Next
एका चावीचे रहस्य
मिलिंद कोकजे
Saturday, May 25 | 11:15 PM
15 0 0
Share this story

रहस्यपट म्हटला की एखादा गुन्हा, तोही बहुतांश खुनाचा, तो खून नक्की यानेच केला असेल असे वाटणारी एक (किंवा अनेक) व्यक्तिरेखा आणि शेवटी जराही संशय न आलेल्या एकदम दुसऱ्याच व्यक्तिरेखेने खून केल्याचा उलगडा होणे असा एक साचा असतो. या साच्यातही अनेक चांगले रहस्यपट तयार झाले आहेत. (१९७३ साली हिंदीत ‘धुंद’ नावाचा एक अप्रतिम रहस्यपट आला होता. त्यात संजय, नवीन निश्चल, झीनत आणि डॅनी यांनी कामे केली होती. खूपच चांगला चित्रपट असूनही त्यावर काहीसा अन्याय झाला.) या साच्यातही ‘सायको’सारखा वेगळा आणि उत्कृष्ट चित्रपट देणारा, परंतु खुनाचा प्रयत्न होताना, त्या खुनाची योजना आखताना, खून करणारा व्यवस्थित दाखवूनही रहस्यपटाची गंमत वेगळ्याप्रकारे कायम राखणारा दिग्दर्शक म्हणजे आल्फ्रेड हिचकॉक. त्याच्या ‘डायल एम फॉर मर्डर’मध्ये त्याने रहस्यपटाचा हा वेगळा साचा वापरला आहे.
मास्टर ऑफ सस्पेन्स (रहस्यपटांचा बादशहा) मानल्या गेलेल्या हिचकॉकने अगदी मूकपटांच्या जमान्यात सुरुवात करून (१९२५, पहिला चित्रपट प्सेजर गार्डन) आपल्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत पन्नास चित्रपट केले. ‘थर्टी नाईन स्टेप्स’(यातील त्या जिन्याची रचना बघण्यासारखी आहे), ‘द लेडी वॅनिशेस’, ‘व्हर्टिगो’, ‘नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट’ (यातील विमानाने केलेला माणसाचा पाठलाग बघण्यासारखा आहे), ‘रिबेका’, ‘द मॅन हू न्यू टू मच’, ‘फॉरेन कॉरस्पाँडट’, ‘रिअर विंडो’, ‘बर्ड्स’ असे एकाहून एक सरस चित्रपट त्याने दिले. परंतु त्याच्या कारकिर्दीवर कळस चढवला तो ‘सायको’ने. ‘सायको’च्या आवृत्त्या काढण्याचा मोह पुढे अनेकांना झाला व तशा त्याच्या काही आवृत्त्या आल्याही. हिचकॉकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या बहुतांश चित्रपटात त्याने अगदी दोन-पाच सेकंदांकरता कुठेतरी स्वतःचे दर्शन दिले आहे ( ‘टू कॅच अ थीफ’चा नायक बसमध्ये चढून एका जागेवर बसतो. तर त्याच्या शेजारच्या जागेवरचा प्रवासी हिचकॉक असतो, तर ‘रिअर विंडो’मध्ये समोरच्या एका घरात तो घड्याळाला चावी देताना दाखवला आहे. बस्स फक्त इतकेच त्याचे दर्शन.)
त्याच्या ‘डायल एम फॉर मर्डर’मध्ये तो खून कोणी केला असेल याचा तर्क लढवत बसण्याचे कष्ट प्रेक्षकाच्या डोक्याला देत नाही. या चित्रपटाची सगळी गंमत आहे ती खुनाची योजना कोणी आखली ते पोलीस कसे शोधून काढतात बघण्यात…त्यामुळे यातील रहस्य सांगितले तरी चित्रपट बघण्यातील गंमत कमी होत नाही. चित्रपटातील जवळजवळ ९० टक्के दृश्ये एका राहत्या घराच्या बाहेरही जात नाहीत, तरीही तो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चित्रपट संपल्यावर लक्षात येते की संपूर्ण चित्रपट फिरत राहतो तो एका घराच्या चावीभोवती.
