Next
मामा, चला पुन्हा गाणी करुया...
सुरेश वाडकर
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणजे आपल्या देशाला लाभलेलं एक रत्न आहे. त्या घरातील सगळीच भावंडं ही ‘रत्न’ आहेत. हृदयनाथ मंगेशकरांना सगळे बाळासाहेब म्हणून ओळखतात, पण मी त्यांना पहिल्यापासून ‘मामासाहेब’ म्हणतो. लतादीदी आणि आशाताई या दोघी माझ्यासाठी मातेसमान आहेत. लतादीदी तर माझी सरस्वतीमाँ आहेत, म्हणून मी बाळासाहेबांना ‘मामा’ म्हणतो. ते एक उत्कृष्ट कलाकार आहेत. ताकदीचे गायक आहेत. असं असूनही एक गायक म्हणून त्यांचं विशेष प्रेम मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. जवळपास १९९५-९६ पर्यंत आम्ही एकत्रितपणे खूप काम केलं. त्यांची अनेक चांगली गाणी गाण्याची संधी त्यांनी मला दिली. त्यानंतर मात्र काय झालं माहीत नाही, आमचा एकत्र येण्याचा योग आला नाही. ते माझ्यावर नाराज झाले की काय असं वाटायचं कधीकधी, पण विचारायची हिंमत नाही आणि त्यांनीही तसं कधी बोलून दाखवलं नाही. परंतु ‘माया मेमसाब’पासून त्यांची नाराजी मला जाणवू लागली होती. त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलंय की माझ्यावर नाराज होण्याचा त्यांना अधिकार आहे. नेमकं काय झालं असावं माहीत नाही, पण ती एक खंत आहे माझ्या मनात... अगदी आजही आहे आणि ती मी बोलून दाखवली तरच त्यांना कळेल. म्हणून या लेखातून ती मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण तेही गप्प आणि तो मीही गप्प असं राहिल्यानं काहीच कळणार नाही. बोलणं, भेटणं होतं अधूनमधून,  पण त्यांनी मला त्यानंतर गायला का बोलावलं नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे... आणि एक गायक म्हणून मला छळतो आहे. आज बोलून, थेट विचारून टाकावं असं वाटतंय. या अंकाच्या माध्यमातून मी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतोय.
त्याआधीचा आमचा गायक-संगीतकार म्हणून जो एकत्र प्रवास झाला तो खूप छान होता. त्यांनी मला खूप चांगली गाणी दिली. पंडितजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गाणी खूप गोड, मंजुळ आहेत. तिथेच खरी गंमत आहे. त्यांची गाणी ऐकायला जितकी छान वाटतात तितकीच गायकाची कसोटी पाहतात. त्यांची गाणी गायची म्हणजे गायकाचा खरा कस लागतो. मलाही अशा कठीण चाली गायला खूप आवडतात, ज्यात खूप मेहनत घ्यावी लागते अशी गाणी. ते स्वतः मातब्बर गायक असल्यामुळे त्यांना त्या गाण्यातून काय पाहिजे हे चांगलं ठाऊक असतं आणि गायकाकडून ते बरोब्बर काढून घेतात. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते गाणं शिकवताना गायकावर चिडत, ओरडत नाहीत. बरेचसे संगीतकार पटकन चिडतात. मामासाहेबांकडे खूप संयम आहे. गायकाचा हुरूप कसा वाढेल याकडे त्यांचं लक्ष असतं आणि तसं ते बोलतात, वागतात. ‘लेकिन’च्या वेळची एक आठवण आहे. ‘सुरमई शाम’ हे गाणं आम्ही आधी मराठीत रेकॉर्ड केलं होतं. त्याचे शब्द शांताबाई शेळके यांनी लिहिले होते. ‘स्पर्श सांगेल काही कहाणी’ असे होते. ते एका मराठी चित्रपटासाठी होतं, पण तो चित्रपट दुर्दैवानं तयार झाला नाही. मी तेव्हा मामासाहेबांना म्हणायचो की हे गाणं खूप छान आहे. आपण ते कुठेतरी दिलं पाहिजे. तो योग ‘लेकिन’च्या वेळी जुळून आला. मी गुलजारसाहेबांना मराठी गाणं ऐकवलं. त्यांनाही ते खूप आवडलं आणि त्यांनी त्यावर अप्रतिम, चपखल असे हिंदी शब्द लिहिले. गाणं खूप गाजलं. अर्थात, ते मूळ गाणंच एवढं छान होतं की लोकप्रिय झालं नसतं तरच नवल !

मामासाहेबांनी जी जी गाणी मला दिली ती सगळीच अतिशय ‘मेलोडीयस’ आहेत. आजही संगीतक्षेत्रात मामासाहेबांच्या गाण्यांकडे ‘वैशिष्ट्यपूर्ण रचना’ म्हणून पाहिलं जातं. ‘दयाघना’ गाणं आजही लोकप्रिय आहे. ते गाणं म्हणजे एक चमत्कार आहे. मी केवळ एक निमित्त आहे. त्या गाण्याचं सगळं श्रेय मामासाहेबांना जातं. ते गाणं बंदिशीवर आधारित आहे आणि ती बंदिश त्यांचे वडील गायचे. त्यांनी मला शिकवतानाही एवढ्या छान पद्धतीनं शिकवलं की ते शब्दांत सांगता येणार नाही, तो एक अविस्मरणीय अनुभव होता. त्या गाण्याच्या वेळी स्वतः माझी सरस्वतीमाता लतादीदी हजर होत्या.

