Next
परिघाबाहेरची नाटकं
निपुण धर्माधिकारी
Saturday, September 14 | 12:00 PM
15 0 0
Share this story
न मस्कार. लेखमालेच्या पहिल्या भागात मी म्हणालो होतो, की पुण्याच्या बीएमसीसीमध्ये माझी भेट सारंग साठे आणि अमेय वाघ यांच्याशी झाली आणि माझाही वेगळाच प्रवास सुरू झाला. मला माझी लाईन सापडली.
सारंग साठे हा माझा पहिला दिग्दर्शक. कॉलेजचं सांस्कृतिक मंडळ तो पाहायचा. बक्षिसाची अपेक्षा न करता आपण चांगलं नाटक करायचं, हा त्यानं दिलेला पहिला मंत्र. फक्त आणि फक्त चांगलं नाटक करायचं हाच ध्यास. विशेष म्हणजे कॉलेजमधील सिनिअर मंडळी नाटकाकडे गांभीर्यानं पाहायची. आमच्या नशिबानं त्यांना कुठलीही वाईट सवय नव्हती. हॉटेलिंग, दारू-सिगारेट यापासून सगळे दूर होते. उलट त्यांनी आम्हाला सवय लावली ती पुण्यात जिथे कुठे प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग व्हायचे तिकडे जाण्याची. तेही तेव्हा प्रायोगिक रंगभूमीवर धडपडणारे नाट्यवेडेच होते. त्या एका वर्षात मी सारंगबरोबर पाच नाटकं केली. चेतन दातार तेव्हा नाटकाचं शिबिर घेणार होते, हे कळल्यावर सारंगनं मला तिकडे जायला भाग पाडलं. त्यामुळे एक चांगलं शिबिर मला करायला मिळालं. त्याचा निश्चितच खूप फायदा झाला. शाळेत असताना आई-बाबांनी मला ओढत नाटकाला नेलं होतं, पण कॉलेजला आल्यापासून मीच आई-बाबांच्या मागे लागायचो की चला,  नाटक बघूया. मी आठवीत असताना आई-बाबांनी मला ‘मसाज’ नावाच्या नाटकाला नेलं होतं. ते समन्वय संस्थेचं एकपात्री नाटक होतं. निखिल रत्नपारखी सादर करायचा. तेव्हा मला ते नाटक फारसं कळलं नव्हतं. परंतु अशी नाटकं पाहिल्यामुळे पुण्यातील वेगवेगळ्या नाट्यसंस्था मला कळत गेल्या. नाटक म्हणजे फक्त भरतनाट्य, टिळक स्मारक, बालगंधर्व रंगमंदिर हा समज त्यादिवशी तुटला आणि त्या परिघाबाहेरची नाटकं मला कळत गेली. ‘मसाज’ नाटकात मला निखिलचं काम खूप आवडलं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी त्याच ‘समन्वय’ संस्थेचं नाटक करण्याची संधी मिळाली आणि माझी निखिलशी ओळख झाली. त्याबरोबरीनं शशांक शेंडे, किरण यज्ञोपवीत, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी या अनुभवी लोकांचा मला सहवास मिळू लागला आणि माझा दृष्टिकोन विस्तारत गेला. सारंगनं आम्हाला एक शिकवलं होतं की तुम्हाला काम करायचंय आणि अनुभव घ्यायचाय. मग कधी बॅक स्टेज करायचो, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळायचो तर कधी प्रकाशयोजना बघणाऱ्या तंत्रज्ञांबरोबर काम करायचो. पडेल ते काम करायचो. बारावीत गेलो आणि आई-बाबांनी नाटकच थांबवलं. एकदाचं ते वर्ष संपलं अन मी सुटलो.
