Next
७० वर्षांचे प्रजासत्ताक
विशेष प्रतिनिधी
Friday, January 25 | 03:00 PM
15 0 0
Share this story

भारत प्रजासत्ताक होऊन बघता बघता ७० वर्षे झाली. कोणत्याही राष्ट्राच्या आयुष्यातील ७० वर्षे हा काही फार मोठा काळ नसतो. विशेषत: भारतासारख्या १०० कोटी लोकसंख्येच्या देशासाठी हा खूपच छोटा काळ आहे. परंतु या छोट्या काळात हा देश कशी वाटचाल करीत आहे यावर देशाच्या भविष्याचा अंदाज बांधता येतो. भारताने आपली वाटचाल विशिष्ट मार्गाने विशिष्ट ध्येयाकडे व्हावी यासाठी एक संविधानिक मार्ग आखून घेतला आहे. सुदैवाने एक आणीबाणीचा अपवाद वगळता संविधानाला धक्का लावण्याचा फार मोठा प्रयत्न झाला नाही. याचा अर्थ संविधानातील तरतुदींना वळसा घालून आपल्याला हवे ते करण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. मात्र जागरूक लोकमताने हे प्रयत्न हाणून पाडले. भारतीय संविधान आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या ध्येयाविषयी विशेष संवेदनशील आहे. भारतासारख्या बहुधार्मिक देशात धर्मनिरपेक्षतेला खास स्थान देणे आवश्यकही आहे. देशातील सर्वच धर्मांचे अभिमानी नेमके या धर्मनिरपेक्षतेलाच आपले लक्ष्य करीत असतात. गेल्या काही वर्षांत सर्वच धर्मांच्या अभिमान्यांनी आपला स्वर तीव्र करीत नेला आहे, ही चिंतेची बाब आहे. सर्वांनी सर्व धर्मांचा आदर केला नाही तर हे प्रजासत्ताक क्षणात अपयशी ठरू शकते. त्यामुळे सर्वांनी आपल्या धर्माबरोबर राष्ट्रधर्माचेही पालन करणे आवश्यक आहे. ७०व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्त ‘झी मराठी दिशा’ने या अंकाच्या विशेष विभागात प्रजासत्ताकाचे प्रगतिपुस्तक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक विकासाची काही ठरावीक क्षेत्रे निवडून त्यात आजवर काय प्रगती झाली आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या विशेष विभागात करण्यात आला आहे. त्यामुळे समाजातील दुर्बल घटकाला प्रगतीच्या एका विशिष्ट स्तरावर नेण्यात कितपत यश आले आहे, हे तपासता येईल, तसेच आणखी किती पल्ला गाठायचा आहे, याचा अंदाज घेता येईल. समाजाची प्रगती मोजण्याचे हे परिपूर्ण माप नाही याची कल्पना आहे, पण आपण जी मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत, त्यानुसार आपल्या देशाची वाटचाल चालू आहे की नाही हे कळू शकेल. देशाने स्वातंत्र्यानंतर काहीच प्रगती केली नाही, असे कुणीच म्हणणार नाही. सुरुवातीची चाचपडत होणारी वाटचाल, परकी आक्रमणे, दुष्काळ, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, विविध प्रकारचे सामाजिक अभिनिवेश यावर मात करीत प्रजासत्ताक येथवर पोहोचले आहे. आज भारत चंद्रावर माणूस पाठविण्याचा कार्यक्रम आखत आहे, पण दुसरीकडे समाजात मोठ्या प्रमाणात विसंवाद वाढत आहे. समाजातील सर्व घटकांना एका पातळीवर आणण्यासाठी आरक्षणासारखे पुरोगामी धोरण आखण्यात आले, पण आता आरक्षण हा जातीय अस्मितेचा मुद्दा बनत चालला आहे. आरक्षणासाठी आपल्या जाती मागास आहेत हे सिद्ध करण्याची चढाओढ सर्वत्र सुरू झाली आहे. आरक्षण हे साधन मानण्याऐवजी साध्य मानण्यात येत आहे. लोकानुनायी राजकारण करणाऱ्यांना तर आरक्षणात राजकीय संधी दिसत आहे. असे असले तरी नवतरुणवर्गाचा आपल्या बौद्धिक सामर्थ्यावर विश्वास आहे, ही समाधानाची बाब आहे. अनेक तरुणांनी आरक्षणाचे लाभ घेऊन आपली शैक्षणिक व आर्थिक प्रगती साध्य केली आहे व आता ते आरक्षणाचा पांगुळगाडा सोडून स्वतंत्रपणे वाटचाल करू लागले आहेत. यापुढच्या काळात आरक्षणाची मागणी वाढण्याऐवजी “आरक्षण आता नको” असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. भारतीय समाजात सर्व निर्णयांवर घनघोर चर्चा होते, प्रसंगी ही चर्चा हातघाईवरही येते, पण त्यातून नक्कीच चांगले काहीतरी निघते. त्यामुळे सतत चर्चा होत असेल तर प्रजासत्ताकाला चिंतेचे कारण नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link