Next
उत्तर नसलेले प्रश्न
विशेष प्रतिनिधी
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story

देशात लवकरच होणाऱ्या पाच राज्यांच्या व नंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या राजकीय हालचाली पाहता येता काळ बराच उलथापालथींचा असणार याबाबत काही शंका नाही. तरी या राजकीय समुद्रमंथनातून काहीतरी चांगले निघेल, अशी आशा आजच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर करणे अनाठायी ठरणार नाही. देशात राजकीय हालचालींना वेग येत असला तरी या विजयादशमीमुळे काही आनंदाचे क्षण लोकांच्या जीवनात आले आहेत. अचानक गायब झालेल्या पावसाने शेतकरी व ग्रामीण जनतेला अडचणीत आणले असले तरी हा दसरा आणि येती दिवाळी पारंपरिक उत्साहाने साजरी करण्याचा लोकांचा निर्धार दिसत आहे. सामान्य जनता अशा घाईगडबडीतही व अडचणीच्या काळातही आनंदाला दूर करत नाही हेच यातून दिसून येते. त्यामुळेच शेअर बाजार खाली-वर असा जोरदार झोका घेत असतानाही ग्राहकांच्या बाजारात मात्र चांगला उत्साह दिसत आहे. या वर्षीच्या दसरा-दिवाळीच्या खरेदीचे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाइन खरेदीचा विक्रमी उच्चांक. यावर्षी भारतातल्या दोन प्रमुख ऑनलाइन पोर्टलवरील विक्री तब्बल ३०० कोटी डॉलरच्या जवळपास गेली आहे. यामुळे ऑफलाइन विक्री करणारे दुकानदार हवालदिल झाले असून त्यांनी ऑनलाइन विक्रेत्यांना तोंड देण्यासाठी ग्राहकांवर सवलतीचा मारा केला आहे. एकंदर या दसरा-दिवाळीच्या खरेदीत ग्राहक हाच राजा आहे, हे सिद्ध झाले आहे. येत्या निवडणुकीतही मतदार हाच राजा असणार आहे. त्यामुळे वाढते पेट्रोल, डिझेल यांचे दर मर्यादा ओलांडून पुढे जाणार नाहीत, याची सत्ताधारी पक्षाला काळजी घ्यावी लागेल. शबरीमला व राममंदिर हे भावनिक विषय आहेत, त्यामुळे त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करणार हे उघड आहे, पण मतदारांचा या धार्मिक राजकारणावर विश्वास राहिलेला नाही, कारण असे प्रश्न फक्त निवडणुका जवळ आल्या की तावातावाने चर्चिले जातात व पुढे त्याचे काहीच होत नाही, हे लोकांनी ओळखले आहे. तीच गोष्ट संरक्षणसाहित्य करारांची आहे. संरक्षणसाहित्याच्या खरेदीचा वाद राजकारणातून निर्माण होतो, हे बोफोर्स प्रकरणाने सिद्ध केले आहे. राफालप्रकरण यापेक्षा वेगळे नाही, हेही लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे भावनिक आणि दिशाभूल करणारे विषय घेऊन केलेले राजकारण यशस्वी होण्याची शक्यता दुरावली आहे. आजच्या खऱ्या समस्या या बेरोजगारी, महागाई व गरिबी या आहेत व त्यातल्या एकाही समस्येचा उल्लेख सत्ताधारी वा विरोधी पक्ष करताना दिसत नाही. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेतून किती उद्योग भारतात आले, किती परकी गुंतवणूक आली, किती लोकांना रोजगार मिळाला हे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधीपक्षांनी सरकारला विचारावेत, अशी अपेक्षा आहे, पण हे अवघड प्रश्न न विचारता मंदिर, राफाल असे उत्तर नसलेले प्रश्न विचारण्याचा सोईस्कर मार्ग स्वीकारला जात आहे. या सर्व राजकीय प्रचारात सामान्य मतदार कुठेच दिसत नाही. सध्या देश आणि समाज ज्या नाजूक अवस्थेतून जात आहे, त्याचे प्रतिबिंब आजच्या राजकारणात अजिबात दिसत नाही. सत्ताधारी पक्षही स्वत:हून या प्रश्नांना हात लावीत नाही. त्याऐवजी पाकिस्तानला इशारे, सर्जिकल स्ट्राइक असे लोकभावना उन्मादित करणारे विषय घेऊन राजकारण करत आहे. लोकांपुढे सध्या निष्क्रिय विरोधीपक्ष आणि घोषणाबाजी करणारे सरकार असे दोनच पर्याय आहेत, त्यातून एकाला निवडण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link