Next
२०२२ मध्ये मध्यावधी निवडणूक
नंदकिशोर जकातदार
Friday, May 17 | 02:45 PM
15 0 0
Share this story

निवडणुकांचे भविष्य सांगताना भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या म्हणजे २६ जानेवारी १९५० च्या कुंडलीचा विचार करणे आवश्यक ठरते. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विचार करताना पूर्वी पक्षाच्या पत्रिकेचा विचार करावा लागत असे. आता मात्र पक्षप्रमुख किवा त्यांच्या नेत्याच्या पत्रिकेचा विचार करावा लागेल. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या कुंडलीतील लग्नस्थान, म्हणजे इच्छा, राशीस्वामी म्हणजे मन, तृतीय स्थान म्हणजे पराक्रम, षष्ठ स्थान- शत्रू, सप्तमस्थान, भागीदार, दशम स्थान कर्म व लाभस्थान लाभ यांचा विचार करावा लागेल, ग्रहाचा विचार करता रवी, शनि, मंगळ यांचा विचार करावा लागेल तसेच बुध, गुरू, राहू यांचा विचार करणे आवश्यक ठरेल, त्याचप्रमाणे ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवसांच्या कुंडल्यांचा विचार करावा लागेल. सध्या सत्तेत असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष या पक्षाचे मिथुन लग्न व वृश्चिक रास आहे.

भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शाह यांच्या पत्रिकेचा विचार करता त्यांचे कन्या लग्न व मेष रास आहे. त्यामुळे बुध हा बुद्धीचा कारक ग्रह व राशी स्वामी मंगळ हा पराक्रमाचा कारक गृह आहे. ही निवडणूक व्यक्तीकेंद्रीत असल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांचे वृश्चिक लग्न व वृश्चिक रास आहे व लग्नात मंगळ आहे. ११ एप्रिल व २३ मे दरम्यान गोचरीने मंगळ हा मेष वृषभ राशीत असून रवी हा मीन, मेष व वृषभ राशीत राहणार असून शनि हा धनुराशीत राहणार आहे. त्यामुळे भाजपला २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या जागा टिकवता येणार नसून त्यामध्ये ३० टक्के जागा कमी होतील म्हणजे यावेळेस त्यांना २१० ते २३० जागा मिळतील. तरीही सर्वांत मोठा पक्ष म्हणून ते येतील.

दुसरा मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस. या पक्षाचे धनु लग्न असून मेष रास आहे व मंगळ हा उच्चीचा असून व शनि हा नीचेचा आहे. या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी असून त्यांचे मकर लग्न असून वृश्चिक रास आहे. लग्नेश शनि हा गोचरीने व्ययस्थानात असून रवी हा पराक्रम, चतुर्थ व पंचमस्थानात येणार असून त्यामुळे त्यांना गेल्या वेळेपेक्षा अधिक यश मिळेल म्हणजेच काँग्रेस पक्षाला १०० ते १२० जागा मिळतील.

या दोन्ही पक्षांचा विचार केल्यानंतर मग आपणांस प्रादेशिक पक्षांचा विचार करावा लागेल. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य असून येथे ८० जागा आहेत, या ठिकाणी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष म्हणजेच अखिलेश यादव व मायावती यांच्या पत्रिकेचा विचार करावा लागेल. त्या दोन्हीचा विचार करता त्यांना चांगले यश मिळून दोघांना मिळून ३० ते ३५ जागा मिळतील

दुसरे मोठे राज्य म्हणजे महाराष्ट्र, येथे ४८ जागा आहेत. महाराष्ट्राचा विचार करताना आपणास, नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या कुंडलीचा विचार करणे आवश्यक ठरेल. या सर्वाच्या कुंडल्याचा विचार करता यंदा भाजप व शिवसेना युतीला ३१ ते ३३ जागा मिळतील. काँग्रेस-राष्ट्रवादी व स्वाभिमान पक्षाच्या युतीला १५ ते १७ जागा मिळतील, यानंतरचे मोठे राज्य पश्चिम बंगालमध्ये ४२ जागा असून ममता बॅनर्जीच्या कुंडलीचा विचार करता त्यांना गेल्या वेळेप्रमाणे ३२ जागा मिळतील.

पुढचे मोठे राज्य म्हणजे बिहार. नितीशकुमार यांच्याबरोबर भाजपयु निवडणूक लढवत आहे. त्यांच्या कुंडलीचा विचार करता त्यांना १७ पैकी १२ जागांवर यश मिळेल. दक्षिण भारताच्या विचार करता तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य असून तामिळनाडूमध्ये द्रमुक पक्षाला चांगल्या २५ ते २८ जागा मिळतील. केरळमध्ये काँग्रेस आघाडीला यश मिळून १२ जागा मिळतील. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू व विजय भास्कर रेडींच्या पक्षांत सामना आहे. रेड्डींच्या पत्रिकेत शुभयोग असल्यामुळे त्यांना १६ ते १८ जागांवर यश मिळेल. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या कुंडलीत रवी, शनि व मंगळ चांगला असल्यामुळे त्यांनाही यश मिळेल. कर्नाटकमध्ये भाजप, जनता दल व काँग्रेस युतीमध्ये लढत असून कुमार स्वामी व येडुरप्पा यांच्या कुंडलीचा विचार करता दोघांनाही समान यश मिळेल. भाजपला १४ ते १५ जागा व काँग्रेस-जनता दलाला ९ ते ११ जागा मिळतील. आसाम, ओडिशा, या ईशान्येकडील राज्यांत प्रादेशिक पक्षाला यश मिळेल. दिल्लीमध्ये भाजप, आप, काँग्रेसमध्ये लढत असून त्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा कुंडलीला अनुकूल ग्रहमान नसल्यामुळे ‘आप’ला यश मिळणार नाही. एकंदरीत विचार करता भाजपला गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा, उत्तरांचल, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांत यश मिळेल. काँग्रेसला सगळीकडे संमिश्र यश मिळेल. एकंदरीत ज्योतिषशास्त्रदृष्ट्या कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसून भाजपला सर्वाधिक म्हणजे २१० ते २३० जागा मिळतील व त्याच्या मित्रपक्षाला मिळून २७० ते २८० जागा मिळून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, मात्र २०२२ मध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका होतील.

टीप- हे अंदाज ज्योतिषशास्त्रदृष्ट्या सांगण्यात आले असून जागांमध्ये १० टक्के मागेपुढे फरक पडू शकतो.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link