Next
लेगस्पिनर्सचा झंझावात
नितीन मुजुमदार
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

आयपीएलच्या या सीझनमध्ये पहिल्या पंधरा सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या चार गोलंदाजांमध्ये तीन लेगस्पिनर्स आहेत! युझवेंद्र चहल, इम्रान ताहीर व श्रेयस गोपाल यांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. एका डावात सर्वाधिक डॉट बॉल्स टाकण्याचा मानही यांच्यातील इम्रान ताहीर व युझवेंद्र चहल यांच्याकडे जातो. यांनी एका डावात प्रत्येकी १८ डॉट बॉल्स टाकून स्पृहणीय कामगिरी केली आहे. एकंदरीत बॅट आणि बॉल यांच्यातील लढत रंगते तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रिकेटही बहरते! सारे नियम फलंदाजधार्जिणे असताना लेगस्पिनर ही झटपट क्रिकेटमधील पिछडी जमातही प्रगती करायला लागते तेव्हाच अस्सल क्रिकेटरसिक खूश होतो!
सध्या उत्तम सूर गवसलेला लेग स्पिनर म्हणजे इम्रान ताहीर. स्पिनर जसा अनुभवाने समृद्ध होतो तसा अधिकाधिक परिपक्व होतो. इम्रान ताहीर हे याचे उत्तम उदाहरण. दक्षिण आफ्रिकेकडून खेळणाऱ्या इम्रानचे वय सध्या ३९ आहे. फेब्रुवारी २०१७मध्ये तो एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट व टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रँकिंकमध्ये क्रमांक एकचा गोलंदाज होता. आयपीएल २०१९ मध्ये त्याने प्रतिविकेट ११ धावा दिल्या. त्याचा इकॉनॉमी रेट आहे फक्त ५.५० धावांचा!
दुसरा चमकणारा लेगस्पिनर आहे रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा युझवेंद्र चहल. १२ वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळस्पर्धेचे राष्ट्रीय जेतेपद त्याने २००२ साली मिळवले होते. ग्रीसमध्ये वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिपमध्येदेखील तो सहभागी झाला होता. मात्र भविष्यात प्रशिक्षणाचा प्रतिवर्षी खर्च पाच लाख रुपये होणार होता, त्यासाठी त्याला प्रायोजक मिळाला नाही आणि भारतीय क्रिकेटला एक उत्तम लेगस्पिनर मिळाला!
जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा पहिल्या वर्षी ८ पैकी ५ संघांनी त्यांच्या संघात लेगस्पिनरचा समावेश केला होता. २०१९च्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघात किमान एक लेगी आहे! दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग म्हणतो, ‘माझ्या संघात तर ३ लेगस्पिनर आहेत! मॉडर्न टी-२० मध्ये तर लेगस्पिनर हा एक ट्रेंड आहे!’
आयपीएलच्या सुरुवातीला लेगस्पिनर हे संघासाठी एक ओझे मानले जायचे, आता एक चांगला लेगस्पिनर संघासाठी मोठा अॅसेट मानला जातो. लेगस्पिनरसाठी एका दशकात आलेले हे एक अत्यंत सुखद स्थित्यंतर आहे.n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link