Next
परोपकाराचे समाधान
वासंती वर्तक
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story

प्रवासाला निघालेला आठ-दहा जणींचा गट. सगळ्या वर्षानुवर्षांच्या सख्या, मीच त्यांच्यात नवीन. त्या सगळ्या अमृतमहोत्सवी, पण खळखळाट आणि आनंद पंचविशीला साजेसा. निर्झरासारखा खळाळता! पहिल्या विसाव्याच्या थांब्यावर तहानलाडू, भूकलाडू झालं. तरी गप्पा रंगलेल्या. एवढ्यात एक बाई उठून उभ्या राहिल्या. पेपरप्लेट, ग्लास गोळा झाले. कुणी टेबल पुसलं. कुणी सामान उचचलं. कुणी खुर्चीच्या मागे कुणाचं सामान राहिलं नाही ना, ते तपासलं. आणि दोन मिनिटांत दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्यासुद्धा.
मला आश्चर्य वाटलं. या शांत-सौम्य चेहऱ्याच्या बाईंचा एवढा धाक? नंतर सहवासातून लक्षात आलं की या कुमुदताई; तुमच्या लक्षात येण्यापूर्वीच तुमच्या पुढच्या प्लेट उचलून टेबल आवरून टाकतात. कुणाची नजर नुसती पाण्याच्या बाटलीकडे गेली तरी स्वत: उठून पेला भरून देतात. समोरचा माणूस संकोचतो, अवघडतो, पण त्याला कुमुदताईंचा इलाज नसतो. धाक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नाही, हा धाक त्यांच्या सहज-सेवावृत्तीचा आहे. त्या हाडाच्या स्वयंसेवक आहेत. गंमत म्हणजे त्याच ओशाळून म्हणतात, “मी मुद्दाम तुम्हाला खजील करण्यासाठी नाही करत हो असं!” किती गोड आहे हा धाक... किती दुर्मिळ!
दुसऱ्यांची सेवा करणं, इतरांना आनंद द्यायला धडपडणं हे कुमुदताईं आठल्ये यांचं जीवनच आहे; जीवनाचा एक भाग नव्हे. म्हणून तर ‘इंडियन एअरलाइन्स’मधून उच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या पुण्याच्या ‘निवारा’ संस्थेत आपणहून गेल्या. संचालिका निर्मलाताई सोवनींना म्हणाल्या, “तुम्ही सांगाल ते काम मी नियमित करेन. रोज दोन-तीन तास संस्थेसाठी देईन.” वेळ दुपारच्या जेवणाची होती. निर्मलाताई सहज म्हणाल्या, “चला, वाढायला येता जेवण?” बस्स, आज १८ वर्षं रोज ११ ते १ या वेळेत कुमुदताई तुम्हाला ‘निवारा’च्या स्वयंपाकघरात किंवा जेवणघरात दिसतील.
पहिल्याच महिन्यात कुमुदताईंनी जेवण वाढायची पद्धत बसवून दिली. ओळख वाढली तसं निरीक्षण करून वृद्धांच्या आवडीनिवडी, तब्येतीच्या तक्रारी लक्षात ठेवल्या. तेच नेहमीचं जेवण पण आपुलकीनं, विचारपूस, हसतखेळत वाढलं की दोन घास जास्त जातात. व्यक्तिगत चौकशीनं वृद्ध मंडळी सुखावतात. कुमुदताई ‘निवारा’त सर्वार्थानं रमल्या. वृद्धांना हस्तकलेच्या वस्तू शिकवणं, कागदी फुलं करून घेणं, कार्यक्रम बसवण्यात मदत करणं... त्या त्यांच्या कुटुंबीय बनल्या.
‘सिप्ला’नं पुण्यात कॅन्सर सेंटर उभारलं. सेवादलाच्या प्रभुभाई सिंघवींनी कुमुदताईंना ‘तिकडे जाऊन ये’ असं सुचवलं. कुमुदताईंच्या मैत्रीण ज्योत्स्ना पाखरकर तिथे रुग्णांना हस्तकला शिकवायला येत. त्यांना कुमुदताई मदत करू लागल्या. या छोट्या-मोठ्या निर्मितीच्या आनंदात रुग्णांचं मन रमतं. संस्थेत आलेल्या VIP पाहुण्यांना कुणाचा गुच्छ द्यायचा याची अहमहमिका चालते.
कुमुदताईंचा आवाज विलक्षण गोड, कविता-गाणी यांचं उदंड पाठांतर. मग सुरू झाला भजनवर्ग. रुग्ण दोन तास आनंदाचे डोही डुंबू लागले. ‘सिप्ला सेंटर’चा एक रुग्ण बरा होऊन कामाला लागला, तरी गेली दहा वर्षं दर मंगळवारी भजनवर्गाला आवर्जून येतो. त्या आनंदानं आपल्याला संकटकाळात बळ दिलं अशी त्याची श्रद्धा आहे. कुमुदताई म्हणतात, “त्यांना बरं करणं आपल्या हातात नाही. मग जमेल तेवढा आनंद तरी देऊ या.”
