Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, July 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story

सततच्या निवडणुकांतून जनतेची सुटका व्हावी
‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ३९ पक्षांना निमंत्रित केले, मात्र २१ पक्षांनी हजेरी लावली. गेल्या वर्षी कायदा आयोगाने याच  विषयावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची मते मागवली होती. तेव्हा काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. यावेळीही काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, तर काही पक्षांनी विरोध केला. ‘एक देश, एक निवडणूक’ ही खरे तर एक चांगली संकल्पना आहे. त्याबाबतीत वारंवार चर्चा, विचारविनिमय होणे आणि त्यातून निरक्षीरविवेकबुद्धीनुसार निर्णय घेणे आवश्यक आहे. वास्तविक एकत्रित निवडणुका हा खरे तर उत्तम मार्ग आहे. कारण आपल्या देशात तीन-चार राज्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे त्यावर भरपूर खर्च होतो. यावर सरकारी खर्च आणि पक्षीय खर्च यांचा विचार केला तर यावेळच्या लोकसभा निवडणुकांवर सतरा हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला गेला. असाच खर्च विधानसभा निवडणुकांतही होत असतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर त्यातून एकचतुर्थांश खर्च वाचेल. शिवाय, वारंवार आचारसंहिता लागू करण्याची गरज पडणार नाही. १९५१ पासून १९६७ पर्यंत लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या. परंतु त्यानंतर राजकीय पक्षांनी आपल्या फायद्यासाठी किंवा राजकीय अस्थिरता यामुळे एकत्र निवडणुकीची प्रथा मोडीत निघाली. आतासुद्धा राजकीय अभ्यासकांच्या मते, नियमांमध्ये बदल करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाऊ शकतात. मात्र हा बदल लोकशाही आणि संघराज्य पद्धती या राज्यघटनेच्या दोन तत्त्वांशी विसंगत ठरेल. सर्व राजकीय पक्षांमध्ये यावर विचारविनिमय होऊन तोडगा निघाला पाहिजे. यातच खरे देशाचे हित आहे. एकत्र निवडणुकीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत, त्यातून सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. ही सरकारची आणि विरोधी पक्षांची कसोटी आहे. आज प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःचे हित पाहून निर्णय घेतो. तेव्हा विरोधी पक्षांना भाजपचा हा प्रयत्न म्हणजे आपल्या संघराज्यीय संसदीय लोकशाही पद्धतीस अध्यक्षीय पद्धतीकडे वळवण्याचा डाव असेल तर जरूर विरोध करावा. परंतु विरोधी पक्षांनी बैठकीला हजर राहून विरोध करावा. या प्रश्नांकडे केवळ राजकीय फायदा म्हणून बघू नये. त्यापलिकडेही समाजकारण आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे.          
- सुनील कुवरे,  शिवडी
-----------------------------------------------

‘हिंदू’पणाचे वावडे का?
दिनकर गांगल यांचा ८ जूनच्या अंकातील ‘हिंदुत्वाचा अर्थ’ हा लेख वाचला. लेखकाला हिंदुत्व, हिंदुस्तान हे नाव खटकत आहे, असे वाटते. ‘भारत’ हे नाव कसे सर्वांना सुलभ आहे, हे पटवून देण्यावर त्यांचा विशेष भर होता. याच लेखावर प्रसाद दीक्षित, ठाणे यांचा ‘हिंदुत्वातील अंगभूत लोकशाही’ हा प्रतिसाद अत्यंत अभ्यासपूर्ण वाटला. मला असे वाटते, की हिंदू धर्माचे नाव घेऊन जरा काही लिहिले की तो लिहिणारा हिंदुत्ववादी, जातीयवादी ठरतो. हिंदू धर्माचा आदर, प्रेम कुणी करू प्रकट करू नये, असा सर्वांचा अट्टहास असतो. माझ्या मते, कोणी किती प्रयत्न केले तरी ‘हिंदुस्तान’ हे नाव लोणच्याप्रमाणे, मुरांब्याप्रमाणे या मातीत मुरले आहे. ते सहजा सहजी काढून टाकणे कठीण आहे. सिंधूकाठ आणि पंच नद्या यांच्या काठावर वाढलेली संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती! कालांतराने तिचे नाव पडले ‘हिंदू संस्कृती.’ या देशावर आक्रमण केलेल्या प्रत्येकाने ‘हिंदुस्तान’चाच उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर शेवटी आलेल्या इंग्रजांनी या देशाला ‘इंडिया’ हे नाव दिले आणि या देशातील नागरिकांना ते ‘इंडियन’ म्हणू लागले. ‘हिंद’ देशाचा उच्चार त्यांनी ‘इंड’ असा केला. त्यावरून ‘हिंदी’ म्हणजे ‘इंडियन’ झाला. याव्यतिरिक्त आणखी काही वेगळा अर्थ असेल तर तो समजावून सांगावा.
 - महादेव रामचंद्र म्हात्रे, अलिबाग
-----------------------------------------------

ज्ञानाचे भांडार
प्रकाशित झाल्यापासून मी ‘झी मराठी दिशा’चा नियमित वाचक आहे. या आठवडापत्रामध्ये राजकारण, मनोरंजन, शोध-बोध, कविता, कृषी, साहित्य, कला, खेळ इत्यादी विषयांची परिपूर्ण माहिती असते. आजच्या काळात ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. हे आठवडापत्र ज्ञानाचे भांडार आहे. हे युवकांसाठी खरोखरच मार्गदर्शक आहे. सध्या सोशल मीडिया, इंटरनेट व मोबाइलच्या काळात आपली वाचनसंस्कृती लुप्त होत चालली आहे. ही संस्कृती यामुळे टिकून राहील, लोकांना वाचनाची सवय लागेल. विशेष म्हणजे मी ‘झी मराठी दिशा’चे सर्व अंक जपून ठेवले आहेत. यात ‘भारत... जगाच्या नजरेत’ ही लेखमाला मला खूप आवडली.           
- निखिल राऊत, श्रीरामपूर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link