेचा लहेजा यावा यासाठी मेहनत घ्यावी लागली. घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्यानं अभिनयातील बारकावे, कॅमेऱ्यासमोर कसं वावरायचं, कुठला अँगल द्यायचा अशा तांत्रिक गोष्टी ही प्रयत्नपूर्वक शिकले. त्या मालिकेत दिग्गज कलाकारांसोबत काम करताना मनात कुठेतरी भीती असायची. कधी कधी दिग्दर्शकही माझ्यावर चिडायचे. खूप वाईट वाटायचं. परंतु त्यावेळी जर त्यांनी माझ्या चुका दाखवल्या नसत्या तर आज माझ्यात हा बदल झालाच नसता. अनुभवातून माणूस बरंच काही शिकतो, हेच मी अनुभवलं…

मोनिकाचं कौतुक झालं 
ही मालिका संपल्यानंतर लगेचच मला ‘झी मराठी’वरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेसाठी ऑडिशनला बोलावलं. ज्या दिवशी मला ऑडिशनला बोलावलं होतं त्याच दिवशी सणसणून ताप आला. धड उभंही राहता येत नव्हतं, त्या टीममघधील संबंधित व्यक्तीला माझी अवस्था कळवली. त्यानं मला ‘सेल्फ टेस्ट’चा पर्याय दिला. तापामुळे तरतरलेले डोळे, मलूल झालेला चेहरा अशा अवस्थेत सेल्फ टेस्ट दिली. दोन दिवसांत निवड झाल्याचं कळलं आणि आठवडाभरात शूटिंगही सुरू झालं. आणि तिथूनच माझा अभिनयक्षेत्रातील खरा प्रवास सुरू झाला. या मालिकेतही माझी नकारात्मक भूमिका होती. सेटवर अनेकांनी घाबरवून ठेवलं होतं, तुझी ही भूमिका नकारात्मक आहे. तुला बाहेर वाईट अनुभव येऊ शकतो, शिव्याही ऐकायची तयारी ठेव वगैरे वगैरे… मला मात्र याच्या विरुद्ध अनुभव आला. ‘मोनिका’मुळेच माझ्यातील अभिनेत्रीची ओळख मला झालीच, शिवाय प्रेक्षकांनी माझ्या अभिनयाचं कौतुकच केलं. ‘खुलता...’नंतर मला झी युवावरील ‘कट्टी बट्टी’ मालिकेतील अनुष्काच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. आतापर्यंत मी नकारात्मक भूमिकाच साकारल्या असल्यानं यातील भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. माझ्या आजवरच्या अभिनयाच्या प्रवासात, स्वतःच्या विचारांवर ठाम असणारी आणि प्रसंगी समंजसपणा दाखवणारी अनुष्काची भूमिका मला सर्वात जास्त जवळची वाटते. अगदी पूर्णपणे नाही पण थोड्याफार प्रमाणात मी अनुष्कासारखीच आहे.

वेबसिरीजच्या माध्यमातून नवीन प्रयोग 
मालिकांमध्ये आणि ‘लग्नलॉजी’ या नाटकामध्ये अभिनय केल्यानंतर मला संधी मिळाली ती ‘मूव्हिंग आऊट’ या  वेबसिरीजमध्ये अभिनय करण्याची. खरं तर हे माध्यम किती मोठं आहे, त्याचा फायदा किती आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. परंतु काहीतरी नवीन प्रयोग करून बघावा म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. हा विषयही तरुणाईवर आधारित होता. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेबसिरीज हे माध्यम तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे, याचा अंदाज आला.

घरच्यांचा पाठिंबा 
सध्या झी मराठीवर ‘तुला पाहते रे’ ही मालिका सुरू झाली आहे. सध्या तरी त्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. आता चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा आहे. चित्रपटाच्या ऑफर्स  येत आहेत परंतु पटकन हो म्हणावं, अशा या भूमिका नाहीत. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परंतु आजवरच्या या प्रवासावर समाधानी आहे. अर्थात घरच्यांचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा व प्रेमामुळेच हे शक्य झालं आहे. 

आणि ‘तेजाज्ञा’चा जन्म झाला  
पहिल्याच मराठी मालिकेदरम्यान नम्रता आवटेशी ओळख झाली. त्यानंतर आमचा मस्त ग्रुप झाला. याच ग्रुपमध्ये तेजस्विनी पंडितही होती. अभिनयासोबतच फॅशन संबंधितच काहीतरी करायचं हे डोक्यात होतं. याबाबत मी तेजस्विनीला हे सांगितलं. त्यावर आपण दोघी मिळून करूया का? असं विचारल्यावर दुधात साखरच... आणि तेजस्विनी-अभिज्ञामधून ‘तेजाज्ञा’चा जन्म झाला. 


(शब्दांकन : योगिता राऊत)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link