गेली १७ वर्षं ऊनपावसाची तमा न बाळगता आपल्या स्कुटीवरून कुमुदताई शहरापासून दूर ‘सिप्ला सेंटर’ला जात आहेत. पुण्याच्या ट्रॅफिकमधून असं जाणं त्यांच्या मुलांना अस्वस्थ करतं. सुनेला काळजी लावतं, म्हणून याच महिन्यापासून कुमुदताईंनी ‘सिप्ला सेंटर’ला जाणं थांबवलं आहे.
कुमुदताईंना स्वत:विषयी बोलायला लावणं कठीण होतं, पण एक परवलीचा शब्द उपयोगी पडला. “अचानक साठीनंतर ही सेवावृत्ती कशी उमलली?” आणि त्या बोलायला लागल्या. वडील प्रभात कंपनीत फोटोग्राफर, लॅबतज्ज्ञ होते. कामाचे तास, अर्थप्राप्ती, प्रवास... सगळंच अनिश्चित. आई सर्वार्थानं आदर्श गृहिणी. वडिलांनी जे-जेवढं घरात आणलं त्यात आईनं मुलांचं शिक्षण, पै-पाहुणा उत्तमरीत्या सांभाळलं. आई त्या काळातली पदकविजेती कबड्डीपटू. त्यामुळे कुमुदताईंवर व्यायामाचे संस्कार झाले होते. श्वसनाचा नियमित व्यायाम, योग, ध्यानधारणा यांमुळे आजवर दुखण्यानं स्पर्श केला नाही. कुटुंबापलिकडे प्रत्येकाला आनंदात ठेवण्याचा वसा बहुधा आईकडून मिळाला. मॅट्रिक आणि STC झाल्यानंतर वडिलांचे स्नेही भाऊराव आठल्ये यांच्या मुलाशी, भास्कररावांशी कुमुदताईंचा विवाह झाला. भाऊराव आठल्ये म्हणजे कऱ्हाडे ब्राह्मणसंघाचे संस्थापक. त्यांनी अनेक लग्नं जुळवली. कोकणातल्या लोकांना कुमुदताईंचं पुण्यातलं माहेर आणि मुंबईतलं सासर अशी आधारघरं होती. भास्कररावांनाही हाच वसा लाभला होता.

एअर इंडियात असलेल्या भास्कररावांशी विवाह झाल्यानंतर वर्षभरात कुमुदताई त्यांच्याबरोबर कोलंबोला गेल्या. तिथेही या दोघांनी तिथल्या भारतीयांना जोडून ठेवलं. श्रीलंकेत गेलेल्या भारतीयांचा पाहुणचार केला. भास्करराव आठल्ये हे दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांनी कुमुदताईंच्या अनेक गुणांना, कलाप्रेमाला त्यांनी खतपाणी घातलं. पत्नीला आवर्जून बी.ए. करायला लावलं, घरी अभ्यास करून. जणू हा नियतीचा संकेत होता. अवघ्या १३ वर्षांच्या संसारानंतर भास्कररावांचं दिल्ली विमानतळावर झालेल्या अपघातात निधन झालं. क्रॅश लँडिंगनंतर खरं तर ते सुखरूप बाहेर आले होते. त्यांनी दहा-बारा जणांना सुखरूप आणलंही होतं. नंतर एका आवाजाला, मदतीच्या हाकेला प्रतिसाद म्हणून ते विमानाकडे धावले आणि मृत्युमुखी पडले.  कंपनीनं कुमुदताईंना सन्मानानं सेवेत सामावून घेतलं. या हौशी, कलासक्त, वाङ्मयप्रेमी गृहिणीनं अकाउंटपासून काउंटरवर किमान चार भाषांत बोलण्यापर्यंत सर्व कामांचं ट्रेनिंग घेतलं आणि कंपनीत स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. तिथेही त्यांना सगळे सहकारी कौतुकानं ‘महात्मा गांधी’ किंवा ‘गांधीबाबा’ म्हणत. परोपरकार आणि शाब्दिक हिंसासुद्धा वर्ज्य अशा कुमुदताई लोकप्रिय तर होत्याच शिवाय अनेकवेळा Excellence Award नं गौरवल्या गेल्या. मुलं उत्तम शिकली. लग्नं झाली. कुमुदताईंनी दु:ख आणि सुखही समान भावनेनं मागे टाकलं. सहजपणे निवृत्तीनंतरचं जीवन आखलं आणि सहजपणे दुसऱ्यांना आनंद देत आहेत. सेवावृत्ती त्यांच्या नसांतून वाहते आहे, त्याला त्यांचा काय इलाज?
अशा लोकांना परमेश्वरानं शंभरपेक्षाही जास्त आयुष्य द्यावं, कारण त्यांच्या सेवाव्रताला शंभर वर्षं अपुरीच पडतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link