Next
वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत!
शब्दांकन: मेधा फडणीस
Friday, September 06 | 03:00 PM
15 0 0
Share this story


मी मूळची सांगलीची. माझं संपूर्ण बालपण, माझी शाळा-कॉलेज, माझ्या जडणघडणीचा मुख्य काळ सांगलीमध्येच गेला. आई, बाबा, दादा आणि मी असं चौकोनी सुखवस्तू कुटुंब! अनेक मजेशीर आणि धमाल आठवणींनी भरलेला आणि भारलेला असा बालपणीचा काळ मी अनुभवला आहे. लहानपणी प्रचंड दंगा  केलाय, खोड्या काढल्यात आणि घरात शेंडेफळ असल्यानं सर्वांकडून स्वत:चे भरपूर लाडही करून घेतलेत. जसे लाड झालेत तसा ओरडाही बऱ्याचदा मिळाला. शाळेत मी हुशार विद्यार्थिनी होते. तरीही परीक्षेनंतर निकालाचं दडपण माझ्यावर सदैव असायचं. अगदी निकाल लागल्यावरही जोपर्यंत आई-बाबा ‘वाह काय मस्त मार्क मिळालेत तुला..’ अशी शाबासकी देत नाहीत  तोपर्यंत मी दडपणाखाली वावरायचे. दादा शांत तर मी चिडखोर असल्यानं आमच्यातील भांडण अनेकदा एकतर्फीच असायची.  अशाच एका भांडणात मी दादाची करंगळी मोडली आणि त्याला प्लॅस्टर घालावं लागलं होतं. त्यामुळे बाबा मला खूप ओरडले होते. अर्थात त्यानंतरही अनेकदा ओरडा खाण्याची वेळ माझ्यावर आली. मोबाइल हरवण्याचा विक्रम मी केला आहे! दहावीत असताना बाबांनी मला त्यावेळचा सर्वात महागडा असा मोबाइल घेऊन दिला होता. फोन घेतल्यानंतर सातव्या दिवशी त्या नव्याकोऱ्या फोनवर कॉफी सांडली. बाबा ओरडतील म्हणून मी पुढील बरेच दिवस तो डिस्प्ले उडालेला फोन वापरत होते. त्यानंतरचे दोन मोबाइलही असेच माझ्या  निष्काळजीपणामुळे गेले. फोन हरवल्यानंतर आईबाबा ओरडू नयेत, म्हणून मोबाइल हरवल्याची बातमी रडत रडत द्यायचे. त्यामुळे ओरडा कमी मिळायचा… चौथा मोबाइल मात्र स्वकमाईनं विकत घेतला. स्वकष्टानं मिळवला असल्यानं असेल कदाचित तो मी पुढे बरीच वर्षें वापरला. लहानपणीच्या अशा अनेक आंबट-गोड आठवणी आहेत. त्यावेळचा चिडखोर स्वभाव आईबाबांच्या शिस्तीमुळे आणि वेळोवेळी केलेल्या कानउघाडणीमुळे बराच शांत झाला. माझ्या स्ट्रगलिंगच्या दिवसांत हा शांत स्वभावच उपयोगी पडला.

