Next
चपळतेचे प्रतीक - चित्ता
अतुल साठे
Friday, October 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story


लोक अनेकदा चित्ता व बिबट्या यांच्यात गल्लत करतात, म्हणून जाणून घेऊया या दोघांतील फरक. चित्ता आज भारतात अस्तित्वात नाही. बिबट्या सर्वत्र विपुल संख्येने आढळतो. चित्ता सडपातळ व सर्वाधिक वेगाने पळणारा प्राणी असून, बिबट्या धष्टपुष्ट व झाडावर चढण्यात तरबेज असतो. चित्त्याच्या अंगावर भरीव काळे ठिपके व डोळ्यांपासून नाकाच्या दोन्ही बाजूंना अश्रू वाहिल्यासारख्या रेषा असतात, तर बिबट्याच्या अंगावर भरीव नसलेले काळे पुंजके असतात. पूर्व आफ्रिकेतील विस्तीर्ण माळरानांवर हरणांचा प्रचंड गतीने पाठलाग करणारा चित्ता आपण माहितीपटांत पाहिलेला असतो. कधी काळी दख्खनच्या पठारावर या विलक्षण प्राण्याचे चित्तथरारक पाठलाग चालत हे आज सांगून खरे वाटणार नाही.

संस्कृत शब्द चित्रकायावरून (अंगावर नक्षी असलेला) हिंदी व इंग्रजीत चिता व मराठीत चित्ता ही नावे आली. चित्त्याचे शास्त्रीय नाव आहे असिनोनिक्स जुबॅटस. जगात चित्त्याच्या ४ उपप्रजाती अस्तित्वात असून, त्यातील ३ आफ्रिकेत सापडतात. आशियाई चित्ता आता फक्त इराणच्या केरमान, खोरासान, सेमनान, याझ्द, तेहरान व मर्काझी प्रांतांत शिल्लक आहे. पूर्वी त्याचा आढळ मध्य आशिया व भारतीय उपखंडात विस्तृत प्रदेशावर होता. भारतात हिमालय, ईशान्येकडील राज्ये, दक्षिणेकडील टोकाचा भाग व सह्याद्रीतील अतिपावसाचा प्रदेश सोडला तर बहुतांश भागांत चित्त्याचे वास्तव्य होते. माळराने, निम-वाळवंटी प्रदेश, खुरटी शुष्क जंगले व लगतच्या टेकड्या हे त्याचे अधिवास होते. असे बोलले जाते की अकबराकडे १,००० चित्ते पाळलेले होते, तर शाहू महाराजांकडे १०० चित्ते होते.वैशिष्ट्यपूर्ण उत्क्रांती
मोकळ्या अधिवासात चपळ भक्ष्य पकडण्यासाठी चित्ता उत्क्रांत झाला आहे. त्यामुळे त्याच्या शरीराची रचना व शिकारीची पद्धत मार्जारकुळातील अन्य प्रजातींपेक्षा भिन्न आहे. चित्त्याचे शरीर सडपातळ, छाती खोल, पाय बारीक व लांब, डोके लहान व गोलाकार उंचवटा असलेले, आणि कपाळाची ठेवण वैशिष्ट्यपूर्ण असते. मार्जारकुळातील बहुतांश प्रजातींमध्ये पंजावरील नखे वापरात नसताना खालच्या बाजूला त्वचेच्या आवरणात सुरक्षित असतात. परंतु वेगाने धावताना जमिनीची अधिक चांगली पकड घेता यावी म्हणून चित्त्याची नखे कायम उघडी असतात. धावताना शेपटीचाही तोल सांभाळण्यात चांगला उपयोग होतो. फिक्या पिवळट तपकिरी अंगावर काळे ठिपके असतात. पोटाकडील भाग पांढरट असतो व शेपटीच्या टोकाला काळे पट्टे असतात. अशा रंगसंगतीमुळे चित्ता कोरड्या माळारानावर चटकन दिसत नाही. भक्ष्य पकडण्यात याचा उपयोग होतो. माळरानाजवळच्या छोट्या टेकड्यांतील खडक व कपारीत चित्ता वास्तव्य करतो. शिकार बऱ्याचदा दिवसा केली जाते.

