Next
गोडी अपूर्णतेची
डॉ. शिरीषा साठे
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

१२ मेचा रविवार. Mother’s Day. विविध व्हॉट्सअॅपचे ग्रुप शुभेच्छांनी ओसंडून वाहत होते. विविध मॉल, दुकानांच्या विविध गोष्टींवर २५ टक्के डिस्काउंट मिळतील अशा जाहिराती पेपरमध्ये मोबाइलवर झळकत होत्या.
दुसरीकडे एका वर्तमानपत्रात एका सर्वेक्षणाविषयी बातमीचा मथळा होता ‘आयांना ताण सुपरवुमन होण्याचा’... नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या दोन्ही आपल्या हातून पार पडलेच पाहिजे, नाही तर आपण अपयशी ठरू, याचा ताण अनेक आयांवर आहे आणि त्या समुपदेशनाला जाऊ लागल्या आहेत.
या बातमीचा विचार करेकरेपर्यंत अजून एक बातमी वाचनात आली, तीही एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाविषयी होती. त्या बातमीचा मथळा होता- ‘मुलांना शिकवण्यासाठी पालकांनी अधिक अभ्यास करण्याची गरज.’
विचार करायला पाहिजे. नाही का? पालक असण्यात नेमकं काय अभिप्रेत आहे?
मुलांना सुखसोई पुरवण्यासाठी जिवाचा आटापिटा करणं म्हणजे पालकत्व? मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपण धडपड करणं म्हणजे पालकत्व? मुलांच्या प्रगतीसाठी त्याला विविध बाबतींत बाहेरून मदत मिळवणं- क्लास, कोचिंग, ट्युशन इत्यादी म्हणजे पालकत्व? या सगळ्यांसाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी कष्ट करणं म्हणजे पालकत्व? कुठून आल्या या कल्पना? केव्हातरी या तपासून बघायला नको का?
सुपरवुमनना खंत कशाची वाटते यातील काही मुद्दे सर्वेक्षणातून समोर आले आहेत. त्यातील एक मुद्दा म्हणजे नोकरीमुळे मुलांना वेळ देता येत नाही, मुलांना पाळणाघरात ठेवावे लागते, मूल एकटे राहते...
मुलांना द्यायला वेळ आणि मुलांना सुखसोयी देण्यासाठी लागणारा पैसा या दोन्ही गोष्टी एकावेळी भरपूर देता येणं शक्य नाही, हे पहिल्यांदा आपण मान्य करुया. या दोन्ही गोष्टी जमल्या तरच आपण आदर्श पालक होतो हेही डोक्यातून काढून टाकुया. आदर्श पालक होण्याऐवजी चांगले आणि आनंदी पालक होउया. म्हणजे नेमकं काय करयाचं?
पहिला मुद्दा मुलांना वेळ देण्याचा. एक-दोन पिढ्या अलिकडेपर्यंत नोकरी करणाऱ्या आया तुलनेने कमी होत्या. गृहिणी आयांची संख्या बरीच जास्त होती, पण घरी असणाऱ्या आया मुलांना वेळ देत होत्या का? त्यांना घरातली कामं, आला गेला, वृद्ध व्यक्तीच्या जबाबदाऱ्या, पैशांची काटकसर करण्यासाठी स्वत: केलेली कामं... यामध्ये मुलांना ‘द्यायला’ वेळ कुठे होता? मुलं आपली कामं स्वत: करत होती. शाळा, अभ्यास आपला आपण बघत होती. शिवाय घरातील काही कामांमध्येही सहभाग घेत होती. यातून आपोआपच जबाबदारीचं भान येत होतं. आपण कुटुंबाच्या केंद्रस्थानी नसून कुटुंबाचा एक भाग आहोत, हे समजत होतं. ज्या पालकांच्या आया गृहिणी होत्या त्या पालकांनी आठवून बघावं. ज्या आया परिस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे नोकरी करत होत्या त्यांच्या मुलांना थोड्या सुविधा जास्त मिळत होत्या. आणि त्याचा मुलांना आनंद होता. शेजार-पाजारी किंवा एखाद्या नातेवाईकाकडे ‘सांभाळायला’ ठेवले असेल तर त्यात आपल्याकडे आई दुर्लक्ष करते आहे, आपल्यापेक्षा तिला पैसा महत्त्वाचा आहे अशी भावना प्रकर्षाने मुलांच्या मनात निर्माण होत होती, असेही घडत नव्हते. ज्या पालकांच्या आया नोकरी करत होत्या त्यांनीही त्यांचं बालपण आठवून बघावं.
