Next
फणसाच्या गऱ्यांची भाजी
वसुधा गवांदे
Friday, June 14 | 03:45 PM
15 0 0
Share this story


फणसाचे गरे, फणसपोळी, फणसाचे सांदण, आठळ्यांची भाजी किंवा उकडलेल्या आठळ्या असे अनेक पदार्थ या दिवसात करता येतात. फणसाच्या कुयरिची भाजी हासुद्धा त्यापैकी एक लोकप्रिय पदार्थ आहे. पण आज मी तुम्हाला गऱ्यांची भाजी सांगणार आहे.
 ही भाजी तशी सोपी नाही. त्यामुळे आजकाल ही भाजी केली जात नाही. पण सुट्टीच्या दिवशी करून पाहायला काय हरकत आहे, नाही का! याच दिवसात ही भाजी करता येते. म्हणजे वर्षातून एकदा-दोनदाच तर करायची आहे. चवीला ही भाजी खूप छान होते. सगळ्यांना आवडेल अशी होते. मग या वीकएंडला नक्की करून पहा. बाजारात भरपूर फणस येऊ लागले आहेत. कच्चा गऱ्यांचा फणस घ्या. गरे काढून एकेका गऱ्याचे बियांसकट चार भाग करा. गरे व बिया वेगवेगळ्या धुवून घ्या. कढईत तेल तापल्यावर त्यात हिंग, मोहरी आणि जिरं टाका. ते तडतडले की त्यावर लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे टाकून परतून घ्या. ते चांगले परतले गेले की धने-जिरं पावडर आणि हळद टाकून एक मिनिटांपर्यंत परतत राहा. आता आधी फणसाच्या चिरलेल्या बिया (आठळया) टाकून त्या परतून घ्या व साधारण अर्धी वाटी पाणी घालून त्या मंद गॅसवर शिजत ठेवा. बिया शिजत आल्या की मग त्यावर चिरलेले गऱ्यांचे तुकडे घाला. चवीपुरते मीठ व साखर घालून भाजी मंद गॅसवर शिजत ठेवा. मधून मधून परतत रहा. गरे शिजले की गॅस बंद करून खोबरं टाका. म्हटले तर ही भाजी फार कठीण नाही. फक्त फणस नीट निवडून घ्या. अति पिकलेला फणस घेऊ नका.
भाजी करताना बियांच्याभोवती कडक आवरण असते ते घ्यायचे नाही. ते काढून बिया वेगळ्या करून घ्या. गरे गोड असल्यास भाजीत वेगळी साखर घालू नका. ही भाजी शक्यतो कोरडीच करावी. याची रसभाजी करू नये. आठळया व गरे शिजण्यापुरतेच पाणी घालावे व नंतर ते आटवावे. खोबरे घातल्यावर या भाजीला आणखीनच छान चव येते. वटपोर्णिमेच्या निमित्ताने फणस आणणार असाल, तर एक कच्चा फणसही आणा आणि गऱ्यांची ही भाजी नक्की करून पहा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link