Next
पहिला स्वातंत्र्यसंग्राम
दिलीप चावरेे
Friday, August 09 | 02:45 PM
15 0 0
Share this story


उत्तर भारतात १८५७ साली पेटलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचा भडका देशभर सर्वत्र उडाला नाही याचं कारण म्हणजे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ही परिस्थिती कठोरपणे व कौशल्यपूर्वक हाताळली. त्याचा तपशील आजच्या शासनासाठीही उद्बोधक ठरू शकेल. शासन आणि पोलिस यांच्यात उत्तम समन्वय असल्यास परिस्थिती कशी काबूत राहते, याचा हा वस्तुपाठ ठरावा. इतर शहरांपेक्षा मुंबईची भरभराट का होऊ शकली, याचं सूत्रही या तपशिलात गवसतं.
देशात पेशवाईचा अंत १८१८ साली झाला. तेव्हापासून इंग्रजांनी आपला अंमल सर्वत्र प्रस्थापित करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबवण्यास सुरुवात केली. इंग्रजांच्या लेखी मुंबईचं महत्त्व फार होतं. हे व्यापारी केंद्र विकसित करण्यावर त्यांनी स्वाभाविकच भर दिला. व्यापारउदिम आणि पायाभूत सुविधा यांची वाढ मुंबईत अतिशय वेगानं होऊ लागली. रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे चहूकडून कष्टकरी आणि व्यापारी लोकांचा लोंढा मुंबईला येऊ लागला. या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी ख्रिश्चन धर्मप्रसारकही सरसावले. त्यांना काही प्रमाणात यशही आलं, पण त्यांचा कुटिल हेतू लक्षात येताच स्थानिक विरोध उमटू लागला. मात्र या जनतेला एकमुखी नेतृत्व नसल्यानं त्यांच्या निषेधास परिणामकारकता आली नाही. दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध तक्रारी येऊनही धार्मिक बाबीत आपण ढवळाढवळ करणार नाही, असा शहाजोग पवित्रा सरकारनं घेतला. तथापि त्यांच्याविरुद्ध हा असंतोष वाढतच होता. त्याला १८४१ साली प्रथम वाचा फुटली. मुंबईत स्थायिक झालेल्या पारशी समाजानं याबाबत पुढाकार घेतला, ही एक लक्षणीय बाब होती.
इंग्रजांच्या चालीरीती, आहार आणि पेहराव यांचं अनुकरण करणारा पारशी समाज स्वाभाविकच इंग्रजांना जवळचा वाटत होता. त्यामुळे या पारशी समाजानं निषेधाचं हत्यार उगारताच इंग्रजांनी त्याची दाखल घेतली. या बहिष्काराचं लक्ष्य ख्रिश्चन धर्मप्रसारक मोफत वाटत असलेली पुस्तकं आणि पत्रकं होती. त्यावर त्यांनी बहिष्कार घातला. याखेरीज काही कायदेशीर कारवाई करता येईल का, असाही प्रयत्न पारशी समाजानं केला. मात्र त्यास यश आलं नाही. तथापि पारशी समाजाकडून प्रेरणा घेऊन धर्मरक्षण आणि ख्रिश्चन धर्मविरोधी चळवळीला जोर येऊ लागला. याबाबत एक हिंदू ब्राह्मण, विष्णुबुवा ब्रह्मचारी, यांचं नाव प्रसिद्ध आहे. मुंबईच्या चौपाटीवर १८५५च्या सुमारास ख्रिश्चन धर्माविरुद्ध त्यांनी उघड भाषणं देण्यास सुरुवात केली. त्यांना प्रतिबंध करण्याचा सरकारचा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही. अशा प्रकारे सरकारविरुद्ध असंतोष मुंबईत वाढत होता. परंतु त्याला उत्तरेकडील उठावासारखं सार्वत्रिक स्वरूप नव्हतं.
नानासाहेब पेशवे, झाशीची राणी आणि तात्या टोपे आदींनी १८५७ साली उघड युद्ध पुकारलं. त्याचा फटका पश्चिम भारताला बसू नये याची पुरेपूर खबरदारी प्रशासकांनी घेतली. त्याबाबतचा तपशील मुळातूनच वाचण्यासारखा आहे. या कारवाईचं नेतृत्व मुंबई इलाख्याचे गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि मुंबईचा पोलिसप्रमुख चार्ल्स फॉर्जेट यांनी केलं. एल्फिन्स्टन यांनी पार मॉरिशसपर्यंत आपले दूत पाठवून नौदल सज्ज केलं. मुंबई इलाखा, राजपुताना किंवा मध्य भारत यांच्यात कुठेही उठाव झाला तरीही कारवाई करण्याची तयारी करून ठेवली. या पूर्वतयारीस आणि खबरदारीला यश मिळालं. अन्यत्रही अशीच कारवाई झाल्यामुळे हा उठाव प्रामुख्यानं दिल्ली-कानपूर-लखनऊ या पट्ट्यातच मर्यादित राहिला.
