Next
‘आनंदी-गोपाळ’ चरित्रपटाचा अभिनयप्रवास
अश्विनी पारकर
Friday, February 08 | 04:30 PM
15 0 0
Share this story



आनंदीबाईना पडद्यावर हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न

- भाग्यश्री मिलिंद

आनंदीबाई जोशी यांना पडद्यावर हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. या चरित्रपटामधील पात्र साकारताना त्यातील खरेपणा पडद्यावरही तसाच साकारावा यासाठी आम्ही दोनशे टक्के प्रयत्न केले आहेत.

आव्हानात्मक भूमिका
माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच ही भूमिका माझ्या वाट्याला आली. ती भूमिका समजून घेणे, पडद्यावर साकारणे हे अभिनेत्री म्हणून आव्हान होते. या भूमिकेतून मला फार शिकायला मिळाले. दिग्दर्शक समीर विद्वांस यांचा यात मोठा वाटा आहे की त्यांनी मला अभिनयाचे तंत्र शिकवतानाच स्वातंत्र्यही दिले होते. त्यामुळे भूमिका करतानाचे दडपण हलके झाले. या भूमिकेसाठी माझी रीतसर ऑडिशन झाली होती. त्यावेळी मी २१ वर्षांची होते. त्यांची पुस्तके, पत्रे व इतर दस्तऐवज वाचून त्यांच्या भूमिकेपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला. यासाठी शिबिराचाही फायदा झाला. तो काळ या चित्रपटात उभा करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली. त्यांची शिक्षणासाठीची जिद्द, घरच्यांच्या व समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी दिलेला लढा, त्यांना गोपाळरावांनी दिलेली साथ, हे सर्व घडत असताना त्यांच्या मन:स्थितीचा मागोवा या भूमिकेसाठी घेणे गरजेचे होते. यासाठी काशीबाई कानेटकर व कॅरलिन डाल यांनी लिहिलेल्या पुस्तकांची  खूप मदत झाली. ही दोन्ही पुस्तके फार जुनी होती. अमेरिकेतील आनंदीबाईंच्या वास्तव्यात त्या कॅरलिन डाल यांना भेटल्या होत्या. त्याचे सखोल वर्णन या पुस्तकात आहे. कॅरलिन डाल यांच्यावर आनंदीबाईंची कशी छाप पडली, आनंदीबाईंचे अमेरिकेत कशापद्धतीने स्वागत व्हायचे. या वर्णनातून आनंदीबाईचे व्यक्तिमत्त्व उलगडत गेले.
बालक-पालक या चित्रपटात शाळकरी मुलीची भूमिका करणाऱ्या मला आनंदीबाई जोशी यांची भूमिका करणे खऱ्या अर्थाने आव्हान होते. कारण ते व्यक्तिमत्त्व कर्तृत्ववान होते. त्या व्यक्तिमत्त्वाशी मी थेट नाते सांगू शकत नाही, पण त्यांच्याविषयीच्या पुस्तकांतून त्यातील घटनांतून त्यांना मी समजू शकत होते. त्याप्रसंगी त्या असे का वागल्या असतील याची कल्पना करू शकत होते.

या चित्रपटात आनंदीबाईंच्या जीवनातील काही सत्यघटना तंतोतत पडद्यावर साकारल्या आहेत. आनंदीबाई शाळेत नऊवारीवर बूट आणि स्टॉकिंग्ज घालून गेल्या होत्या तो त्यांच्या जीवनातील खराखुरा प्रसंग चित्रपटात आहे. त्याची झलक ट्रेलरमध्येही दिसेल. या प्रसंगावरून त्यांच्यातील धाडसाची आपण कल्पना करू शकतो. आनंदीबाईंच्या वेशभूषेतील बदलही या चित्रपटात दर्शवले आहेत. ते तसे का आले? त्यामागे नेमक्या काय घटना घडल्या? याची उत्तरे तुम्हाला चित्रपटातच सापडतील. या चित्रपटात एक संवाद आहे ज्यात गोपाळराव म्हणतात, ‘स्त्री शिकलेलीच हवी.’ त्यांना त्यांची पत्नी शिकलेली हवी होती. त्यावरून त्यांच्यातील नाते कसे आहे हेदेखील उलगडत जाते. त्या दोघांचा शिक्षणाविषयचा ओढा प्रतीत होतो.
या चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहून प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल अशी मला आशा आहे. या प्रतीक्षेमुळे दडपण जरी उत्तरोत्तर वाढत असले तरी प्रेक्षक या चित्रपटाला दाद देतील अशी अपेक्षा आहे.