मामासाहेबांचं कोणातही गाणं घ्या... त्यात भाव असतो, म्हणूनच तर त्यांना ‘भावगंधर्व’ म्हणतात. भावपूर्ण गायन, संगीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ‘दयाघना’ हे गाणं मुळात एक बंदिश आहे आणि बंदिश गाताना त्याचा लहेजा वेगळा असतो. मात्र तेच गाणं चित्रपटासाठी गाताना शब्द वेगळे रचावे लागतात. या दोन्हीचा संगम मामासाहेबांनी उत्तम साधला आणि त्यातून ती अजरामर कलाकृती निर्माण झाली. म्हणजे एकीकडे ‘दयाघना’ ही बंदिशही वाटते आणि त्याचवेळी दुसरीकडे ते चित्रपटगीतही वाटलं पाहिजे, ही किमया त्यांनी साधली आहे. हा दुवा त्यांनी मला सांगितला तो अविस्मरणीय आहे. संगीतकार म्हणून ते खूप उंचीवर आहेत. वास्तवात फार कमी संगीतकारांचं आपल्या गायकाशी सूत जुळतं, पण मामासाहेबांचं त्यांच्या सगळ्या गायकांशी चांगलं ट्युनिंग जुळायचं, तसं ते जुळवून घ्यायचे. ते आपल्या गायकाला नेहमी ‘रिलॅक्स’ ठेवतात. उगाचच मध्ये येऊन गायकाला विचलित करत नाहीत. ते मला सांगायचे, “तू कुणाचं ऐकू नकोस. तालीम केली आहेस ना, मग बिनधास्त गा, मनापासून गा.” विशेष म्हणजे गायकानं त्यांचं गाणं गाताना आपल्या पदरचं काही त्यात जोडलं आणि ते योग्य असेल तर मामासाहेब त्याचं तोंडभरून कौतुक करतात व त्यांना आवडलं तर बक्षीसही देतात. मी त्यांच्याकडून अशी खूप बक्षिसं मिळवली आहेत. दीदींचा एक कार्यक्रम काही वर्षांपूर्वी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होता. त्यावेळी मी त्या कार्यक्रमात गायला होतो. ‘सिने मे जलन’ हे गाणं मी त्यावेळी गायलं आणि ते मामासाहेबांना एवढं आवडलं की त्यांनी त्यांच्या खिशाला लावलेलं सोन्याचं पेन मला बक्षीस म्हणून दिलं. त्यांचं अक्षर खूप सुंदर आहे. त्यामुळे ते नेहमी चांगली पेनं वापरतात. तेही त्यांपैकीच एक होतं. ही त्यांची कौतुक करण्याची पद्धत आहे. त्यांनी त्यांचं ते आवडतं पेन मला देऊन टाकलं. आजही मी ते पेन त्यांच्या प्रेमाचं ‘प्रतीक’ म्हणून जपून ठेवलं आहे. एक मोठे गायक असून दुसऱ्या गायकाचं मुक्तपणे कौतुक करणं, बक्षीस देऊन प्रोत्साहन देणं हे त्यांचं स्वभाववैशिष्ट्य आहे. चांगल्या गायकाला प्रोत्साहन देण्याची पद्धत त्यांच्या घरातच आहे.

मी नेहमी म्हणतो की मामासाहेबांनी जी गाणी केली, ती शंभर टक्के अस्सल नाणी आहेत. त्यांनी गाणं इतकं छान करून ठेवलेलं असतं की त्यात आम्ही आणखी काय करणार? आमची नुसती पोपटपंची... बाकी सारं श्रेय त्यांचं आहे, कारण मुळात ते चोवीस कॅरेट सोनं आहे. एक संगीतकार म्हणून आणि एक माणूस म्हणूनसुद्धा त्यांचा स्वभाव खूप गोड आहे. त्यांना कुणी ‘दयाघना’ म्हणायला सांगितलं तर ते सांगतात, “ते गाणं तुम्ही सुरेशकडूनच ऐका.” हा त्यांचा मोठेपणा आहे. कारण प्रत्येक संगीतकारासाठी त्याचं गाणं हे त्याचं लेकरू असतं, त्यामुळे तो संगीतकार एकशे एक टक्के सरस गाऊ शकतो; तरीही ते असं म्हणतात हा त्यांचा मोठेपणा आहे आणि अर्थात असा संगीतकार मला भेटला हे माझं भाग्य आहे. म्हणूनच आज जेव्हा इतक्या वर्षांत त्यांनी माझ्यासाठी गाणं केलं नाही याची बोच लागून राहिली आहे. मी उत्सुक आहे त्यांच्या नवीन रचना आत्मसात करायला आणि गायला. माझी नेहमी इच्छा असते की मला त्यांचं गाणं गाण्याची संधी मिळावी. या मुलाखतीच्या माध्यमातून मी त्यांना हे सांगू इच्छितो, की ही माझी प्रखर इच्छा आहे आणि ती बोलून दाखवण्यात काही गैर नाही असं मला वाटतं. भाचा म्हणून मी त्यांच्याकडून गाणं मागू शकतो. लवकर त्यांनी याचा विचार करावा आणि चांगली गाणी करावी, मला गायला बोलवावं अशी माझी प्रार्थना आहे. शुभेच्छा देताना मी हे म्हणेन, की त्यांचं स्वास्थ्य उत्तम राहो आणि त्यांच्याकडून खूप चांगली गाणी सगळ्यांना ऐकायला मिळोत हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आणि मामासाहेबांना साष्टांग नमस्कार.
(शब्दांकन ः मनीषा नित्सुरे-जोशी)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link