इकडे मुंबईत चार्ल्स फॉर्जेट यानं आपली दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. एकीकडे जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करून दुसरीकडे बंडाची भाषा करणाऱ्या सैनिकांना लगेच देहांताची शिक्षा देण्याची कारवाई सुरू केली. तसा संदेश त्यानं मुंबईतच नव्हे तर सर्वदूर जावा म्हणून व्यवस्था केली. मुंबईच्या आजच्या पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात म्हणजे लोकमान्य टिळक मार्गावर त्यानं फाशीचा एक स्तंभ उभारला. त्याची जरब दाखवण्यासाठी त्यानं मुंबईचे प्रमुख रहिवासी आमंत्रित केले. जे सरकारविरुद्ध बोलतात, त्यांची माहिती चार्ल्स फॉर्जेट याच्याकडे होती. त्यानं या लोकांसमोर भाषण करून हा वधस्तंभ दाखवला आणि त्यांना खडसावलं, की त्यांनी किरकोळ आगळीक केली तरीही त्यांना सोडण्यात येणार नाही. या भाषणाचा प्रभाव इतका पडला, की मुंबई सरकारविरुद्ध एकही हुंकार उमटला नाही.
उत्तरेकडे उठाव सुरू झाला आणि मागोमाग ३१ ऑगस्ट १८५७ रोजी मुहर्रम तर दुर्गापूजा आणि दसरा २८ सप्टेंबरला साजरे होणार असल्याचं लक्षात घेऊन चार्ल्स फॉर्जेटनं पुरेशी उपाययोजना केली. त्यामुळे सरकारसाठी कोणताही अनुचित प्रसंग घडला नाही. मात्र एवढी खबरदारी घेऊनही उठावाला पाठिंबा देण्याची कारस्थानं सुरूच आहेत, असं चार्ल्स फॉर्जेटच्या कानावर आलं. दिवाळीच्या सणात १७ ऑक्टोबर १८५७ रोजी हल्ला करण्याचा कट शिजत असल्याची माहिती त्याला मिळाली. या कटाचा म्होरक्या मंगल गादा (गुद्रेया) आणि त्याचा साथीदार सय्यद हुसेन यांना अटक करण्यात आली. या कटाची चर्चा गंगाप्रसाद या सोनापूर भागात म्हणजे आजच्या मरीन लाइन्स स्थानकाजवळ राहणाऱ्या सैनिकाच्या घरात होत असे. या घराच्या भिंतीला पडलेल्या भेगेतून तिचा कानोसा चार्ल्स फॉर्जेट घेत असताना ही कुजबूज त्याला ऐकू आली आणि त्यानं पुढे कारवाई केली. फॉर्जेट वेषांतर करून मुंबईत स्वतः फिरत असे. त्याचप्रमाणे त्याचे खबरेही मुंबईभर पसरलेले होते. कुठंही काहीही खुट्ट झालं की त्याची माहिती त्याला लगेच मिळत असे. मंगल आणि सय्यद हुसेन यांच्या कारवायांची माहिती मुंबईचा सेनाधिकारी ब्रिगेडीयर शॉर्ट याला त्यानं पोचवली. त्यानंतर ही कारवाई झाली. या दोघांना दोषी ठरवण्यात आलं तर त्यांच्या सहा साथीदारांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. मंगल आणि सय्यद यांना तोफेच्या तोंडी देण्याचा इरादा जाहीर करण्यात आला.


मुंबईतील आणि उत्तर भारतातील घडामोडींची दखल खुद्द कार्ल मार्क्स यांनीही घेतली. ‘न्यूयॉर्क ट्रिब्युन’ या वर्तमानपत्रासाठी मार्क्स एक स्तंभ लंडन तेथून नियमित पाठवत असत. हे लिखाण इंग्रजविरोधी असे. या संदर्भात मार्क्स लिहितात, की मुंबईतील एतद्देशीय भांडवलदारवर्गात लगेचच भय निर्माण झालं. बँकांमधून मोठमोठ्या रकमा काढण्यात आल्या. सरकारी रोख्यांची किंमत कवडीमोल होऊन साठेबाजी सर्वत्र सुरू झाली. इंग्लंडमधील तत्कालीन वर्तमानपत्रांनी लिहिलं, की मुंबईत एकूणच भयाचं वातावरण निर्माण झालं होतं. हल्ला होईल अशा भीतीनं अनेक ब्रिटिश अधिकारी आपल्या मुलाबाळांसह नौदलाच्या जहाजांमध्ये आश्रयासाठी लपले होते. उठाव शांत झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच ते कुलाबा भागातील आपल्या निवासस्थानी परतले.