आनंदीबाई प्रेरणादायी
आनंदीबाई जोशी जशा अत्यंत धाडसी होत्या तशा त्या आत्मविश्वासूदेखील होत्या. ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे अशक्यप्राय गोष्ट होती त्या काळत आनंदीबाई केवळ घराबाहेरच पडल्या नाहीत तर त्या अमेरिकेला गेल्या. त्या शिकल्या. त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले. जी गोष्ट त्यांना योग्य वाटली त्यासाठी त्या ठामपणे उभ्या राहिल्या, लढल्या. माझ्यासाठी व्यक्तिगतरीत्याही आनंदीबाईंचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. त्यांनी जो संघर्ष केला त्यामुळे मला व माझ्यासारख्या अनेक मुलींना शिक्षण घेणे सहजसोपे झाले. त्यांच्या संघर्षाच्या मी जवळही जाऊ शकत नाही कारण माझ्या आयुष्यात असा संघर्ष माझ्या वाट्याला आला नाही. मला असे वाटते, आमच्या पिढीला हा संघर्ष वाट्याला न येण्याचे श्रेय आनंदीबाई जोशी यांसारख्या त्या काळातील अनेक स्त्रियांना जाते. ज्यांच्यामुळे आम्ही आज आत्मविश्वासाने शिक्षण घेऊ शकतो. या सर्व स्त्रिया मला प्रेरणा देतात.
---------------------------------------------------

चौकटीबाहेरील भूमिका करण्याची संधी
- ललित प्रभाकर
आनंदी-गोपाळ या चित्रपटात मी गोपाळराव जोशी यांची भूमिका साकारतो आहे. ही भूमिका माझ्या अभिनयाच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाची आहे कारण, यापुढे दिग्दर्शक, निर्माते निरनिराळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी माझा विचार करू शकतील. त्यामुळे प्रेक्षकही यापुढे चौकटीच्या बाहेरील वेगळ्या भूमिकांमध्ये मला पाहू शकतील. मी नेहमीच भूमिकांमध्ये वैविध्य जपण्याचा प्रयत्न करतो. ही भूमिका माझ्या या आधीच्या भूमिकांपेक्षा फारच वेगळी होती. त्यामुळे गोपाळरावांच्या भूमिकेच्या निमित्ताने मला ज्या भूमिकांमध्ये पाहण्याची प्रेक्षक कल्पनाही करूही शकणार नाही अशा भूमिकादेखील करण्याची मला संधी मिळेल. कोणत्याही अभिनेत्यासाठी निरनिराळ्या भूमिका करायची संधी मिळणे ही ‘किक’ फार महत्त्वाची असते.

गोपाळराव समजून घेताना…
खरे तर गोपाळरावांच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली त्यावेळी ते नाकारण्याचे काही कारणच नव्हते. कारण या भूमिकेची उंचीच फार भक्कम होती. त्यावेळी गोपाळराव जोशी यांच्याविषयी तितकीशी माहितीही नव्हती. परंतु जेव्हा मी गोपाळरावांबाबत माहिती देणारी पुस्तके वाचली, त्यातील ‘डॉ. आनंदीबाई जोशी- काळ आणि कर्तृत्व’ या अंजली कीर्तने लिखित पुस्तकाची फार मदत झाली. हे पुस्तक वाचल्यानंतर हे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. हे ऐतिहासिक पात्र असल्याने ते साकारताना त्यामागील जबाबदारीची जाणीव मला होती. हा चरित्रपट असल्याने गोपाळरावांच्या त्या काळातील व्यक्तिमत्त्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्यांनी आनंदीबाई जोशी यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहाराचा त्यांची भूमिका उभी करताना फार मोठा फायदा झाला आहे. कारण, पत्रव्यवहार हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व व स्वभावाच्या पैलूचा खराखुरा दस्ताऐवज, तसेच त्यातील काही संदर्भ खासगीदेखील असतात. त्यामुळे या पत्रांतून मला गोपाळरावांच्या स्वभावाविषयीच्या बऱ्याच गोष्टी समजून घेण्यास मदत झाली. एखाद्या प्रसंगात गोपाळराव कसे व्यक्त होतील याचा अंदाज लावणे कठीण होते. त्यामुळे ते कसे वागत असतील, ते कसे चिडतील, एखाद्या प्रसंगी ते आक्रस्ताळेपणाने बोलतील की उपहासात्मक बोलतील याविषयीचा सखोल विचार मी ही भूमिका साकारताना करत होतो. गोपाळरावांबाबत जाणून घेणे, ते पडद्यावर साकारणे ही प्रक्रिया जवळजवळ वर्षभराची होती.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मी सध्या इतकच सांगू शकेन की गोपाळराव हे विक्षिप्त, तर्कट होते, परंतु ते तितकेच कर्तबगारही होते. मनस्वी होते. मुख्य म्हणजे ते सजग होते. ते काय करत आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव होती.