नृत्याकडून अभिनयाकडे  
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सांगलीमधून मी मुंबईत कशी आले असा प्रश्न अनेकांनी मला विचारला. माझ्या घरात अभिनयच काय कलाक्षेत्रातही कुणीही नाही. आईला कलेची आवड होती. त्यामुळेच तिनं मी दुसरीत असताना कथकच्या क्लासला घातलं. मलाही नृत्य करायला आवडू लागल्यानं नृत्यात मी विशारद झाले. शाळेत असताना  मी बऱ्याच नृत्यस्पर्धांत भाग घेतला, पारितोषिकं मिळवली. परंतु अभिनयाचा विचार मनातही आला नव्हता. आज मागे वळून पाहताना असं जाणवतं, कथक करताना करावा लागणारा अभिनय, चेहऱ्यावरील भाव यांचा विचार करताना माझ्याही नकळत मी अभिनयाकडे वळले असावे. दहावीत असताना राज्यनाट्यस्पर्धेत मी पहिलं नाटक केलं. त्याचं नाव होतं ‘आम्ही दोघी.’ सुरुवातीला या नाटकात मला भूमिका नव्हती. तरीदेखील मी रोज नाटकाच्या तालमींना हजेरी लावत असे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचं काम, त्याच्या चेहऱ्यावरील भाव, उभं राहण्याची पद्धत निरखून पाहत असे. पुढे या नाटकातील एक मुलगी काही कारणामुळे नाटक सोडून गेली आणि नाटकाच्या दिग्दर्शिका चेतना वैद्य यांनी मला तिच्या भूमिकेसाठी विचारलं. अभिनयाची बाराखडीही माहीत नसलेली मी अचानक आलेल्या संधीमुळे गडबडून गेले खरी, पण बघू या कसं जमतंय ते असा विचार करून ती भूमिका स्वीकारली. अगदी लहान पाच ते सात मिनिटांची  ती भूमिका होती. इथूनच अभिनयाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर कॉलेजला गेल्यावर नाटकाच्या एका ग्रुपमध्ये मी होते. आम्ही वेगवेगळी नाटक वेगवेगळ्या कार्यक्रमांत सादर करायचो. राज्यनाट्यस्पर्धेत भाग घ्यायचो. त्यामुळे कॉलेजकडे माझं बरंच दुर्लक्षही झालं होतं. अकरावीपासून शेवटच्या वर्षापर्यंतच्या पाच वर्षांत मी मोजून जेमतेम दोन-तीन महिने कॉलेजला गेले असेन. परंतु या पाच वर्षांत मी करत असलेल्या नाटकांमुळे स्टेजची भीती कधी वाटलीच नाही.

अभिनयात स्थिरावरणं सोपं नाही
कालांतरानं अनेक नाटकांमधून मला कामं मिळू लागली. जसजशी मी  अभिनयाकडे ओढले गेले तसतसा माझा  मुंबईत येण्याचा निर्णय पक्का होत गेला. मुंबईत येऊन मी कुठे राहणार होते, काम कसं मिळवणार होते याची सुतारामही कल्पना नव्हती. परंतु या निर्णयात माझ्या आईबाबांनी खूप मोलाची साथ दिली. सांगलीत आवड म्हणून नाटक करणार की यात करिअर करणार यातला फरक मुंबईत आल्यानंतर हळूहळू मला कळू लागला. २०११ ला मी मुंबईत आले. अनेक ऑडिशन्स दिल्या. अनेक नकार पचवले. कधी लूक टेस्ट होऊनच कॉल आला नाही तर कधी एखाद्या मालिकेसाठी कॉन्ट्रॅक्ट करता करताच ती ऑफर हातातून गेली. अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करणं आणि त्यात स्थिरावणं ही गोष्ट अजिबात सोपी नाही, हे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं. स्वतःवरचा विश्वास डळमळतो की काय अशी परिस्थिती उद्भवत असताना माझ्या आईबाबांनी आणि पुढे माझ्या नवऱ्यानं मला खूप धीर दिला. मी हरले असा वाटत असतानाच ‘नाही, तू संधी सोडू नको ऑडिशन्स देत राहा’ या त्यांच्या वाक्यांनी अनेकदा आधार मिळाला. २०११ ते २०१८ या आठ वर्षांच्या काळात या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी मी खूप संघर्ष  केला. लहानमोठ्या अशा अनेक भूमिका केल्या. नाटकांतही कामं केली. परंतु मला ओळख मिळवून देणारी एकही भूमिका माझ्या वाट्याला या काळात आली नाही. त्यामुळे कुत्सितपणे, टोचून बोलणाऱ्या मंडळींमुळे माझा विश्वास डळमळू लागला होता. अतिशय निराशाजनक परिस्थिती असूनही स्वतःबद्दल मला पूर्ण खात्री होती. त्यामुळे मी निराश झाले नाही.  माझ्या मते तुम्हाला मिळणाऱ्या संधीमागे तुमच्या कष्टाइतकंच तुमचं नशीबही असावं लागतं. बऱ्याचदा एखादी गोष्ट कोणाला सहज मिळून जाते तर कोणाला अनेक वर्षांच्या तपस्येनंतर मिळते. माझ्या नशिबाचे दरवाजे आज ना उद्या उघडतील या एका आशेवर अनेक ऑडिशन्सना सकारात्मकरीत्या सामोरी गेले आणि त्या कष्टांचं फळ मला ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेच्या रूपानं मिळालं.