आपली श्रीमंत बायको मॅर्गोट हिचे मार्क या गुन्हेगार कथालेखकाबरोबर प्रेमप्रकरण आहे हे कळल्यावर टेनिस खेळाडू टोनी तिचा खून करण्याच ठरवतो. त्य़ाआधी तिचे एक प्रेमपत्र सापडल्यावर तो वेगळ्या नावाने तिला ब्लॅकमेलही करतो. तिचा खून करण्याकरता तो छोटे गुन्हे करणारा आपला शाळेतला मित्र स्वानला बोलावतो. आपल्याला त्याची गुन्हेगारी वृत्ती माहीत झाली आहे हे त्याला सांगून तो फसवून त्या पत्रावर त्याच्या हाताचे ठसे उमटतील असे बघतो. त्याआधारे तो त्याला खुनाची सुपारी घ्यायला भाग पाडतो आणि या कामाकरता १,००० पौंड देण्याचे मान्य करतो.
टोनी योजना ठरवतो. तो स्वानला सांगतो की दुसऱ्या दिवशी तो संध्याकाळी मार्कबरोबर पार्टीला क्लबला जाईल. जाण्यापूर्वी त्याने मॅर्गोटच्या पर्समधली फ्लॅटची किल्ली बाहेरच्या जिन्यावरच्या कार्पेटखाली ठेवलेली असेल. त्या चावीने दरवाजा उघडून स्वानने आत येऊन पडद्यामागे थांबायचे. एका ठरावीक वेळेला तो मॅर्गोटला फोन करेल. ती फोन घ्यायला येईल तेव्हा त्याने गळा दाबून तिला मारायचे, हॉलचा मोठा काचेचा दरवाजा उघडायचा, चोरीचा प्रयत्न झाल्याच्या खुणा तयार करायच्या म्हणजे चोरीकरता खून झाला आहे असे पोलिसांना वाटेल व तपास त्या दिशेने होईल. काम झाल्यावर पुढच्या मुख्य दरवाजातून निघून जाताना परत चावी जिन्याच्या कार्पेटखाली ठेवायची व जायचे.
ठरल्याप्रमाणे स्वान चावी मिळवून घरात शिरतो. नंतर मात्र त्यांची योजना फसत जाते. सर्वात प्रथम टोनीचे घड्याळ बंद पडते आणि ते त्याच्या उशिरा लक्षात येते, त्यामुळे त्याला फोन करायला उशीर होतो. फोन घ्यायला मॅर्गोट येते आणि स्वान मागून आपल्या स्कार्फने तिचा गळा आवळतो. ती प्रतिकार करते आणि तिच्या हाताला टेबलवरची कात्री लागते त्याने ती स्वानवर वार करते आणि स्वानच मरतो.
टोनी तिला सांगतो तो घरी येईपर्यंत काहीही करू नकोस, कशालाही हात लावू नकोस. घरी आल्यावर तो तिला बेडरूममध्ये पाठवतो, स्वानच्या खिशातून तो फ्लॅटची चावी काढून घेतो आणि तिच्या पर्समध्ये ठेवतो. स्वानचा स्कार्फ नष्ट करतो आणि तेथे मॅर्गोटचे स्टॉकिंग ठेवतो, त्याला सापडलेले ते प्रेमपत्र तो स्वानच्या खिशात ठेवतो. त्यामुळे स्वान त्या पत्राकरता तिला ब्लॅकमेल करायला आलेला असताना तिने त्याचा खून केला अशी कहाणी तयार होते. इन्स्पेक्टर हबर्ड चौकशी करतो आणि अखेर मॅर्गोटला ब्लॅकमेल करण्याकरता आलेल्या स्वानचा खून करण्याच्या आरोपाखाली अटक करतो. तिला शिक्षाही होते.