या चित्रपटात गोपाळराव व आनंदीबाई यांच्या नात्यातील विविध टप्पे पाहता येतील. आनंदीबाई जोशी यांना शिक्षित करण्यात गोपाळरावांचा महत्त्वाचा वाटा आहे, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. परंतु हे त्यांनी कशाप्रकारे केले, याची कथा या चित्रपटात दाखवली आहे. त्या दोघांमधील नाते हे केवळ पतीपत्नीच्या नात्यापुरते मर्यादित नव्हते तर त्यांच्यात ती त्यांची विद्यार्थिनीही होती. आणि त्यांच्यात २० वर्षांचे अंतर होते. त्यांच्यात मैत्रीचे व प्रेमाचे नातेही निर्माण झाले. हे टप्पे नेमके कसे होते हे चित्रपट पहाताना प्रेक्षक अनुभवू शकतील.

वेशभूषा आणि संवाद महत्त्वाचे
अर्थात ही भूमिका जिवंत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती गीतांजली कुलकर्णी यांनी घेतलेल्या शिबिराने. या चार दिवसांच्या शिबिरात आम्ही गोपाळरावांची पत्रे वाचली, त्यावेळेची भाषा कशी असावी याचा अभ्यास केला. त्या शिबिरात मी माझ्या वेशभूषेसह वावरायचो त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी सेटवर मला वावरणे सहज होते. खरे तर धोतर हा अत्यंत सहज असा पेहराव आहे. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान मला तयार व्हायला केवळ तीन मिनिटे लागायची. या भूमिकेसाठी मी पूर्ण टक्कल केले होते. आम्ही रंगभूषाही अत्यंत कमी ठेवली होती जेणेकरून पडद्यावर हे व्यक्तिमत्त्व जास्तीत जास्त नैसर्गिक वाटावे. गोपाळरावांच्या वयातील तीन टप्पे साकारताना तीन वेगवेगळ्या मिश्या आम्ही वापरल्या होत्या. प्रत्येक टप्प्यातील बारकावे विशेषत: २८ ते ४० या वयातील टप्पा साकारताना रंगभूषाकारांनी विशेष काळजी घेतली होती. आमचे संवाद हे त्याकाळातील असले तरीही ते बोजड वाटू नयेत याचीही आम्ही काळजी घेतली होती.

या भूमिकेसाठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी माझा विचार केला. त्यांना माझ्यात गोपाळरावांचे पात्र दिसू शकले यासाठी मी त्यांचा फार आभारी आहे. त्यांनी दिलेल्या संधीमुळे मी गोपाळराव पडद्यावर साकारू शकलो. चित्रीकरणावेळी दिग्दर्शक म्हणून खरे तर ते कथेच्याही पुढे असायचे. आम्हाला प्रत्येक दृश्याच्या वेळी ते अशाप्रकारे सूचना द्यायचे की ते दृश्य साकारणे सोपे होऊन जायचे. त्यांच्या शब्दांमध्ये ती किमया होती की आम्हाला त्या दृश्यामागील संदर्भ अगदी नीट समजायचे. भाग्यश्री ही चौकस व जिज्ञासू अभिनेत्री आहे. चित्रीकरण्याच्या वेळी नेमके काय घडतेय हे जाणून घेण्यास ती उत्सुक असायची. चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर आम्ही चित्रीकरणाच्या दरम्यान खूप धमाल केली आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे चित्रीकरण केले आहे तसेच परदेशात जॉर्जिया येथेही या चित्रपटाचा काही भाग चित्रित झाला आहे. चित्रपट पाहताना तुमच्या हे लक्षात येईलच.

गोपाळरावांचे विचार आजही प्रेरणादायी
या चित्रपटाच्या टीझरला तरुणांचा मिळत असलेल्या प्रतिसादाविषयी मला विशेष आनंद होतो आहे. त्यांना हा टीझर भावतोय ही बाब नक्कीच दखल घेण्याजोगी आहे. गोपाळरावांचा संघर्ष हा केवळ त्या काळापुरता मर्यादित नव्हता. त्यांचे विचार हे काळाच्याही पुढे होते. आजच्या काळातही हा संघर्ष संपलेला नाही. १३२ वर्षांपूर्वीचा हा काळ पाहता या संघर्षातून निर्माण होणारे बदल फारच पुढे जाण्याची गरज होती. या आदर्शवत व्यक्तिमत्त्वाप्रमाणे कार्य करणे तर कठीण आहे. ज्या काळात पत्नीला घराबाहेरही पाठवत नसत त्या काळात गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवले. अगदी सद्यपरिस्थीतीतही त्यांचे विचार लागू पडतात. या विचारांतून प्रेरणा घेऊन पुढच्या पिढीसाठी आदर्श ठरेल असे एक काम तरी आपण करू अशी प्रेरणा या चित्रपटातून प्रेक्षकांनी घ्यावी.



 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link