Next
लैंगिक क्रौर्याला दमदार विरोध
दत्ता पंचवाघ
Friday, October 26 | 04:00 PM
15 0 0
Share this storyडॉ. डेनिस मुकवेग हे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशाचे नागरिक. सततची यादवी आणि सशस्त्र संघर्ष यामध्ये कांगोमधील ६० लाखांहून अधिक नागरिक बळी पडले आहेत. या संघर्षात हजारो महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार झाले. अशा अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांवर उपचार करण्याचे कार्य डॉ. डेनिस मुकवेग १९९९ पासून करीत आहेत. कांगोमधील किवूसंघर्षात असंख्य महिला लैंगिक अत्याचाराच्या शिकार झाल्या. अशा महिलांवर उपचार करण्यासाठी डॉ. डेनिस मुकवेग यांनी बुकावू येथे पांझी इस्पितळ उभारले आणि त्या इस्पितळात डॉ. डेनिस मुकवेग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरश: हजारो महिलांवर उपचार केले. इस्पितळात उपचारासाठी आलेल्या महिलांची अवस्था अत्यंत वाईट असे. प्रतिदिन ते दहा शस्त्रक्रिया करीत. दिवसाच्या १८ तास कामातील बहुतांश वेळ या पीडित महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात जात असे. बलात्कार झालेल्या, त्यातून गर्भवती राहिलेल्या महिलांवर उपचार करण्याचेही काम त्यांना करावे लागे. त्यांना अनेकदा बंडखोरांकडून धमकाविण्यात आले. त्यांना जीवे मारण्याचे प्रयत्नही झाले, तरी त्यास धूप न घालता त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. या यादवीमध्ये लैंगिक अत्याचाराच्या शिकार झालेल्या महिलांच्या कहाण्या थरकाप उडवणाऱ्या आहेत. मनुष्य म्हणविणारा प्राणी किती क्रूर, किती बीभत्स कृत्ये करू शकतो, हे दाखविणाऱ्या आहेत.

डॉ. मुकवेग करीत असलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असली तरी लैंगिक अत्याचारांविरुद्ध जेवढ्या प्रमाणात आवाज उठविला जायला हवा, तेवढा उठविला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ‘जस्टिस इज एव्हरीवन्स बिझनेस’ असे डॉ. मुकवेग म्हणतात. ‘स्त्री-पुरुष, अधिकारी-सैनिक, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था या सर्वांनी यासाठी कार्य  केले पाहिजे’, असे त्यांचे म्हणणे आहे. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नसल्याबद्दल त्यांनी कांगोचे सरकार आणि अन्य देशांवरही टीका केली आहे. लैंगिक अत्याचाराचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ नये, यासाठी ते जे प्रयत्न करीत आहेत ते लक्षात घेऊन डॉ. मुकवेग यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी सार्थ निवड करण्यात आली आहे.

नादिया मुराद
इराकची नागरिक असलेली नादिया मुराद ही यझिदी या अल्पसंख्य समाजातील तरुणी! ‘आयसिस’च्या पाशवी अत्याचारास बळी पडल्यानंतर त्यांच्या तावडीतून पसार झाली. आता ती मानवी अधिकारांसाठी सर्वत्र आवाज उठवत आहे. इराकच्या सिनजार जिल्ह्यातील दुर्गम अशा कोचो नावाच्या खेड्यात राहणारी ही तरुणी. २०१४ मध्ये इस्लामी दहशवाद्यांनी तिच्या गावावर हल्ला केला. नादिया, तिच्या बहिणी आणि अन्य हजारो महिलांचे या दहशतवाद्यांनी अपहरण केले. अपहरण करण्यात आलेल्या ६३०० मुली व स्त्रियांवर इस्लामी दहशतवाद्यांनी अनन्वित लैंगिक अत्याचार केले. त्यांनी सुमारे ६०० जणांची हत्या केली. या दहशतवाद्यांनी या महिलांचा बाजारच मांडला होता. पकडलेल्या महिला वा मुलींपैकी हवी ती मुलगी निवडा, तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार करा, असे सर्व भयंकर प्रकार ते करीत  होते. नादिया मुराद ही तरुणीही अशा अत्याचारांना बळी पडली होती. तिच्यावर आणि अन्य महिलांवर जे भयानक अत्याचार झाले, त्याचे वर्णन ‘द लास्ट गर्ल : माय स्टोरी ऑफ कॅप्टिविटी’ या तिच्या पुस्तकात तिने केले आहे. त्यातील वर्णने वाचून अंगावर काटा उभा राहतो.

इस्लामी दहशतवादी गुळगुळीत पानांच्या नियतकालिकांमधून या तरुण मुली आणि स्त्रियांची छायाचित्रे प्रकाशित करीत असत. आपल्या संघटनेत तरुणांनी मोठ्या प्रमाणात भरती व्हावे, यासाठी अशी ‘लालूच’ त्यांच्याकडून दाखविली जात असे. अत्याचार सहन करीत असतानाच एक संधी साधून नादिया मुराद त्या दहशतवाद्यांच्या तावडीतून निसटली. त्यानंतर ती जर्मनीमध्ये गेली. आपल्यावर जे अत्याचार झाले त्यांना वाचा फोडण्याचे कार्य तिने चालू केले. इस्लामी दहशतवाद्यांच्या कुकर्माकडे नादियाने संयुक्त राष्ट्रांसह जगाचे लक्ष वेधले. आपल्या यझिदी समाजावर झालेल्या अन्यायास वाचा फोडली. 'मी आयसिसची लैंगिक गुलाम होते. मी माझी ही कहाणी सांगते, कारण तेच माझ्या हातातील उत्तम शस्त्र आहे’, असे नादियाने एके ठिकाणी म्हटले आहे. ‘आयसिस’च्या हल्ल्यात नादियाने तिचे सहा भाऊ आणि आई गमाविली. तरी ती त्या अत्याचाराविरुद्ध निडरपणे उभी राहिली. मानवी अधिकारासाठीचे कार्य तिने चालू ठेवले. लैंगिक अत्याचाराचा युद्ध वा सशस्त्र संघर्षात शस्त्र म्हणून वापर केला जाऊ नये म्हणून नादिया मुराद या तरुणीने केलेल्या कार्याची दखल घेऊन तिची २०१८च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुयोग्य निवड करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link