Next
आई व्हावी मुलगी माझी...
अनुजा हर्डीकर
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सुट्टीचे दिवस म्हणजे सगळ्यांसाठीच मजेचे दिवस असतात. काहींना रोजच्या दिनक्रमापासून मुक्ती म्हणून मजा येते, काहींना अभ्यासाला बुट्टी म्हणून, काहींना खेळायला, फिरायला मिळते म्हणून सुट्टी आवडते. प्रत्येकाची मजेची कारणे निरनिराळी असतात. मात्र नेहमीच्या चौकटीपेक्षा काहीतरी वेगळे अनुभव आपण घेत असतो, म्हणून ही सुट्टी सगळ्यांना प्रिय! अनयाचे बाबा परवा अनयाला आणि तिच्या मैत्रिणींना सांगत होते, “तुम्ही खूप मज्जा करता मुलींनो. अनयाचे आजोबा तर आम्हाला सुट्टीतही सोडायचे नाहीत. रोजच्या पाच ओळी शुद्धलेखनाच्या, पाढे म्हणणं, परवचा हे सगळं झाल्याशिवाय खेळायला जायची आमची बिशाद नव्हती. तुम्हाला आता पाढे आणि परवचा म्हणजे काय, हेही माहीत नाही.”
“काका, पाढे म्हणजे टेबल्स ना... ते रोज कशाला म्हणायचे? इझी टेबल्स बनवायचे किती व्हिडिओज आहेत नेटवर.”
हे ऐकून ते बिच्चारे काका तरी काय बोलणार?
अनयाचे बाबा अगदी आजोबांसारखे तिला सुट्टीत अभ्यासाला बसवत नसले तरी नवे काहीतरी शिकावे असा त्यांचा आग्रह होता. अनयाला सुट्टीत आईबाबांचा भरपूर वेळ मिळायचा म्हणून तीही खूश असायची. खरेतर त्यांना काही ऑफिसला सुट्टी नसायची. त्यांची कामे नेहमीसारखीच सुरू असत. सुट्टी फक्त अनयाची असायची. रोज सकाळी लवकर उठून आईबाबा घाईगडबडीत ऑफिसला जायचे. मात्र शाळेच्या काळात आईबाबांना घरी आल्यावर एकीकडे अनयाचा अभ्यास घेत घेत घरातली इतर कामे आवरावी लागायची. शिवाय दुसऱ्या दिवशीची तयारी करण्यात वेळ जायचा. सुट्टीत मात्र अनयाला खूप छान वाटायचे कारण रोजच्या अभ्यास नाही. शिवाय तीही आईबाबांना त्यांच्या कामात मदत करत असे. एरवी ‘अग, तू तुझा अभ्यास कर’ असे म्हणणारी आई सुट्टीत मात्र तिला हक्काने कामे सांगे. आईने तिला भांडी लावायला, वरणभाताचा कूकर लावायला, थोड्याफार भाज्या कापायला शिकवले होते. चौथीत गेलेली अनया ही सगळी कामे आवडीने करी. सगळी कामे भराभर आटोपून जेवण झाल्यावर मस्त गप्पा मारायच्या, फिरायला जायचे किंवा एकत्र मिळून सगळ्यांनी एखादा पिक्चर पाहायची मजा तिला सुट्टीत करता यायची.
अनयाची आई फार सुंदर सुंदर गोष्टी लिहायची, कविता करायची. आईचे पाहून पाहून अनयालाही ती सवय लागली. ती इंग्रजीमधून गोष्टी लिहायची. आईला अनयाचे कर्सिव्ह रायटिंग काही पटकन वाचता यायचे नाही आणि आईला तिची गोष्ट आवडली नाही की ती पटकन ‘असं नाही ग लिहायचं, असं वाक्य कर’ म्हणून अनयाने लिहिलेले ती खोडून टाकत असे. कधीकधी तर अनयाची पूर्ण गोष्ट आई बदलायची. अनयाला मग वाईट वाटे. आईचा रागही येई. अनया म्हणे- “असं कसं ग, तुलाच वाचता येत नाही. बाबा बघ कसा पटापट वाचतो. आता ह्या सुट्टीत आई तू माझ्याकडून कर्सिव्ह रायटिंग शिकून घे.” अनयाच्या आईला ही कल्पना आवडली आणि त्या दोघींचा सुट्टीतला क्लास सुरू झाला.
अनयाचे अक्षर खूप सुंदर होते. तिला नेहमी बक्षीस मिळायचे. तिची आई मराठी माध्यमातून शिकलेली होती. आईचे बरेचसे वाचन, लेखन मराठीत होते, त्यामुळे कर्सिव्ह रायटिंग तिला पटकन जमायचे नाही. अनया आईला शिकवताना अगदी आईच्या भूमिकेत शिरायची. ‘आई, असं कसं काढलंस ग? हे एकदम चुकीचं  आहे,’ म्हणून आईच्या हातातून वही पटकन खेचून घ्यायची आणि भराभर खोडून टाकायची. पुन्हा वही आईच्या हातात देत म्हणायची, “आता छान अक्षर काढ. एकदम नीट.” आईबाबांना अनयाचा हा अवतार पाहून हसायला येई. ते हळूच गालातल्या गालात हसतही. त्यांच्या हसण्याकडे अनया मात्र अगदी दुर्लक्ष करी. अनयाने दिलेला गृहपाठ आईने केला नाही की ती अगदी आईसारखी चिडचिड करी. “कसा ग अभ्यास विसरते? लक्ष कुठे असत तुझं?” आई सारे काही ऐकून घेत होती कारण आईलाही अनयाच्या मनात साचलेला राग ह्यानिमित्ताने समजत होता.
एकदा न राहवून बाबा मात्र अनयाला बोलले, “तू जरी आईला शिकवत असलीस, ती तुला काही बोलत नसली तरी मला काही हे तुझं बोलणं पटत नाही आणि आवडतही नाही. तू आईला सॉरी म्हणायला हवंस.”
बाबा असे बोलल्यावर अनयाने एकदम मान खाली घातली. तिच्या डोळ्यांत पाणी डबडबले. ती म्हणाली, “मग आईसुद्धा माझ्या कोणत्याच गोष्टीला छान म्हणत नाही. कायम माझ्या चुका काढत असते.”
“अग अनु, आई तुझी गोष्ट...” बाबा पुढे काही बोलायच्या आत बाबाचे बोलणे थांबवत आई म्हणाली, “अनु, मी तुझी मुलगी झाले आणि माझी मोठी चूक मला कळली. सॉरी बाळा...” आईने अनयाला घट्ट जवळ घेतले.
खरच एकदातरी प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा– ‘आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link