Next
एका रात्रीत उद्ध्वस्त झाले तिवरे!
धीरज वाटेकर, चिपळूण
Friday, July 05 | 01:30 PM
15 0 0
Share this story


कुणी आपली दुचाकी वाचवायला गेला, तो परतलाच नव्हता. कुणी जेवायला बसलेला तो उठूच शकला नाही. लहानग्या शाळकरी मुलांनी तर डोळ्यादेखत आपले घर गमावले होती. एका रात्रीत धरण फुटून होत्याचे नव्हते झालेल्या चिपळूणच्या तिवरे गावची ही ओळख क्लेशकारक होती. चिपळूणहून तिवरेकडे जाताना वाटेत लागलेल्या नदीच्या दोन्ही पात्रांभोवतीचा निसर्ग अस्ताव्यस्त झाला होता. उन्मळून पडलेले वृक्ष, विस्कटलेली घरे आणि पाण्याखाली गेलेली शेती हे चित्र तिवरे गावातील शोकांतिका कथन करत होते.
ही दुर्घटना घडल्याचे चिपळुणात अनेकांना मंगळवारी रात्रीच समजले. प्रशासन सतर्क झाले. बुधवारी सकाळी-सकाळी अनेकजण तिवरेकडे धावले. सह्याद्रीतील प्राचीन बैलमारव घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेले तिवरे हे निसर्गरम्य गाव. आज मात्र गावात जाताना त्या वातावरणाकडे बघवत नव्हते. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह असंख्य बघ्यांचीही गर्दी उसळल्याने सकाळीच रिक्टोली फाट्याच्या अलिकडे वाहतूककोंडी झाली. चिपळूणच्या पर्यटनात ‘तिवरे’ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. मंगळवारी धरण ओसंडून वाहू लागले. अगोदर धरण जिथून फुटले होते, तिथून खालून गढूळ पाणी येत होते. धरणातून गळती होत होती. धरणाच्या गळतीचा विषय किमान चार वर्षे जुना आहे. गावात तीन वर्षे त्याची चर्चा होती. वृत्तपत्रांतून त्याला वाचा फोडण्यात आली होती. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या स्तरावर या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. तरीही हे कुणाला थांबवता आले नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
या दुर्घटनेत तिवरे गावाच्या भेंदवाडीतील सारी घरे व गणपतीचे मंदिर वाहून गेले. ११ कुटुंबे उद्ध्वस्त झाली. २३ जण बेपत्ता झाले, त्यापैकी गुरुवारपर्यंत ११ जणांचेच मृतदेह सापडले होते. किमान ३५ जण विस्थापित झालेत. मृतदेह शोध मोहिमेत एन.डी.आर.एफ.चे पथक आणि त्यांच्या मदतीला स्थानिकांसह साताऱ्याचा सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुप, रत्नागिरीचा जिद्दी माउंटेेनिअरिंगचा ग्रुप कार्यरत आहे. धरणातील पाण्याच्या अजस्त्र लोंढ्यामध्ये मृतदेहांची आदळआपट झाल्याने त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. विस्थापितांना अनेकांनी आपापल्या परीने मदतीचा हात देऊ केलाय. तिवरे ग्रामस्थांनीच त्याची सुरुवात केली. सरकारची यंत्रणा, वैद्यकीय सेवा, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही तिवरेत पोहोचले. तातडीची गरज जाणून घेऊन या संस्थांनी आठवड्याभराच्या जेवणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. तातडीच्या गरजांमध्ये लागणारे अन्नधान्य, कपडे, भांडी, पाणी असे शाळेत जमा झाले आहे. संपूर्ण दिवसभर लोक मदत घेऊन आपणहून तिवरेकडे धाव घेत होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रत्नागिरीहून कोणीतरी पाचशे वडापाव घेऊन आले होते. कठीण काळात समाज एकवटलेला दिसला.    
तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या पूर्व टोकाला आहे. हा भाग दुर्गम आहे. २.४५२ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण सन २००० साली पूर्ण झाले. तिवरे धरणफुटीत भेंदवाडी पाण्याखाली गेली. स्थानिकांनी या घटनेला प्रशासनालाच जबाबदार धरलेय. त्यांचा पत्रव्यवहारही तेच सांगतो आहे. सरकारी कारभार लोकांच्या जिवाशी खेळल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. यातल्या दोषींवर कारवाई होईलही ! मात्र घटनेत ज्यांनी जीव गमावले ते परत कसे मिळणार, या तेथील लोकांच्या आक्रोशावर कुणाकडे उत्तर नाही. जे वाचले आहेत, त्यांचे निवारेच गेल्यामुळे त्यांच्यापुढेही जगण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. तिवरेवासियांना ही काळरात्र विसरणे कठीण आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link