त्याच सुमारास सत्यदेव दुबेंची नाट्य कार्यशाळा जाहीर झाली. मी खूप ऐकलं होतं दुबेजींबद्दल. काहीही करून तिथे जायचंच हे मी व अमेयनं ठरवून टाकलं आणि आम्ही गेलो. ते वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचं होतं कारण आम्ही दोघं एफ.वाय.बी.कॉम.ला होतो. सारंगची टीम पासआउट होणार होती. त्यामुळे सांस्कृतिक मंडळाची जबाबदारी आमच्याकडे येणार होती. सर्व अनुभव पणाला लावून कॉलेजसाठी नाटकं दिग्दर्शित करायची हे ठरलं होतं.  तेव्हाच या कार्यशाळेत जाण्याची संधी हा चांगला योगायोग होता. दहा दिवसांची कार्यशाळा होती. खरंतर माझी एक प्रवेशपरीक्षा नेमकी कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी मुंबईला होती. इच्छा नसतानाही मला ती द्यावी लागली होती. त्यामुळे माझा पहिला दिवस बुडाला. त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही ती कार्यशाळा अक्षरशः कोळून प्यायलो. कार्यशाळेच्या अर्धा तास आधीच मी आणि अमेय तिथे जायचो. आदल्या दिवशी शिकवलेल्या गोष्टी करून पाहायचो. तिथे आम्ही फर्स्ट बेंचर होतो. दुबेसर खुर्चीत बसले की सर्व विद्यार्थी त्यांच्याभोवती जमिनीवर बसायचे. मी आणि अमेय मुद्दाम मागे थांबायचो. सगळी मुलं बसली की नंतर त्यांच्यातून वाट काढत अगदी पुढे म्हणजे जवळपास त्यांच्या पायाशीच जाऊन बसायचो. ते आमच्याकडे लक्ष देताहेत आणि आमच्याकडून जास्त करून घेत आहेत हेही आम्हाला जाणवायचं. त्या दहा दिवसांत खूप काही मिळालं. मी पुन्हा कॉलेजच्या नाटकांकडे वळलो आणि पुरुषोत्तम करंडकची तयारी सुरू केली. तरी हाती काही लागत नव्हतं. तेव्हा अमेयच्या आईनं माडगूळकरांची ‘सायकल’ कथा सुचवली. आम्ही तीच एकांकिका बसवायला घेतली. त्याच सुमारास एकीकडे माझं सीए सुरू झालं होतं. हे नाटक करायला मला जमेल असं वाटत नाही अशी शंका मी बोलून दाखवताच अमेय माझ्यावर जाम भडकला. आमचं मोठं भांडणही झालं. अर्थात ते नंतर मिटलं आणि मी ते नाटक बसवायला घेतलं. मला सुचेल तसं दिग्दर्शन करत होतो. पहिला प्रयोग ज्यांनी ज्यांनी पाहिला ते सगळे ‘तुम्हीच करंडक जिंकणार’ असं म्हणत होते. एकेक पायरी पार करत आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो. तिथे आमच्याकडून एक-दोन तांत्रिक चुका झाल्या. वाटलं आता सगळं संपलं, पण निकाल जाहीर झाला आणि आम्हाला पहिलं पारितोषिक म्हणजे करंडक मिळाला. बावीस वर्षांनी आमचं कॉलेज जिंकलं होतं. मला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून, अमेयला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून बक्षीस मिळालं. तेव्हा आम्ही दोघंही अवघे अठरा वर्षांचे होतो. हा धागा पकडून कुणीतरी अफवा उठवली की हे नाटक शशांक शेंडेनं बसवलं असावं कारण निपुण लहान आहे, तो बसवूच शकत नाही. त्यावरून कॉलेजच्या पातळीवर जी वादावादी होते ती झाली. पण सारंगनं सांगितल्याप्रमाणे टीका आणि कौतुक या दोन्हीकडे जास्त लक्ष न देता आपण चांगलं नाटक करायचं, हे मनात पक्कं होतं. त्यावर्षी ‘सायकल’ एकांकिका सगळीकडे पहिली आल्यामुळे गाजली. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरची दीर्घांकस्पर्धा जाहीर झाली. एक नवीन संधी मला खुणावू लागली. ‘समन्वय’ संस्थेकडून दीर्घांक करायचा आणि मी ते दिग्दर्शित करेन असं ठरलं. ते नाटक होतं ‘लूज कंट्रोल.’ पौगंडावस्थेतील मुलांच्या मनातील लैंगिकता यावर ते नाटक होतं. ते कुठेही अश्लील नव्हतं आणि हाच त्याचा यूएसपी ठरला. ते खूप गाजलं. साक्षात विजय तेंडुलकर, काकडेकाका, नाना पाटेकर, सुलभा देशपांडे, केके मेनन, अतुल कुलकर्णी अशी मराठी आणि हिंदीतील मोठी माणसं त्या नाटकाला येऊन गेली. त्यांनीही त्या नाटकाचं कौतुक केलं. मग आम्हाला मुंबईत पृथ्वी थिएटरला ते नाटक सादर करायची संधी मिळाली. तो दिवस अविस्मरणीय होता, कारण नाटकाविषयी बरंच ऐकल्यामुळे त्यादिवशी खुद्द सत्यदेव दुबे प्रयोगाला हजर राहणार होते. त्यांना तो दीर्घांक इतका आवडला की त्यांनी दुपारचा आणि संध्याकाळचा असे दोन्ही प्रयोग बघितले. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा मी त्या कार्यशाळेबद्दलची आठवण सांगितली. ते हसले आणि त्यांनी शाबासकी दिली. जिथून शिकून आलो होतो त्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वानं आज शाबासकी दिली होती. एक वर्तुळ पूर्ण झालं होतं. त्याच नाटकामुळे व्यावसायिक रंगभूमीची दारं आम्हाला खुली झाली. त्याविषयी पुढील भागात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link