Next
दोन मनांच्या जुळता तारा...
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

“नुकत्याच शिकून आलेल्या तरुण पंडितानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचूकपणे देऊन साऱ्या दरबारावर आणि महाराजांवरही उत्तम छाप टाकलेली पाहून दरबारातल्या राजपंडिताच्या पोटात दुखायला लागलं,” सानिया सांगत होती, “राजपंडित म्हणाला, ‘आता जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंत तर मी पराभव पत्करेन. पण तुम्हाला उत्तर आलं नाही, तर तुम्हाला पराभव स्वीकारून राज्य सोडून जावं लागेल. सांगा बघू, आता माझ्या मनात काय विचार आहे?’ राजपंडितानं प्रश्न विचारला. तरुण पंडिताला राजपंडिताचा कुटिल डाव कळला. आपण दिलेलं उत्तर नाकारून राजपंडित आपला पराभव करणार, हे त्याच्या लक्षात आलं. तो हसून म्हणाला, ‘तुमच्याच काय, पण या दरबारातल्या प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे. तो म्हणजे, एवढे न्यायी आणि उदार महाराज आपल्यावर यावच्चंद्रदिवाकरौ राज्य करत राहोत.’ तरुण पंडिताच्या या उत्तरावर राजपंडिताला होकारार्थी मान डोलावण्यावाचून गत्यंतर उरलं नाही!”
“ही कथा म्हणून छान असली तरी दोन व्यक्तींचे मेंदू वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या मनातले विचार जुळणं केवळ अशक्य आहे.” प्रथमेशने आक्षेप घेतला.
“मेंदू दोन असले तरी काही वेळा विचारांमुळे मेंदूत निर्माण होणाऱ्या तरंगांचा आपापसांत ताळमेळ जुळून येतो, असं शास्त्रज्ञांना आढळलं आहे,” तनुजाताई म्हणाली, “अर्थात, यासाठी त्या दोन मेंदूंमध्ये आपापसांत एकाच गोष्टीविषयी सुसंवाद होत असायला हवा.”
“दोन मेंदूंच्या तरंगांमधला हा ताळमेळ शास्त्रज्ञांना सापडला तरी कसा?” अमनाने विचारले.
“मानवासारखे समाजशील प्राणी जेव्हा आपापसांत गप्पा मारतात, किंवा एखाद्या विषयावर विचारविनिमय करतात, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये घडणाऱ्या घडामोडींमध्ये काही साम्य असतं का, याची शास्त्रज्ञांना उत्सुकता होती,” स्वप्निलदादा सांगू लागला, “परंतु यासाठी माणसांचे मेंदू मापकयंत्रांच्या दावणीला दीर्घकाळपर्यंत बांधणं शक्य नसतं. म्हणून शास्त्रज्ञांनी प्राण्यांमध्ये याचा शोध घेतला. या शोधासाठी निवडलेल्या प्राण्याचा मेंदू विचार करण्याइतका प्रगत असायला हवा. शिवाय, तो प्राणी कळपानं एकत्र राहून आपापसांत विचारविनिमय करणाराही हवा. या दोन अटी पूर्ण करणाऱ्या प्राण्यांच्या समूहात मेंदूंच्या तरंगांमध्ये काही ताळमेळ आढळतो का, हे कळणं शक्य होतं.”
“मग माणसाखेरीज या दोन्ही अटी पूर्ण करणारा प्राणी शास्त्रज्ञांना सापडला का?” सोहमने विचारले.
“हो तर,” विद्याताई म्हणाली, “शास्त्रज्ञांनी यासाठी वटवाघळांची निवड केली. वटवाघळं ही कळपानं राहून आपापसांतल्या सुसंवादानं निर्णय घेतात. दोन वटवाघळांचा आपापसांत चालणारा सुसंवाद हा अर्ध्या मिनिटापासून कित्येक तासांपर्यंतदेखील चालू शकतो. त्यामुळे त्यांचे मेंदू अधिकाधिक एकमेकांशी जुळणारे ताल धरू शकतील, अशी शास्त्रज्ञांची अटकळ होती.”
“मेंदूचा ताल म्हणजे शास्त्रज्ञांनी नेमकं काय मोजलं?” मुक्ताने विचारले.
