Next
चालीत गुंफले शब्द
- डॉ. नीलिमा गुंडी
Friday, June 07 | 12:00 AM
15 0 0
Share this story

मुलांनो, मराठीत वेगवेगळ्या वृत्तांमध्ये रचलेल्या कविता तुम्ही वाचल्या असतील. कवितेत शब्द गुंफण्याचे अनेक प्रकार असतात, बरं का!
अक्षराचा उच्चार (हस्व की दीर्घ), अक्षरांचा क्रम, अक्षरांची संख्या अशा काही गोष्टींच्या आधारे वृत्ताची रचना होत असते. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त असे त्यांचे प्रकार आहेत. मात्रावृत्तात ओळीतली अक्षरांची संख्या महत्त्वाची नसते. त्यात मात्रा (म्हणजे अक्षराच्या उच्चाराला लागणारा वेळ) महत्त्वाची असते. अक्षरगणवृत्ताचं एक उदाहरण म्हणजे संत रामदास यांनी ‘मनाचे श्लोक’ ज्यात रचले आहेत, ते भुजंगप्रयात वृत्त. मालिनी, वसंततिलका अशी इतरही अनेक वृत्तं आहेत. चंदनवृक्षाचं वेगळेपण सांगणारी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची ही पृथ्वी वृत्तातली रचना चालीवर म्हणताना किती मजा वाटते!
“जयास न दिली, फळे न कुसुमेहि दैवे  जरी
शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी
वनी विलसती बहू विविध वृक्ष चोहीकडे
तयांत मज चंदनासम न एकही सापडे.”
वृत्तामध्ये ओळ म्हणताना कुठे थांबायचं, हेही ठरलेलं असतं. त्यामुळे अशा कविता ऐकताना आपले कान अगदी टवकारलेलेच राहतात आणि चालीमुळे त्या पटकन पाठही होतात!
मात्रावृत्ताचं एक उदाहरण म्हणजे  आर्या. मोरोपंतांच्या आर्या  प्रसिद्ध आहेत.
“सुश्र्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची”
या आर्येत चार कवींची वैशिष्ट्यं गुंफली आहेत. काहीवेळा एकाच कवितेत वेगवेगळी वृत्तंही वापरलेली असतात. दा. वि. फफे यांची ‘फुलांचे भांडण’ ही जुनी कविता आहे. त्यात गुलाब, जाई, जुई, चाफा, शेवंती आणि  मोगरा ही  फुलं वेगवेगळ्या वृत्तांत बोलतात. त्यामुळे नाट्य निर्माण होतं. प्रत्येक कडव्याची चालही बदलते! अशावेळी भांडण अगदी रंगतं, हे सांगायलाच नको!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link