...आणि मधुवंती सापडली
या वर्षाच्या सुरुवातीला नवऱ्यासोबत नाशिकला काही कामासाठी गेले होते. तिथे गेले असताना ‘भागो मोहन प्यारे’चे सुजय हांडे यांचा फोन आला. ‘एका भूमिकेसाठी ऑडिशन पाठवून दे. मी तुला स्क्रिप्ट पाठवतो,’ असं सांगून त्यांनी फोन ठेवून दिला. कामात असूनही नवऱ्यानं मोबाइलवर माझा व्हिडिओ शूट केला आणि त्यांना पाठवून दिला. रोज देतो त्यापैकीच एक ऑडिशन असेल असं समजून मी ते फार गंभीरपणे घेतलं नाही. दोन दिवसांनी मला त्यांच्याकडून  लूक टेस्टसाठी ये असा निरोप आला. तिथे जाऊन मी लूक टेस्ट दिली. त्यानंतर ‘तुला आम्ही मधुवंतीच्या मुख्य भूमिकेसाठी निवडलं आहे,’ हे सांगणारा फोन आला. ते  ऐकून मला आठ वर्षांच्या संघर्षाचं चीज झाल्यासारखं वाटलं. माझी आई नेहमी म्हणते, ‘गरोदर बाई नऊ महिने जो त्रास सहन करते तो एकदा बाळाला हातात घेतल्यावर विसरून जाते.’ माझंही काहीसं असंच झालं. अजूनही मी स्वतःला यशस्वी म्हणणार नाही. मात्र यशाचा पहिला टप्पा मी गाठला आहे, असं मला नक्की वाटतंय.
मधुवंती कशी आहे, तिचा लूक कसा असेल यावर मी नेहमी आमच्या टीमबरोबर चर्चा करते. मधुवंती आणि माझ्यात काहीही साम्य नाही. ती अतिशय भडक, लाऊड अशी मुलगी असते तर मी सौम्य आणि शांत आहे. भडकपणा मला आवडत नाही आणि तोच दिसावा म्हणून मला बरीच मेहनत घ्यावी लागते आहे. मात्र तिच्यातला खोडसाळपणा काहीसा माझ्यातही असल्यानं ते भाव आणणं कठीण जात नाही. या भूमिकेसाठी शारीरिक दमछाक खूप होते. कारण ही मधुवंती कधी झाडावर,कधी टाकीवर, तर कधी गॅलरीतही चढून बसते. गाडीवरून पळते.  हे सर्व स्टंट करताना संपूर्ण युनिटची खूप मदत होते.
आम्ही या मालिकेचं चित्रीकरण करताना बरेच लोक भेटायला येतात. हॉरर कॉमेडी अशी ही मालिका असल्यानं सर्वांना खूप आवडते आहे. अनेक फोनही मला येतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतात, त्या ऐकून खूप समाधान मिळतं. सेटवर किंवा आऊटडोअर चित्रीकरणावेळी अनेक लहान मुले आम्हाला पाहायला येतात. त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र अशा असतात. काही लहान मुले फारच धीट असतात ते माझ्याकडे येतात आणि म्हणतात ‘तुम्ही त्या सीनसारखी लांब जीभ काढून दाखवा ना, दात काढून दाखवा ना..’असा कुतूहलमिश्रित प्रेमळ आग्रह त्यात असतो. तर काही लहान मुले कितीही समजावलं तरी माझ्यासोबत फोटो काढत नाहीत. साधे जवळ यायलाही बिचकतात त्यावेळी मला खूप हसू येतं.

इच्छा नायिका करण्याची
आता कुठे माझी ओळख लोकांना होऊ लागली आहे. मला पुढेही अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करायच्या आहेत. तसं बघायला गेलं तर प्रत्येक भूमिका हे एक आव्हानच असत. परंतु खऱ्या आयुष्यातल्या  आदर्श नायिकांची भूमिका करायला मला खूप आवडेल. प्रियांका चोप्रा हिनं साकारलेली मेरी कोमची भूमिका साकारायला मिळाली तर खरंच मजा येईल! मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही. नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व प्रांतांत मुशाफिरी करायची आहे.

फॅमिली मॅटर्स!
सध्या वेब सीरिजचा जमाना आहे, मलाही बऱ्याच वेब सीरिजच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र बहुतांश वेब सीरिजमध्ये दिसणारी अश्लील  दृश्यं, व्यसन करणारी माणसं यामुळे त्या सीरिज कुटुंबासमवेत पाहता येत नाहीत. त्यामुळे कुटुंबासोबत पाहता येतील अशाच पद्धतीच्या हिंदी, मराठी वेब सीरिज आल्या तर मी नक्की त्यात काम करीन.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link