चित्त्याची शिकारीची पद्धत ही एकाच वेळी मार्जारकुळ व श्वानकुळ या दोन्हीशी साधर्म्य दाखवते. सुरुवातीला मांजराप्रमाणे शरीर जमिनी लगत ठेवून उपलब्ध आडोशांचा उपयोग करून चित्ता भक्ष्याच्या थोडा जवळ जातो. त्यानंतर मात्र मांजराप्रमाणे अचानक जवळून उडी मारण्याऐवजी चित्ता कुत्र्याप्रमाणे मैदानी भागात काही अंतर वेगाने पाठलाग करून भक्ष्य पकडतो. पाठलाग सुरू करताना चित्त्याला अल्पावधीत प्रचंड वेग गाठणे व लांब उड्या मारणे हे दोन्ही शक्य होते. पहिल्या ३५० मीटरहून थोडे जास्त अंतर हा वेग राखता येतो. ताशी ११० किमीच्या वेगाने पळणारा चित्ता कोणत्याही शिकारी कुत्र्यापेक्षा गतिमान आहे. पाठलाग लांबत जाईल तसा चित्त्याचा वेग मंदावत जातो. भक्ष्याच्या अगदी जवळ पोचला की चित्ता आपल्या पायावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मोठ्या नखाच्या साहाय्याने भक्ष्याच्या पायावर वार करून त्याला खाली पाडतो. मग भक्ष्याच्या मानेला जबड्यात पकडून ठार मारले जाते.

चिंकारा, काळवीट, चितळ, नीलगाय, ससा आणि अन्य काही छोटे प्राणी व माळरानावरील पक्षी हे त्याचे मुख्य भक्ष्य होय. क्वचित तो शेळ्या-मेंढ्यांवर हल्ला करतो. आशियाई चित्त्याचे सरासरी वजन ३४-५४ किलो असते.नामशेष का झाला?
भारतातील शेवटचे ३ चित्ते १९४० च्या दशकात सरगुजा संस्थानामध्ये (छत्तीसगढ) मारले गेले. त्यानंतर देशात चित्ता पुन्हा दिसल्याची अधिकृत नोंद नाहीये. भारतातून चित्ते नामशेष होण्यामागील मुख्य कारणे होती त्याच्या मोकळ्या मैदानी अधिवासाचा नाश व त्याच्या भक्ष्याची मानवाकडून झालेली वारेमाप शिकार. तसेच, अनेक शतकांपासून वन्य चित्त्यांना पकडून व प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर हरणांच्या शिकारीसाठी करण्यात आलाय. ब्रिटिशकाळात या प्रकारात प्रचंड वाढ झाली. पाळीव चित्त्याला डोळ्यांवर पट्टी बांधून माळरानावर नेले जात असे. हरणांचा कळप दिसला की पट्टी काढली जायची. मग काही क्षणांत पाठलाग करून चित्ता शिकार घेऊन मालकाकडे परत यायचा. कधी-कधी पाठलाग वाया जात असे. मारून आणलेल्या हरणाचे थोडे ताजे रक्त चित्त्याला बक्षीस म्हणून देण्यात येत असे.

अशा प्रकारे वन्य चित्त्यांच्या संख्येत घट झाली. चित्ते समूळ नष्ट झाल्यावर काळविटांची संख्या बेसुमार वाढली व ती शेतांत घुसू लागली. आज दख्खनच्या अनेक भागांत अशा काळविटांचा उपद्रव प्रचंड वाढलाय. जमेची बाजू ही आहे की भारतात पूर्वापार चालत आलेल्या (पण आता झपाट्याने ऱ्हास होणाऱ्या) निसर्गस्नेही जीवनशैलीमुळे अजूनही येथील बहुतांश वन्यजीव प्रजाती टिकून आहेत. चित्ता हा अपवाद ठरला. पुन्हा शाश्वत मूल्ये अंगिकारली तर अन्य कोणत्या प्राण्याची अशी गत होणार नाही हे नक्की.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link