Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, October 04 | 02:00 PM
15 0 0
Share this story

सद्भावनेचे सोने वाटूया
नवरात्रीउत्सवानिमित्त २८ सप्टेंबरच्या ‘झी मराठी दिशा’च्या अंकातील सर्वच लेख सण, उत्सवाचे उद्देश सांगणारे होते. ‘श्रीदेवीमातेची अनेक रूपे असती, भक्तांना देऊन अभय विविध क्षेत्री वसती!’ घटस्थापना ते दसरा पूजापाठ, उपासना आदिमातेची पूजा कित्येक वर्षांपासून होत आहे. काळानुरूप त्यात होणारे बदल योग्य आहेत का, या प्रश्नाची चर्चा होते. स्त्रीरूपाची पूजा होते. आजची स्त्री नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असून विविध भूमिकांत व्यापक जबाबदारी व जिव्हाळ्याने आणि अनेक समस्या सोडवत, त्रास सहन करून वर्षानुवर्षे सांभाळत आहे. अर्थात हे करणे सोपे नाही याची जाणीव असते का? परिस्थितीत होणारे बदल आपल्या सद्भावना जोपासणाऱ्या संस्कृतीला पोषक असावेत ही अपेक्षा! दसऱ्यानिमित्त सद्भावनेचे सोने वाटणे महत्त्वाचे वाटते.
- अर्चना काळे, नाशिक
---------------------------------------------------

झाडे चित्रात आणि प्राणवायू बाटलीत?
उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींनी राज्य सरकारला चांगलेच सुनावले. विकासाच्या नावाखाली मुंबईतील होणाऱ्या झाडांची कत्तल थांबवा, नाहीतर भविष्यात पुढच्या पिढीला झाडे फक्त चित्रातच पाहायला मिळतील. आज मुंबई विकासाच्या नावाखाली जवळजवळ भकासच झाली आहे. काल जिथे मोठी डेरेदार झाडे होती आज तिथे उंचच उंच इमारती, मेट्रो, मोनो आणि पुलाचे मोठमोठे अवाढव्य सिमेंटकाँक्रीटचे खांब दिसत आहेत. भुयारी मेट्रोच्या खोदकामांनी तर झाडाबरोबर सगळी मुंबईच पुन्हा सात बेटांची करून ठेवली आहे. या खोदकामांमुळे मुंबईत ठिकठिकाणी साप, अजगरही बाहेर पडले. आरेत अडीच हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत आणि त्याला नुसत्या मुंबईतूनच नव्हे तर देशभरातून विरोध होत आहे. कितीतरी सामाजिक संस्था, कार्यकर्ते मोर्चा-आंदोलने करत आहेत, पण राज्य सरकार त्यांचे अजिबात ऐकत नाही. झाडांची ही हत्या अशीच होत राहिली तर भविष्यात पुढच्या पिढीला झाडे केवळ चित्रातच पाहावी लागतील, शिवाय शुद्ध प्राणवायूही विकत घ्यावा लागेल. त्याची मोठी किंमत मुंबईकरांना चुकवावी लागेल. यासाठी जी झाडे मुंबईत आहेत ती वाचवा, मानव जगवा.
- मयूर प्रकाश ढोलम, जोगेश्वरी, मुंबई
---------------------------------------------------

मूल्यमापनाचे निकष समान हवेत
‘एलआयसी भरतीत मराठी उमेदवारांवर हिंदीची सक्ती’ ही २८ सप्टेंबरच्या अंकातील बातमी सर्वच मराठीजनांचे डोळे उघडणारी आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला राजभाषा म्हणजेच हिंदी आली पाहिजे हे ठीक आहे, परंतु त्यासाठी लावलेला नियम सर्वांना समान असावा. एलआयसीच्या भरतीपरीक्षेत काही राज्यांमध्ये हिंदीचा पेपर होणार नसून उरलेल्या विषयांमध्ये हिंदीचे गुण ‘अॅडजस्ट’ करण्यात आले आहेत. परंतु महाराष्ट्रातील परीक्षार्थींना मात्र हिंदीचा पेपर सोडवायचाच आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह हा नियम लागू असलेल्या अन्य राज्यांतील परीक्षार्थींवर झालेला अन्याय आहे. परिणामी मराठी परीक्षार्थींचीची ही कैफियत एलआयसीच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. सर्व परीक्षार्थींचे मूल्यमापन करण्याचे निकष समान असले पाहिजेत, असे यानिमित्ताने वाटते.
-  रघू गाडगीळ, पुणे
---------------------------------------------------

सहकाराचे मारेकरी
नुकताच एका गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गेलो होतो. सभेत सदर संस्थेच्या सहकारी बँकेत ठेवलेल्या मुदतठेवींचा विषय निघाल्यावर, सदर ठेवी सहकारी बँकेतून काढून घेऊन राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्याची एकमुखाने मागणी करण्यात आली. खरे तर सहकारी बँकांमध्ये व पतसंस्थांमध्ये व्याजदर अधिक मिळत असल्याने अनेक जण सहकारी बँकांतील मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, पीएमसी बँक प्रकरणामुळे गुंतवणुकदारांनी पुन्हा एकदा सहकारी बँकांचा धसका घेतला आहे. असा फटका आता सर्वच सहकारी बँका आणि पतसंस्थांना बसण्याची शक्यता आहे. उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या नादाला लागून नियमबाह्य व मनमानी कर्जवाटप करणारे सहकारी संस्थांचे संचालकच सहकारी क्षेत्राचे मारेकरी आहेत.
- संदीप देवू गावडे, गोराई, मुंबई
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link