या काळात वातावरण इतकं दूषित झालं होतं, की आधुनिक मुंबईचे जन्मदाता जगन्नाथ शंकरशेट यांनाही त्याचा चटका बसला. वास्तविक नाना शंकरशेट यांचा सरकारदरबारी मोठा दबदबा होता आणि एल्फिन्स्टन यांचे तर ते निकटवर्ती मानले जात, पण इंग्रजांनी ही परिस्थिती हाताळताना कोणताही सारासार विचार केला नाही, तारतम्य बाळगलं नाही. त्यांना संशय होता त्या सर्वांना कारवाईला सामोरं जावं लागलं. नंतर नानांची नियुक्ती मुंबई विद्यापीठाच्या विद्वतसभेवर आणि मुंबई इलाखा विधानपरिषदेवर करण्यात आली. मात्र चार्ल्स फॉर्जेटचं मोठेपण असं, की त्यानं नानांचा या कट-कारस्थानाशी काहीही संबंध नसल्याचं सरकारला पटवून दिलं आणि नानांविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही. चार्ल्स फॉर्जेट आदर्श पोलिसप्रमुख मानला जातो. त्याचं एक छानसं चरित्र रोहिदास नारायण दुसार यांनी लिहिलं आहे. फॉर्जेट मुंबईत असेपर्यंत गुन्हेगारांना कधीही मोकाट फिरणं शक्य
झालं नाही.
असा हा इतिहास घडला. आपण आता १५ ऑगस्ट उत्साहानं साजरा करतो. आपल्या इतिहासात १५ ऑक्टोबरलाही तसंच महत्त्व दिलं पाहिजे याची जाणीव आपल्याला नसते. मंगल गादा आणि हवालदार हुसेन यांच्यावरील कारवाईसाठी १५ ऑक्टोबर १८५७ हा दिवस नक्की करण्यात आला. दुपारी साडेचार वाजता त्यांना कांपाच्या मैदानात म्हणजे हल्लीच्या आझाद मैदानात किंवा तत्कालीन एस्प्लनेडमध्ये देहदंड देण्यात असल्याची दवंडी पिटण्यात आली. मंगल आणि हुसेन यांना दुपारी चार वाजता दोन तोफांच्या तोंडी बांधण्यात आलं. त्यांच्यावरील आरोप आणि लष्करी कारवाईचं जाहीर वचन करून देहदंडाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. त्यानंतर दोन्ही तोफांना बत्ती देण्यात आली आणि क्षणार्धात दोघांच्या देहांचे तुकडे इकडेतिकडे पसरले. याप्रसंगी उपस्थित असलेल्यापैकी एकानं सोबत दिलेलं रेखाचित्र काढलं होतं. हे रेखाचित्र ‘इलस्ट्रेटेड लंडन न्यूज’मध्ये १८५७ साली लगेच प्रसिद्ध झालेलं आहे. या रेखाचित्रात या दोघा स्वातंत्र्यवीरांना तोफांच्या तोंडी बांधण्यात येत असल्यास दिसतं.
हे मैदान गोऱ्या अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना उन्हाळ्याच्या दिवसात राहण्याचे तंबू बांधण्यासाठी राखीव ठेवण्यात आलं होतं. हे कॅम्प तिथे असत म्हणून कांपाचं मैदान असं त्यास म्हणण्यात येत असे. एस्प्लनेड असं या मैदानाचं अधिकृत नाव असे. एखाद्या किल्ल्यासमोरचा मोकळा विस्तीर्ण परिसर म्हणजे एस्प्लनेड, जिथं लोक चांगल्या हवेत फेरफटका मारायला येत. पुढे या मैदानाचा वापर सभा आणि आंदोलनासाठी होऊ लागला. म्हणून स्वतंत्र भारतात आझाद मैदान असं त्याचं नामकरण करण्यात आलं. मंगल आणि हुसेन यांना यांच्या गौरवार्थ एक स्तंभ तिथं उभारण्यात आला आहे. त्याची विटंबना काही वर्षांपूर्वी एक धार्मिक मोर्चा निघाला असताना काही समाजकंटकांनी केली होती. त्यांनी महिला पोलिसांचाही विनयभंग केला होता. देशासाठी त्याग केलेल्याची किंमत आपण ठेवत नसल्याचं हे एक विदारक उदाहरण आहे. या स्तंभापासून काही पावलांवरच पहिले क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या गौरवार्थ उभारण्यात आलेलं स्मारक आहे. सुदैवानं या धर्मांध समाजकंटकांचं लक्ष त्याकडे गेलं नाही, त्यामुळे ते स्मारक शाबूत राहिलं. या समाजकंटकांवर आजवर कारवाई झालेली नाही. या त्यागाचं आणि अत्याचाराचं स्मरणही या स्वातंत्र्यदिनी करणं आवश्यक आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link