Next
रंपाट
शब्दांकन : अश्विनी पारकर
Friday, May 10 | 03:45 PM
15 0 0
Share this story


‘रंपाट’चं ग्रामीण ग्लॅमर
रंपाट म्हणजे अत्यंत वेगवान. ‘टाइमपास’, ‘बालक पालक’, ‘सैराट’ हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांना चित्रपटात अभिनय करावा असं वाटायला लागलं. पण, यामागे काय संघर्ष असतो तसंच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्यासोबत काय गमतीजमती होतात, याचं हलकंफुलकं चित्रण या चित्रपटात आहे. ‘टाइमपास’, ‘बालक-पालक’ प्रदर्शित झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मला चित्रपटात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांचे मोबाइलवर संदेश येऊ लागले. मला वाटलं या विषयावर चित्रपट नक्कीच व्हावा. तसंच, हा चित्रपट करताना मला या चित्रपटासाठी जसे अभिनेते हवे होते तसेच अभिनेते मिळाले आहेत.
अभिनय बेर्डे व अभिनेत्री कश्मिरा परदेशी त्यांच्या भूमिकांमध्ये चपखल बसले आहेत कारण ती दोघंही मुळात तशी आहेत. मला जसे फिल्मी अभिनेते या चित्रपटासाठी हवे होते तशीच ही दोघं आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण करताना फार धमाल आली कारण अभिनय आणि कश्मिरासोबत पहिल्यांदा काम करत होतो. तरी त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव छान होता. प्रिया बेर्डे यांच्यासोबत ‘नटरंग’च्या वेळीही काम केलं होतं. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही छान होता.

तरुणांबद्दल जिव्हाळा
तरुण पिढी हे भारताचं भविष्य आहे. त्यांच्यात ऊर्जा असते. ही ऊर्जा मला आकर्षित करते. तरुणांचे विषय मला आवडतात. प्रेरणा देतात. त्यामुळे त्यांच्या विषयांवर तीन चित्रपट येऊन गेले आहेत. ‘रंपाट’ हा चित्रपटही तरुणांशीच निगडित असल्यानं तो करताना मजा आली. या चित्रपटाचं चित्रिकरणही सहा महिने सुरू होतं. त्याआधी सुमारे वर्षभर चित्रपटाच्या कथेवर आणि अभिनेत्यांसाठीच्या शिबिरांवर काम सुरू होतं. सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे शहरांत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे.

‘न्युड’चं यशं आजही ताजतवानं
‘रंपाट’ येत्या १७ मे रोजी प्रदर्शित होत आहे त्याचवेळी ‘न्युड’ आंतराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित होत आहे. ‘न्युड’ला जगभरात पसंती मिळते आहे. न्यू यॉर्क, अटलांटा तसंच शिकागो चित्रपट महोत्सवात ‘न्युड’ला यश मिळालं. ‘न्युड’ जागतिक चित्रपट महोत्सावत उत्तम कामगिरी करतो आहे याचं कौतुक वाटतं. एका भारतीय कणखर स्त्रीची ‘न्युड’ ही कथा आहे. हा चित्रपट महाविद्यालय जे.जे स्कूल ऑफ आर्ट्सला समर्पित केला होता. हा चित्रपट मराठीत झाला याचा अभिमान आहे.

प्रत्येक पदार्पण राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित
माझ्या प्रत्येक पहिल्या पदार्पणाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक म्हणून ‘नटरंग’ चित्रपट केला, अभिनेता म्हणून ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपटात अभिनय केला, ‘मिथिला’ हा लघुचित्रपट केला. या तिन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचा मला निश्चितच आनंद आहे.

पुन्हा अभिनय करणार
‘कच्चालिंबू’नंतर मला अनेक मराठी व हिंदीही दिग्दर्शकांकडून अभिनयासाठी विचारणा झाली. त्यातील अभिनय करण्याबाबत नेमका कोणत्या चित्रपटात अभिनय करायचा यावर मी विचार करतो आहे. त्यामुळे लवकरच अभिनेता म्हणूनही मी तुमच्या भेटीला येणार आहे. याशिवाय दिग्दर्शक म्हणूनही अनेक चित्रपटांवर काम सुरू आहे. अनेक नवनवीन कल्पना आहेत. त्यातील काही गंभीर विषय आहेत, काही हलकेफुलके आहेत. त्या प्रत्येक विषयावर लिखाणापासून त्या चित्रपटाच्या चित्रीकरणापर्यंत काम सुरू झालं आहे. त्यातील नेमका कुठला पहिला प्रदर्शित होईल हे अजून निश्चित नाही.
-रवी जाधव

----------------------


भन्नाट सिने‘माँ’
या चित्रपटात मी शेतकऱ्याची विधवा पत्नी साकारत आहे. पण, ही सिने‘माँ’ असते. जेव्हा तिचा पती आत्महत्या करतो तेव्हा लोक तिला चित्रपट पाहण्याचा सल्ला देतात. त्यावेळी ती गर्भवती असते. ती सतत चित्रपट पाहते आणि चित्रपटमय होऊन जाते. तिला तिचं आयुष्यचं चित्रपटासारखं भासू लागतं. इतकंच नाही तर तिला  आपल्या मुलानंही चित्रपटात काम करावं असं वाटू लागतं. आणि ती तशी स्वप्ने त्याला दाखवू लागते. त्यामुळे ही फिल्मी मायलेकांची अशी जोडी आहे.

