Next
कला संस्कृतीचे वै‌भव
अनिल ठाणेकर
Friday, November 02 | 04:00 PM
15 0 0
Share this storyमुंबई बेट असताना त्याही अगोदरपासून ठाणे शहर हे श्रीस्थानक म्हणून जगाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कामगिरी बजावत होते. शिलाहार राजांच्या काळात म्हणजे इसवी सन नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत शिलाहार साम्राज्याची राजधानी म्हणून श्रीस्थानकाचा, शिलाहारांच्या शिलालेख व ताम्रपटापातून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वेध घेता येतो. खरे तर शिलाहारांच्या पूर्वीपासून सातवाहन व मौर्यकाळातही ठाण्याचा उल्लेख आढळतो.
कान्हेरी या बौद्ध लेण्यांपासून सोपाऱ्यातील स्तूपापर्यंत पसरलेल्या खाडी व डोंगराच्या मार्गात होणारा व्यापाऱ्यांचा व्यवहार, खाडीमार्गे जलप्रवास आणि धार्मिक व सांस्कृतिक घडामोडी कान्हेरी लेण्यात केंद्रित झालेल्या आढळतात. व्यापारी, धार्मिक व सांस्कृतिक कारणासाठी घारापुरी बेट व चौल येथे जाताना मुक्कामाचे ठिकाण म्हणूनही ठाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले होते. वसई, कल्याण आणि मध्यवर्ती ठाणे जलमार्गाने तर कापण, भिवंडी, मेहूल, लोमाड, चेंबूर, नाहूर, तुर्भे, बेलापूरपट्टीतील गावांना जोडणारे चांगली रसद पुरवणारे, वस्तीचे ठिकाण म्हणून स्थानक किंवा थांबण्याचा ‘तिठा’ म्हणूनही ठाण्याला महत्त्व प्राप्त झाले होते. इथल्या भूमिपुत्रांचे, पाहुण्यांचे स्वागत करण्याचा आपलेपणा आणि त्यांच्या लोकगीतांचे सांस्कृतिक वैभव इथूनच फुलले होते.


प्राचीन मंदिरांचा ठेवा

शिलाहार काळात ठाणे अर्थात ‘श्रीस्थानक’ हे राजधानीचे शहर म्हणून विकसित झाल्याने ठाण्याचे सांस्कृतिक वैभवही भरभराटीला आले. शिलाहार राजे प्रामुख्याने शिवउपासक असल्याने त्यांनी शंकराच्या पूजाअर्चेसाठी मंदिरे उभारली. याचबरोबर ब्रह्मा, विष्णू, आदित्य, भगवती, महालक्ष्मी या देवतांचीही मंदिरे उभारली. ठाण्यातील उत्तरेश्वर, भिवंडी-दहसगावचे चातकेश्वर, लोमाडचे पोपेश्वर महादेव, व्योमेश्वर व लोणादित्य, मुरुडचे मरुडेश्वर, अंबरनाथचे अंबकेश्वर, राधानगरी कोल्हापूरचे गुंडाळेश्वर इत्यादी मंदिरे उभारण्याची माहिती शिलाहारांच्या ताम्रपटातून मिळते.
शिलाहार राजा झंझ याने ठाणे शहरात १२ शैवमंदिरे बांधली. या मंदिरांची बांधणी कलात्मक होती. येथे होणाऱ्या पूजाअर्चा, आरत्या आणि त्यासाठी जमलेले भाविक यातून उभे राहिलेले कलासंगीत, यामुळे राजधानी दररोज सकाळी-सायंकाळी उजळून निघत असे. यावेळी प्राचीन ठाण्याचे सांस्कृतिक रूप मंदिराच्या भोवती आकारास येत होते. परंतु सोळाव्या शतकात पोर्तुगीज आक्रमकांनी येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. येथील सांस्कृतिक वैभवाचा विध्वंस केला. आजही ठाण्यात अनेक ठिकाणी सापडणाऱ्या भग्नमंदिरांचे अवशेष व दैवतांच्या मूर्ती या गतवैभवाच्या उज्ज्वल आठवणी जाग्या करतात.
मंदिरांतील सांस्कृतिक जीवन