नियमाला अपवाद होते ते प्रत्येकच परिस्थितीत असतात. आजच्या सर्व पालकांनी आपलं बालपण आठवावं- त्यांच्या आया नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी कोणीही असल्या तरी त्या वेळ देत नव्हत्याच आणि त्यामुळे आपण बिनमहत्त्वाचे आहोत, दुर्लक्षित आहोत, आपल्यावर आपल्या आईचं प्रेम नाही असं काही प्रकर्षानं वाटलं होतं का? याचं उत्तर बहुधा ‘नाही’ असावं असं मी गृहित धरते. मग पालकत्वाचा ‘वेळ देणे’ हा निकष आला कुठून?
आपल्याला मदत लागली, कशाची गरज भासली तर आपले पालक आपल्यासाठी आहेत ही खात्री मुलांना वाटणं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वेळ, पैसा आपल्यापरीने देण्याचा प्रयत्न ते करतील हा विश्वास मुलांच्या मनात निर्माण होणं महत्त्वाचं आहे. आपली प्रत्येक अपेक्षा हवी तेव्हा, हवी तशी, हवी तितकी पूर्ण होत नाही. तशी गरजही नाही आणि अशा परिस्थितीतही सर्वसाधारण आनंदाने राहता येतं, ही धारणा मुलांमध्ये रुजणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्ती आपापलं आयुष्य आपापल्या परीने जगत अस ते. तसंच आपलं आयुष्य आपण घडवायचं असतं, या धारणेची पायाभरणी याच अनुभवातून होत असते. आईवडील, कुटुंब समाज, जग आपल्यासाठी असतं पण ते आपलं दणं लागत नाहीत, हे नकळतपणे अशाच अनुभवांतून कळत जातं. हे कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पुढच्या आयुष्यात ही मुलं कुठल्याही यंत्रणांच्या केंद्रस्थानी असणार नाहीत, तर ती यंत्रणांचा भाग असणार आहेत. त्यांना फक्त घेणाऱ्याच्याच भूमिकेत राहता येणार नाही तर देणाऱ्याची भूमिकाही तितक्याच जबाबदारीने घ्यायला लागणार आहे.
मुलांच्या विचाराची ही बैठक निर्माण होणं, हा पालकत्वाचा मोठा भाग आहे. पालकांनी मुलांशी गप्पा मारताना ती स्पष्टता मुलाला आणून दणं महत्त्वाचं आहे आणि मुख्य म्हणजे (१) आपण पर्याय निवडतो तेव्हाच परिणामांचीही निवड आपोआप झालेली असते. (२) प्रत्येक पर्यायाचे परिणाम असतात. (३) कुठल्याही पर्यायाचे परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक याचं मिश्रण असतं.
या तीन गोष्टींबाबत पालक आणि मुलांना भान असणं नितांत गरजेचं आहे.
मुलांना आदर्श आईपेक्षा आनंदी आई जास्त गरजेची असते. माणूस असल्यामुळे चुका करणारी, माणूस असल्यामुळेच चुका दुरुस्त करणारीसुद्धा आई त्यांना हवी असते. अपरिपूर्ण आई त्यांना अधिक जवळची वाटते. कारण ती त्यांच्यामधल्या अपरिपूर्णतेचादेखील आनंदानं स्वीकार करते.
बालमानसशास्त्रावर पुस्तकं लिहिणाऱ्या एका लेखिकेचं एका पुस्तकातलं पहिलं वाक्य आहे- I was the best mother in the world till my first child was born.
‘माझं पहिलं मूल जन्माला येइपर्यंत मी या जगातील सर्वोत्कृष्ट आई होते.’
काय म्हणता? पटतेय ना? भेटू परत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link