दिसण्यावर घेतली मेहनत
या आधीही ग्रामीण बाजाच्या भूमिका केल्या असल्या तरी त्यात दागिने, भरजरी साड्या वगैरे होत्या. या चित्रपटात मी गरीब स्त्रीच्या भूमिका साकारत असून  तिचे कपडे फाटके आहेत. ती रापट दिसते. या लूकसाठी मला अक्षरश: काळं केलं आहे. त्यासाठी मेकअपदादा आणि मेघना जाधव यांना फार मेहनत करावी लागली. ही तयारी करण्यासाठी जास्त वेळ  लागायचा.

सहकलाकारांसोबत उत्तम केमिस्ट्री
रवी जाधव हे दिग्दर्शक शांत स्वभावाचे असून, आरडाओरडा करत नाहीत. त्यामुळे काम अगदी सुरळीत होतं. सिनेमेटोग्राफरही शांत स्वभावाचे असल्यानं त्यांचा आरडाओरडा अथवा अर्वाच्य भाषेत बोलणं नसायचं. रवी जाधव यांच्या पहिल्या चित्रपटात काम केलं आहे आणि आता त्यांचा पाचव्या चित्रपटात अभिनय करत असल्याचा आनंद आहे. कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण या अभिनेत्यांसोबतची केमिस्ट्रीही उत्तम असल्यानं काम करताना मजा आली.

तेव्हाचा आणि आताचा काळ वेगळा

तेव्हा आम्ही चित्रपटाचं चित्रीकरण करायचो तेव्हा कॅमेऱ्याचा ‘कर्र’ असा आवाज यायचा. त्यावेळी दिग्दर्शकांची आणि कॅमरामनची काम करण्याची पद्धत वेगळी होती. तंत्रज्ञान वेगळं होतं. कॅमेरे वेगळे होते. आतासारख्या व्हॅनिटी व्हॅन नसायच्या. त्यावेळी महिलांना आणि पुरुषांना वेगवेगळी अशी रूम असायची त्यामुळे तीन ते चार अभिनेत्री एकाच रूममध्ये तयार व्हायच्या. पण, त्याकाळात आम्ही जे कमावलं ते आताही आम्हाला पुरतं आहे.
- प्रिया बेर्डे

----------------------


फिल्मी मिथुन
फिल्मी स्टाइल, रंपाट, झकास अशी मिथुनची भूमिका मी करतो आहे. तो जगण्याचा मनमुराद आनंद लुटतो. इतर कलाकारांच्या नकला करून दाखवतो. चित्रपटात अभिनय करायचं स्वप्न हे आई आणि मुलगा एकत्रच पाहत असतात. त्यालाही चित्रपटात काम करण्याची इच्छा असते. जेव्हा तो मुंबईत अभिनेता बनण्यासाठी येतो त्यावेळचा संघर्ष आणि गमतीजमती चित्रपटात पाहायला मिळतील.

अशोक सराफ आदर्श
माझे वडील हे नेहमीच आदर्श आहेत. ते माणूस म्हणूनही माझे आदर्श आहेतच. परंतु अशोकमामा, अंकुश चौधरी, सुबोध भावे हेही माझे आदर्श आहेत. अशोकमामांचं वेगवेगळ्या भूमिका करण्याचं कौशल्य मला प्रेरणा देत राहतं. त्यांनी सतत वेगळ्या भूमिका केल्या आहेत. या सर्वांसोबत किमान एकदा तरी काम करण्याची इच्छा आहे.

चित्रीकरण म्हणजे धमाल
‘रंपाट’ चित्रपटाचं चित्रीकरण करताना फार धमाल आली. याच चित्रीकरणही ‘रंपाट’ स्टाइलनं झालं. झी स्टुडिओ आणि अथांग कम्युनिकेशन्सच्या बॅनरखाली कामाची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ‘झी स्टुडिओज’बरोबर मी दुसऱ्यांदा काम करतो आहे. परत काम करण्याचा हा अनुभवही भन्नाट होता. हा चित्रपट पाहताना आम्ही केलेली मजा प्रेक्षकही अनुभवतील.

‘रंपाट’चा अनुभव शिकवून गेला

दिग्दर्शक रवी जाधव हे मला गुरूच्या स्थानी आहेत. त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं हे नक्कीच शिकवून जातं. त्यांच्यासोबत माझा काम करण्याचा अनुभव हा उत्तमच होता.
-अभिनय बेर्डे


----------------------


चित्रपटवेडी मुन्नी
‘रंपाट’मध्ये  मी मुन्नी ही भूमिका साकारत आहे. ही मुलगी कुस्तीपटू आहे. भूमिका साकारण्याआधी कुस्ती खेळणाऱ्या मुलींसोबत प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांचे वेगवेगळे शब्द, ती भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न करत होते. दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशीही कोल्हापुरी भाषेतूनच बोलायचे. मुन्नी कोल्हापूरच्या तांबड्या मातीतील आहे.  तरीही तिला चित्रपटदुनियेची स्वप्नं पडतात. मुंबईत आल्यावर तिचा वेगळा प्रवास सुरू होतो. हा चित्रपट म्हणजे त्या प्रवासाची ही गोष्ट. एकाच भूमिकेत दोन वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय करण्याची संधी मिळाली. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. मुन्नीचा जो मुंबईत आल्यावर संघर्ष असतो तो मीही अनुभवला आहे. माझ्यासोबतही जसे मुन्नीसोबत किस्से घडले तसे किस्से घडले असल्यानं ही भूमिका माझ्यासाठी खास आहे.

रवीसर आदर्श
‘अथांग’सारखं प्रॉडक्शन हाऊस आणि ‘झी स्टुडिओ’च्या बॅनरखाली पदार्पणातच भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे.  दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. त्यांच्या चित्रपटातील पात्रं ही आपल्या जीवनाशी साधर्म्य सांगणारी असल्याने लोकांना ती भावतात. त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव फार शिकवून गेला.
-कश्मिरा परदेशी


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link