Next
कंटाळा उडाला भुर्रऽऽ
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘तुम्हाला मेल किंवा पत्र लिहायचं होतं, पण कंटाळा आला. सुरुवातीला खूप वाटलं पत्र लिहून सल्ला घेऊ, पण मग कंटाळा आला. तसं आधी काही डॉक्टरांना भेटलो, पण त्यांची ट्रीटमेंट घ्यायचा कंटाळा आला. आता हल्ली यूट्युबवर खूप व्हिडिओ बघतो- वजन कसं कमी करावं, स्वत:ला मदत कशी करावी, या विषयावर. तिथे दिलेल्या सूचना ऐकायला आवडतात, पण त्याप्रमाणे काही करण्याचा कंटाळा येतो. तसे व्हिडिओ बघण्याचापण कंटाळा आलाय. आपल्यात काही बदल होत नाही याचाही कंटाळा आलाय. आपल्याला सारखा कंटाळा का येतो, याचा विचार पूर्वी करत असे. आता कंटाळा का येतो या विषयाचा विचार करण्याचादेखील कंटाळा आलाय. मला कंटाळा आलाय, हे सांगण्याचाही कंटाळा आलाय. मला डाएट करायचंय, व्यायाम करायाचय, नवीन शिकायचंय पण कंटाळा! काय करू या कंटाळ्याचं? कंटाळा आलाय...!’
तो कंटाळलेल्या आवाजात म्हणाला. मलाही त्याचं बोलणं ऐकण्याचा कंटाळा आला असता, पण मी त्याच्या बोलण्यात कंटाळा शब्द किती वेळा आला हे मोजत होतो. तब्बल १३ वेळा!
कंटाळा हा आपल्या मनाचा शत्रू होऊन बसला होता. तो इतका प्रभावी आणि घातक होता की तो दिसत नव्हता. त्याच्या मनात खिळलेला होता. काय म्हणावं या मन:स्थितीला?
आपल्या मित्राच्या बोलण्यातल्या कंटाळ्याचं विश्लेषण केलं तर लक्षात येईल की कंटाळा ही मन:स्थिती आहे. कंटाळा ही भावना आहे. तोचतोचपणानं, एकसुरीपणानं, नाविन्याचा अभाव असल्यानं, प्रत्येक बाबतीत आणि अगदी क्षुल्लक गोष्टीत अपेक्षाभंग होत असल्यानं मनात बोकाळलेलं ते सूक्ष्म नैराश्य होतं. क्षणोक्षणी नाराज वाटणं, स्वत:ला सांभाळण्याची जबाबदारी दुसऱ्यानं घ्यावी, सगळा बदल आपोआप व्हावा, आपल्याला कोणतेही कष्ट न करावे लागता चमत्कार होऊन सगळ्या गोष्टी तंतोतंत आपल्या मनासारख्या व्हाव्यात या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे कंटाळा येतो.
कंटाळा ही भावना नकारात्मक दृष्टिकोनातून उद्भवते. आपलं मन सतत आनंदित, उल्हसित आणि मजेत राहावं, कोणतीही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडता कामा नये, कामाला सुरुवात केल्याबरोबर ताबडतोब बिनतक्रार, विनासायास यश मिळालंच पाहिजे, असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपली तशी इच्छा असते. इथपर्यंत ठीक आहे. परंतु आपण स्वत:कडून, इतरांकडून आणि परिस्थितीकडून तशी अपेक्षा करतो. आपल्या साऱ्याच अपेक्षा पूर्ण व्हायलाच हव्यात, अशी मनोमन अपेक्षा ठेवतो. प्रत्येक अपेक्षेच्या पोटी अपेक्षाभंग होण्याची शक्यता असते. अवाजवी आणि अवास्तविक अपेक्षांचा भंग तर पदोपदी होतो. व्यायाम केल्यावर ताबडतोब उत्तम शरीरयष्टी लाभली पाहिजे. डाएट सुरू केल्यावर त्याचे रिझल्ट लगेच मिळायला हवेत. अभ्यास करताना आपण तात्कालिक गमतीजमती सोडायला तयार नसतो, कारण अभ्यासाचं फळ सत्वर मिळत नसतं. अशा अनेक सूक्ष्म अपेक्षा आपल्या अंतर्मनात घोंघावत असतात. त्या उफाळून बाहेर आल्या की अपेक्षाभंग आणि त्यातून कंटाळा निर्माण होतो.
अनेकदा कंटाळा टाळण्यासाठी आपण स्वत:चं लक्ष अन्यत्र वेधण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, चित्रपट किंवा इतर मनोरंजन. परंतु चित्रपट असो की नाटक, तासा-दोन तासांत आटपणारच. मन इतर ठिकाणी वळवून पुन्हा कंटाळ्याच्या मूळ पदावर येतंच. आणि मग सुरू होतं स्वत:ला कसल्यातरी निकृष्ट गोष्टीत अडकावून टाकण्याचं व्यसन!
कंटाळा ही भावना वाटते तितकी टाकाऊ नाही. काही काळ कंटाळा आला तर काय बिघडलं? मन सदैव उल्हसित, आनंदित कसं राहणार? संगणक म्हटला तरी तो अधूनमधून हँग होतोच ना? आपण खरंच लवकर, झटपट, सत्वर, तत्क्षणी हवं ही मागणी सोडली की आपोआप मन चिकाटी धरू शकतं. कंटाळा आला तर त्याकडे दुर्लक्ष करायचं, कंटाळा आला तर म्हणून सोडून द्यायचं...
वाचून कंटाळा तर नाही ना आला?  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link