ही सर्व मंदिरे उत्तर भारतातील नागरशैलीची व भूमिज पद्धतीची आहेत. बहुतेकांची बांधणी, राजस्थान-मध्य भारतातील परमार, गुर्जर व सोळंखी मंदिरांप्रमाणेच आहे, तर त्यांच्या अलंकरणावर व मूर्तिशिल्पावर दक्षिणेतील चालुक्यशैलीचा प्रभाव आढळतो. मंदिरांची रचना प्रथम गाभारा किंवा गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुख्यमंडप व शेवटी नंदीमंडप या क्रमाने दिसून येते. कातीव व कोरीव दगडी काळ्या चिऱ्यावर ठेवून भारसंतुलनाच्या आधारे ही मंदिरे उभारण्यात आली.
महत्त्वाचे म्हणजे ही मंदिरे केवळ अध्यात्माचीच प्रतीके नसून त्यांच्या बांधणीत गणित, भूमिती, गुरुत्वाकर्षण, खगोलशास्त्र यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला दिसतो. मंदिरांचा गाभारा आतून चौरस व बाह्य भाग ताराकृतीचा किंवा अनेक कोनांचा असतो. गर्भगृहावर लहान होत जाणाऱ्या आडव्या दगडी पायऱ्यांचा आयताकार मूळ इमारतींच्या आकाराच्या लहान प्रतिकृतीच असतात. यातून शिखर बनत जाते आणि शेवटी कळसावर ‘स्तूप’ही असते.
मंदिरात देवादिकांच्या कोरलेल्या प्रतिमा, साधू, बटू, अप्सरा यांची शिल्पे हा वास्तुशिल्पाचा अप्रतिम नमुना तर आहेच, शिवाय या शिल्पांतून भाविकांना भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांच्या कर्मफळाची कथाही सांगितली जाते. प्राचीनकाळी सांस्कृतिक घडामोडी या मंदिरांशी निगडित असत. येथे मिळणारा आत्मिक आनंद आणि जगण्याचा बोध या कलेचा सुरेख संगम साधला जाई. ही भाविक किंवा आध्यात्मिक कृती माणसाला चांगले जगण्यासाठी प्रेरित करत असे. मंदिराच्या रूपाने उभे राहिलेले हे सांस्कृतिक जीवन मन प्रगल्भ करणारे असे.


सांस्कृतिक जीवनमान
कातकरी, वारली, ठाकूर, डोंगरकोळी या समाजांनी डोंगरकुशीत वस्ती केली, तर कोळी, आगरी, भोई या समाजांनी खाडीच्या, किनारपट्टीवर वस्ती केली. मासेमारी, शिकार, कंदमुळे, नाचणी, वरी, कुळीथ हा आहार करणाऱ्या या जमातींनी आपली बोलीभाषा, चालीरीती, गायन-वादन, नृत्यकला यांची निर्मिती केली. आजही वारलीजमातीचे तारपानृत्य, ठाकूर जमातीचे बोवाडानृत्य, वारली चित्रकला आदिम संस्कृतीचे दर्शन घडवतात. आगरी-कोळी समाजाचे नृत्य व गायन या समाजाचे सांस्कृतिक दर्शन घडवतात. आगरी समाजाच्या उत्पत्तीबद्दलची दंतकथा असे सांगते, की रामायणाच्या काळात आगरीसमाजात रावणमहिमा गाणारे गायक व वादक होते. यामुळे रावणाने खुश होऊन त्यांना खाडीकिनारी असलेल्या जमिनी शेतीच्या लागवडीसाठी दिल्या.

ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात ब्राह्मण, पाठारेप्रभू, चांद्रसेनीय कायस्थप्रभू यांचेही मोठे योगदान आहे. शिलाहारांनी धर्मशास्त्रात, निपुण ब्राह्मणांना ठाण्यात बोलावले आणि त्यांना भूमिदान, अर्थदान व ग्रामदान करून येथे वसवले. चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांचा पराभव केल्यावर पेशव्यांचा अंमल ठाण्यात सुरू झाला आणि अनेक ब्राह्मण कुटुंबांना सुभेदारी मिळाल्या. याच काळात ठाण्यातील प्रसिद्ध कौपिनेश्वर व अन्य मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. पाठारेप्रभू पैठणहून येथे आल्याने त्यांनी महालक्ष्मी, ललिता, जोगेश्वरी, पद्मावती, वद्रायणी, एकवीरा, चंडिका, वज्रेश्वरी, रुद्रायणी, साधालिका, रामेश्वरी या देवींची मंदिरे उभारली आणि स्वत:ची वेगळी संस्कृती जपली तर चांद्रसेनीय कायस्थप्रभू समाजाने ठाण्याच्या नागरी, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात मोलाची कामगिरी बजावली.

ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासात सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे, जनकवी पी. सावळाराम, पं. राम मराठे यांची नावे आदराने घ्यावी लागतील. वि. ल. भावे यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र सारस्वत’ व त्यांनी स्थापन केलेले मराठी पुस्तकांचे ‘मराठी ग्रंथसंग्रहालय’ हे पहिले ग्रंथालय, या त्यांच्या ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला दिलेल्या महत्त्वाच्या देणग्या आहेत. तर जनकवी पी. सावळाराम यांनी लिहिलेली ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘गोड गोजिरी लाज लाजिरी’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘विठ्ठल तो आला’, ‘घट डोईवर, घट कमरेवर’ आदी गाणी अमर झाली आहेत. सावळाराम यांच्या प्रतिभेचा गौरवसमारंभ करण्यासाठी ठाणे महापालिका दरवर्षी त्यांच्याप्रीत्यर्थ गौरवसमारंभ करते. याचप्रमाणे पं. राम मराठे अभिजात गायक, रंगभूमी, नाट्य-संगीतातील मर्मज्ञ व शास्त्रीय गायकीचे प्रणेते म्हणून ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासात अजरामर झालेत. स्वयंवर, एकच प्याला, मानापमान, संशयकल्लोळ, भावबंधन, मृच्छकटिक, रंगात रंगला श्रीरंग आदि नाटकांत त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या भूमिका केल्या. प्राचीन काळापासून शिलाहारकाळापर्यंत, ब्रिटिशकाळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत ठाण्याचे सांस्कृतिक जीवन गतिमान राहिले आहे. मंदिरातून सुरू झालेले हे सांस्कृतिक जीवन आता नाट्यगृहे, चित्रपटगृहे ते सभागृहात होणाऱ्या सांस्कृतिक मैफलीतून सातत्याने व्यक्त होऊ लागले आहे. ठाणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि या राजधानीची मुख्य केंद्रबिंदू म्हणून गडकरी रंगायतन, काशिनाथ घाणेकर, सहयोग मंदिर, मराठी ग्रंथसंग्रहालय आदि ठिकाणे उभी राहिली आहेत. ठाण्यात आता अशोक बागवे, अरुण म्हात्रे, प्रवीण दवणे, प्रज्ञा पवार यांसारख्या कवींनी ठाण्याची सांस्कृतिक ध्वजा उंच केलीय, तर आता अनेक अभिनेते, अभिनेत्री ठाण्याचे सांस्कृतिक वैभव समृद्ध करत आहेत. मराठी चित्रपटांचे, मालिकांचे होणारे चित्रीकरण हे ठाण्याच्या सांस्कृतिक केंद्राची जाणीव करून देते. ठाणे हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे मानबिंदू झाले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link