Next
भारत-पाक लढतीचे भवितव्य अधांतरी
प्रतिनिधी
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

तब्बल ५५ वर्षांनंतर डेव्हिस कपमध्ये एक इतिहास घडण्याची शक्यता होती. भारताचा टेनिस संघ डेव्हिस कपच्या निमित्ताने पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. परंतु, आता पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडल्याने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्याची शक्यता मावळली आहे. डेव्हिस कपच्या वेळापत्रकाप्रमाणे भारत-पाकिस्तान यांच्यातील मुकाबला इस्लामाबादमध्ये १४ आणि १५ सप्टेंबरला होणार आहे. ही केवळ दुरंगी लढत नाही तर टेनिसचा वर्ल्ड कप आहे. त्यामुळे भारताचा टेनिस संघ पाठवायलाच हवा, असे ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने स्पष्ट केले होते, तर पाकिस्तान टेनिस फेडरेशनने भारतीय संघाच्या सुरक्षेची हमीदेखील घेतल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे डेव्हिस कपमध्ये दोन्ही संघांत महामुकाबला होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

पाकिस्तानने तोडले संबंध
जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारताशी सर्व प्रकारचे संबंध तोडण्याचा निर्णय बुधवारी जाही केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने भारताच्या उच्चायुक्तांनाही पाकिस्तानातून माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. परिणामी आता डेव्हिस कपच्या आयोजनाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र, याविषयी पाकिस्तान टेनिस फेडरेशन किंवा ऑल इंडिया टेनिस असोसिएशन यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मुळात पाकिस्तानात गेल्या १० वर्षांत सुरक्षेच्या कारणास्ताव आंतरराष्ट्रीय क्रीडासामने झालेले नाहीत. २००९मध्ये पाकिस्तानात श्रीलंका क्रिकेटसंघाच्या बसवर गोळीबार झाला होता. त्यानंतर एकाही देशाचे क्रीडापथक पाकिस्तानमध्ये गेलेले नाही. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनने २०१७ मध्ये पाकिस्तानला डेव्हिस कपसाठी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर पाकिस्तानने चार वेळा डेव्हिस कपच्या सामन्यांचे यजमानपद भूषवले. भारत १९६४ नंतर पहिल्यांदाच डेव्हिस कप सामन्यांसाठी पाकिस्तानात संघ पाठवण्याची शक्यता होती. १९६४ मध्ये भारतीय संघाने लाहोर दौरा केला होता. त्यावेळी भारताने ४-० असा विजय मिळवला होता. दोन्ही देश २००६ मध्ये डेव्हिस कपसाठी मुंबईत आमने-सामने आले होते. त्यावेळीही भारताने पाकिस्तानला ३-२ अशी धूळ चारली होती. मुळात क्रिकेट वर्ल्ड कपप्रमाणेच भारताची डेव्हिस कपमध्ये चांगली कामगिरी आहे. दोन्ही देश सहा वेळा एकमेकांशी भिडले असून, प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. यंदाही लढत झाली तर भारत ७-० अशी कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

इंडो-पाक एक्स्प्रेस आमने-सामने
भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा ऐसाम अल-हक कुरेशी दोघेही दुहेरीमध्ये सोबत खेळलेले आहेत. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. २०१०च्या यूएस ओपनमध्ये दोघे दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. पण, तेथे त्यांना माइक आणि बॉब या ब्रेयन भावंडांकडून पराभव पत्करावा लागला होता. टेनिसजगतात रोहन आणि ऐसामचा उल्लेख इंडो-पाक एक्स्प्रेस असा केला जातो. दुहेरीत या जोडीचे रँकिंग ५५ आहे. डेव्हिस कपमध्ये मात्र दोघेही आमने-सामने आले आहेत.

लढतीसाठी उत्सुक
पाकिस्तानात होणाऱ्या डेव्हिस कप लढतीसाठी मी खूप उत्सुक आहे. ऐसाम अल-हक कुरेशी हा माझा चांगला मित्र आहे. त्याच्याशी माझे बोलणेही झाले आहे. त्याने सगळे काही व्यवस्थित होईल, असा विश्वास व्यक्त केला. मी काही वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे. त्यांच्या आदरातिथ्याने मी खूपच भारावून गेलो होतो. काळजी करण्यासारखे काही आहे, असे मला वाटत नाही.
- रोहन बोपन्ना, टेनिसपटू, भारत

प्रतीक्षा भारतीय संघाची
अतिशय सुरक्षित वातावरणात डेव्हिस कपच्या सामन्यांचे आयोजन होईल. आम्ही भारतीय संघाची वाट पाहत आहोत. त्यांच्यासाठी आणि भारतीय चाहत्यांसाठी खूप चांगली व्यवस्था केली जाणार आहे. आम्ही सामने पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण देण्याची तयारी करत आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर बॉम्ब टाकण्यापेक्षा टेनिस बॉल टाकलेले केव्हाही चांगले.
- सलीम सैफुल्ला खान, अध्यक्ष, पाकिस्तान टेनिस फेडरेशन

सरकारची भूमिका महत्त्वाची
ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने सरकारच्या सूचनांचे पालन करावे. या प्रश्नावर आपण १०० टक्के सरकारच्या सूचनांचे  पालन केले पाहिजे. सरकारला कोठे गुंतागुंत आहे याची निश्चित माहिती असते. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यावा. या विषयात जगभराचा दृष्टिकोन काय आहे, हे खूप महत्त्वाचे आहे.
- विजय अमृतराज, माजी टेनिसपटू, भारत 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link