पुढे जे काही घडते ते खरेतर शब्दात सांगणे कठीण आहे. हबर्डला शंका असतेच. तो नीट विचार करतो. त्या एका चावीमुळे अखेर टोनीची योजना उघड होते. तो जेव्हा स्वानच्या खिशातील आपल्या फ्लॅटची चावी काढून मॅर्गोटच्या पर्समध्ये ठेवतो तेव्हा त्याच्या लक्षात येत नाही ती खरेतर स्वानच्या घराची चावी असते. त्यावर विचार करून हबर्ड एक डाव टाकतो. टोनी त्यात अडकतो आणि त्याला खुनाची योजना आपणच आखल्याची कबुली द्यावी लागते.
चावीचा हा सगळा गोंधळ हिचकॉकने हबर्डद्वारे अफलातून पद्धतीने मांडला आहे. शेवटच्या भागात घटना इतक्या वेगाने घडतात की त्या क्षणाला प्रेक्षकाला हबर्डने कसा विचार करून टोनीच खुनी आहे या निर्णयाप्रत कसा पोचला आहे, त्यामागचा त्याचा तर्क काय आहे हे सगळे प्रेक्षकाला व्यवस्थित समजते. परंतु हे दुसऱ्याला सांगताना ते संगतवार नीट सांगणे कठीण होते. हबर्ड नुसते सांगत बसत नाही तर त्याला जे काही सांगायचे आहे, पटवायचे आहे ते तो करून दाखवतो. त्यामुळे चित्रपटाची रंगत शेवटी वाढतच जाते. जेव्हा चित्रपटासारख्या दृश्यमाध्यमात कथानक अनेक ठिकाणी न फिरता, कॅमेरा फार कुठे न जाता केवळ  एका घरातच जास्त काळ फिरत राहतो तेव्हा प्रेक्षकांचा रस टिकवून ठेवणे कठीण असते. परंतु हे आव्हान यशस्वीरीत्या पेलणे हेच हिचकॉकचे वैशिष्ट्य आहे. (त्याच्या ‘रिअर विंडो’मध्ये पायाला प्लास्टर लावल्यामुळे घरातल्या घरात व्हीलचेअरवर हिंडणाऱ्या नायकाच्या घराच्या खिडकीतून समोरचे घर दिसते. त्याचे घर आणि त्याच्या खिडकीतून जितके दिसते तितकीच चित्रपटीताल बहुतांश दृश्ये आहेत. ‘सायको’मध्ये सुरुवातीचा काही भाग सोडला तर बहुतांश उर्वरित भाग एक मोटेल, त्यातील एक खोली आणि जवळच असलेले मोटेलमालकाचे घर यातच दृश्ये फिरत राहतात.)
हिचकॉकने बहुतांश सर्व रहस्यपटच बनवले (एखादा ‘बर्ड्स’सारखा अपवाद, ज्यात रहस्यापेक्षा अंगावर काटा आणणारे भय आहे, कारण अचानक सर्व पक्षी मोठ्या प्रमाणावर माणसांवर हल्ले करू लागतात ही त्याची मध्यवर्ती कल्पना आहेच.‘सायको’मध्येही काही प्रमाणात भय आहे.) आणि ते करताना त्याच्या वेगळ्याच शैलीने ते चित्रपट केवळ लोकप्रियच झाले नाहीत तर त्याने रहस्यपटासारख्या एका वेगळ्या जॉनरला सन्मान मिळवून दिला असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही.

डायल एम फॉर मर्डर - १९५४
निर्माता, दिग्दर्शक - आल्फ्रेड हिचकॉक
मूळ नाटक, पटकथा - फ्रेडरीक नॉट
कलाकार - टोनी वेंडाईस : रे मिलँड, मॅर्गोट : ग्रेस केली, मार्क हॅलीडे : मार्क कमिंग्ज, स्वान : अँथनी डॉसन, 
हबर्ड :  जॉम विल्यम्स


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link