Next
सारंगी
- मोहन कान्हेरे
Friday, January 04 | 03:00 PM
15 0 0
Share this story

हृदयाला भिडणारे, आर्त-व्याकूळ भाव श्रोत्यांच्या मनात निर्माण करणारे असे हे खूप पुरातन वाद्य आहे. अन्य वाद्यांच्या तुलनेत वाजवायला अत्यंत अवघड असे हे वाद्य तुम्ही मुलांनी हिंदी चित्रपटांतून अनेकदा पाहिले-ऐकले असेल. आमच्या पिढीने तरुण वयात ऐकलेली गाणी ‘पाओ छू लेने दो फूलों को’, ‘बेबसी हद से जब गुजर जाए’, ‘मैंने शायद तुम्हें पहले’, किंवा ‘उमराव जान’ चित्रपटातील सर्व गाणी सारंगीच्या अत्यंत मधुर साथीने कमालीची श्रवणीय झाली आहेत. मानवी आवाजाच्या खूप जवळचा आवाज या वाद्याला लाभला आहे. याला गायकीप्रधान वाद्य मानतात. भारतीय शास्त्रीय संगीतात, संवादिनी म्हणजेच पेटी सरसकट वाजवली किंवा साथीला घेतली जायच्या अगोदर, सारंगीचेच राज्य होते. लोकसंगीतात सूर साथीला सारंगीच असायची. पूर्वीच्या ‘इसराज’ नावाच्या वाद्याशी हे खूप मिळतेजुळते वाद्य आहे. सिंधी सारंगी, गुजराजन सारंगी अशी त्या त्या प्रांतवरून याला नावे मिळाली आहेत... आकाशवाणीवर संवादिनी (पेटी) या वाद्याला बंदी होती (वाद्याच्या मर्यादांमुळे) तेव्हा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सारंगीच वापरत असत. अनेक गायक, गायिका अन्य रंगमंचीय कार्यक्रमाकरता पहिली पसंती याच वाद्याला देत कारण पेटीपेक्षा अनेक बाबतींत ते उजवे होते, मधुर होते. या वाद्याची लांबी अंदाजे दोन ते सव्वा दोन फूट असते. गज उजव्या हातात घेऊन, सारंगीला जडवलेल्या तारांवर तो घासला जातो. डाव्या हाताच्या बोटांनी त्या तारांवर घर्षण केले जाते. या वाद्याचा गोडवा, त्याची घडण कशी केलेली असते यावर (आणि वादकाच्या हस्तकौशल्यावर) अवलंबून असतो. ध्वनी नियंत्रित करण्यासाठी नखाच्या वरच्या भागाचा उपयोग केला जातो. त्या कारणाने त्या ठिकाणी, खाचा पडतात. हे वाद्य आत्मसात करणे, हे असामान्य कौशल्य आहे. पं. रामनारायण, पं. ध्रुव घोष अशा अत्यंत कसलेल्या वादकांमुळे हे वाद्य लोकप्रियता टिकवून आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link