“मेंदू चेतापेशींचा बनलेला असतो,” स्वप्निलदादा म्हणला, “या चेतापेशींमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युततरंगांच्या रूपात मेंदूतली विचारप्रक्रिया मापकयंत्रावर साकार होत जाते. तसंच, एखाद्या विचारप्रक्रियेमध्ये एकाचवेळी अनेक चेतापेशी काम करत असतात. या चेतापेशींमध्ये होणारी देवाण-घेवाणही विद्युततरंगांच्या रूपातच होते. त्याचप्रमाणे विद्युततरंगांच्या देवाणघेवाणीतून चुंबकीय तरंगही निर्माण होतात. मापन करणाऱ्या यंत्रांच्या सहाय्यानं शास्त्रज्ञ हे विद्युततरंग आणि चुंबकीय तरंग उमटत असताना संगणकाच्या मदतीनं पडद्यावर पाहू शकतात आणि नोंदवूही शकतात. वटवाघळांच्या डोक्यावर मापनयंत्रं लावून शास्त्रज्ञांनी त्यांच्या मेंदूतले विद्युततरंग आणि चुंबकीय तरंग यांचा वेध घेतला.”
“यासाठी तर रुग्णालयात ज्याप्रमाणे रोग्याला झोपवून ठेवतात, त्याप्रमाणे त्या वटवाघळांना झोपवून ठेवावं लागेल. अशा परिस्थितीत घेतलेला त्यांच्या मेंदूंचा वेध हा मेंदूतल्या सर्वसाधारण घडामोडींचं प्रतिबिंब कसं ठरणार?” प्रथमेशने विचारले
“यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या डॉ. वुजी झांग आणि सहसंशोधकांनी वटवाघळांच्या डोक्यावर अतिशय हलकी अशी मापनयंत्रं बसवली,” राहुलदादा म्हणाला, “आपण कुठेही असलो तरी मोबाइल फोनच्या मदतीनं आपलं संभाषण तरंगरूपानं कुठेही पोचू शकतं. तसंच, ती वटवाघळं कुठेही फिरत असली तरी त्यांच्या मेंदूंमधल्या तरंगांचे आलेख प्रयोगशाळेतल्या संगणकांकडे पोचू शकतील, अशी व्यवस्था केली. मग दुसऱ्याला शिकवण्यासाठी, आपापसांत भांडताना किंवा प्रेम करताना सुसंवाद साधणाऱ्या दोन वटवाघळांच्या मेंदूंमधल्या तरंगांचे आलेख संगणकांवर एकत्र काढले. तेव्हा शंभर मिनिटांच्या काळात त्यांचे मेंदूतरंग एकमेकांशी जुळल्याचं आढळलं. तसंच, यातला कोणत्याही एका मिनिटाचा भाग विस्तारित केला तर त्या आलेखातही मेंदूतरंगांची जुळणी सातत्यानं कायम राहिल्याचं स्पष्ट झालं.”
“असे प्रयोग अन्य कोणत्या प्राण्यांवर केले गेले?” शाश्वतने विचारले.
“अशाच प्रकारचा अभ्यास शास्त्रज्ञांनी उंदरांवर केल्यावर त्यांच्याही सुसंवादात मेंदूतरंगांची जुळणी होत असल्याचं आढळलं,” विद्याताई म्हणाली, “एवढंच नव्हे, तर दोन उंदरांपैकी जो उंदीर वर्चस्व गाजवणारा असेल त्याच्याशी दुसऱ्या उंदराचे मेंदूतरंग जुळवून घेतात. मानवांवर प्रयोग करताना येणाऱ्या मर्यादांमुळे त्यांच्यावर दीर्घकालीन प्रयोग करणं शक्य झालं नाही. तरीही अतिशय थोड्या वेळात मानवांवर केलेल्या प्रयोगांमध्येही मेंदूतरंगांची जुळणी होत असल्याचं आढळलं.”
“या प्रयोगांचा काय उपयोग होईल?” सोहमने विचारले.
“या प्रयोगांचा उपयोग व्यसनाधीनता किंवा सहजपणे भारावून जाण्यामुळे होणारे मानसिक दुष्परिणाम यांचं निदान करण्यासाठी आणि विविध औषधांचा किंवा उपचारांचा मनोरुग्णावर होणारा परिणाम अजमावण्यासाठी होऊ शकेल, असं शास्त्रज्ञांना वाटतं,” स्वप्निलदादा म्हणाला, “ज्याप्रमाणे क्ष-किरणांमुळे मानवाच्या हाडांमधले दोष किंवा हाड तुटण्यासारख्या समस्यांचं निदान सहजपणे करून त्यावर उपचार करणं अधिक सोपं झालं, त्याप्रमाणे अन्य व्यक्तींशी संवाद होत असताना मेंदूतरंगांमध्ये उमटणारे बदल वापरून मनोरुग्णांच्या मनाचा अंतर्वेध घेणं शक्य होईल. यामुळे व्यसनमुक्त आणि मानसिक आजारांपासून मुक्त असा समाज निर्माण व्हायला मदत होईल.”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link