Next
मला वेड लागेल का?
डॉ. राजेंद्र बर्वे
Friday, August 30 | 04:00 PM
15 0 0
Share this story


“मला वेड लागेल का, या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं ना की मी सुटलो! खूप वेळा हा प्रश्न माझा मलाच विचारतो. एकदा आईबाबांना आणि ताईला हा प्रश्न विचारला. त्यावर उत्तरं मिळाली ती कशी ते सांगतो. तत्पूर्वी माझा प्रश्न विचारतो. मला... म्हणजे मला...” तो घुटमळला. “मला म्हणजे मला...” पुन्हा एकदा “मला... म्हणजे मला...”  असं करून दोनचार अावंढे गिळल्यावर त्याला धीर आला.

“मला... म्हणजे मला... वेड लागेल का? हा तो प्रश्न. यावर आईला विचारलं तर ती आधी बरीच रडली. मग म्हणाली,‘माझी काही चूक झाली तुला लहानाचं मोठं करताना, असं मला राहून राहून वाटतं.’ मग पुन्हा रडली. प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मग बाबांना विचारलं. ते आधी चिडले. पुन्हा विचारल्यावर म्हणाले, ‘तुझा प्रश्न ऐकून मला वेड लागेल.’

प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मग ताईला विचारलं. ती हसत सुटली आणि म्हणाली, ‘काय वेड्यासारखा प्रश्न विचारतोयस.’ असं म्हणून पुन्हा हसत सुटली. आणि डोक्यावर टपली मारून म्हणाली, ‘अगदीच कसा रे वेडा तू? असे कसे प्रश्न पडतात तुला?’

शेवटी मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाहीच. आता, तुम्ही उत्तर द्या. मला... म्हणजे मला...” पुन्हा दोन अावंढे, घुटमळणं आणि तो प्रश्न!

उत्तराच्या प्रतीक्षेत तो मान खाली घालून बसला. वय २६-२७. साधारण बरी नोकरी. शिक्षण बी.कॉम. आणि त्यावर दोन-चार कोर्स. दिसायला नीटस होता. शरीरयष्टीही चांगली होती, परंतु चेहऱ्यावरत तारुण्याचं तेज नाही की डोळ्यांत उमेद नाही. 

तो कामात प्रामाणिक होता. दोन-चार मोजके मित्र होते. लग्नाबाबत सांगताना तो म्हणाला- “मी लग्न करणार नाहीये. कारण मला वेड लागेल अशी भीती वाटते, हे मी समोरच्या पार्टीला सांगितलं की त्या नकार कळवतात.’ तेव्हा मला आईवडील खूप ओरडले, म्हणाले, ‘तुझा प्रश्नच वेड्यासारखा आहे. कोणाला वाटेल तू ऑलरेडी वेडा झाला आहेस!’ मग मी निर्णय घेतला की मुलगी बघणं वगैरे भानगडच नको. एरवी कामात लक्ष लागतं. उत्तम कामाबद्दल मला ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ’ चार-पाच वेळा मिळालाय. काम मनापासून करतो, कारण मन रिकामं झालं की तो प्रश्न उपस्थित होतोच. एकदा ऑफिसमध्ये कोणीतरी म्हटलं की तू तर वेड्यासारखं काम करतोस, त्यामुळे आमची गोची होते. तेव्हा शहाण्यासारखं वाग. इतकं काम करू नकोस. आणि सगळे हसले.” 

समीर त्याच्या मनातल्या त्या प्रश्नांनी किती हैराण झाला आहे, हे लक्षात आलं असेल. 

मित्रहो, अशा प्रकारच्या त्रासाला मानसिक रोग म्हणत नसून तो व्यक्तिमत्त्वामधला दोष आहे, असं शास्त्रसंमत आहे.

एकच विचार किंवा संवादाचा एखादा तुकडा मनात सतत घोळत राहतो. त्यामुळे मनात खूप नकारात्मक विचार येतात. समीरसारखे लोक त्यामुळे गोंधळून जातात. आपल्या शंका क्षुल्लक आहेत, हे कळत असूनही त्या मनातून जाता जात नाहीत. व्यक्त करण्याची उबळ वारंवार येते. समीर तोच तो प्रश्न विचारायला बावचळतो, तरी विचारल्याशिवाय त्याला राहवत नाही. विचारलं तर थट्टामस्करी होते आणि त्यामुळे त्याच्यावर नकळकतपणे एकटेपण लादलं जातं. न विचारलं तर मनात सतत भीतीचा कल्लोळ होत राहतो.

समीरच्या मानसिकतेमुळे त्याच्या पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या, भाऊबहिणीच्या मनात करुणा आणि अनुकंपा निर्माण व्हायला हवी. या मानसिक त्रासाला ‘व्यक्तिमत्त्वामधला मंत्रचळ’ म्हणतात. अनेक वर्षं यावर प्रभावी औषधोपचार नव्हते, कारण मनात विचारांचा हा भोवरा का निर्माण होतो, यावर वैज्ञानिक बुचकळ्यात पडले होते. आता वैज्ञानिक संशोधनानं या विकाराचं ‘मूळ’ जीवरासायनिक असल्याचं सिद्ध केलं आहे. सिरोटोनिन या जीवरसायनाचं संतुलन बिघडतं अथवा योग्य प्रकारे संक्रमण होत नाही आणि कॉम्प्युटर हँग व्हावा तसा विचार जिथल्या तिथे अडकतो. ‘या रसायनाचं संक्रमण सुरळीत करण्यासाठी  औषधं उपलब्ध आहेत.’ हे ऐकताक्षणीच समीरच्या चेहऱ्यावरचा तणाव हलका झाला. तू तो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतोयस, उत्तर ऐकून तुझं समाधान होत नाही, हा मानसिक दोष वाटत असला, तरी मुळात ती मेंदूच्या जीवरसायनांची अव्यवस्था आहे. 

“म्हणजे औषधोपचार केले की मला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारावाच लागणार नाही. मला तर वेड लागणार नाही, याची खात्री सगळ्यांनी दिली आहे. माझी खात्री पटली आहे.”

“अगदी बरोबर समीर, तुलाही हे ठाऊक आहे, पण मनात तोच तो प्रश्न निष्कारण उपस्थित होत होता आणि त्यामुळे तो हैराण होऊन प्रश्न विचारण्याची तुला प्रबळ इच्छा होत असे. ती तू टाळू शकत नव्हतास. औषधांच्या मदतीनं तो प्रश्न मनात पुन्हा पुन्हा उपस्थित होणार नाही. आणि मनात आला तर तू शांतपणे त्याकडे दुर्लक्ष करू शकशील!”

“खरंच?!” समीर हसत म्हणाला. 

हा प्रश्न निर्थरक आहे हे कळत होतं, पण ते वळवण्यासाठी मानसोपचार आणि औषधोपचार असतात हे ठाऊक नव्हतं. समीरच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित पसरलं होतं!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link