Next
अभेद भक्तीने आत्मबोध
स्वामी मकरंदनाथ
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this storyपरमार्थ करत असताना भक्ती ही खूप सोपी साधना आहे, त्यामध्ये करण्यासारखे विशेष काहीच नाही, असे कोणाकोणाला वाटते. ध्यानाची साधना करायची म्हणजे दररोज दीड-दोन तास बसायला हवे. मनाकडे साक्षित्वाने लक्ष ठेवायला हवे. ते आवरून, पुढे नाहीसे करण्याचा खटाटोप करायला हवा. भक्तीमध्ये श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे,

हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।।


एवढे केले तरी बस! येताजाता नाम घेतले की झाले, असे लोकांचे समज असतात. भक्तीची नेमकी कल्पना नाही म्हणून ती सोपी वाटते. एखाद्या विषयात पारंगत होण्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो. त्या विषयात अधिक उतरले, की तो विषय सोपा नाही हे लक्षात येते, भक्तीच्या बाबतीतही तसेच आहे.
खरे तर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, समजून घेऊन जो कुणी नाम-ध्यानादि साधना करेल त्याला भक्तीही सोपी आहे आणि ध्यानही सोपे आहे. त्याच्या लक्षात येईल, की भक्ती ही ध्यानाला पूरक आहे आणि ध्यान हे भक्तीसाठी आवश्यक आहे. ध्यान हे भक्तीतून वेगळे काढता येत नाही. भक्ती याचा अर्थ परमात्म्याशी एकरूपता. समर्थ म्हणतात,

विभक्त नसावे। तरीच भक्त म्हणवावे।।
भक्तीविषयी बोलताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
तरंगु लहानु। परि सिंधूसी नाही भिन्नु।
तैसा ईश्वरी आनु। नोहेचि मा।।
ऐसेनि पै समरसे। दृष्टी जै उल्हासे।
तै भक्ती ऐसे। आम्ही म्हणो।।


अशा प्रकारची अभेद भक्ती साधण्यासाठी काही काळ शांत बसून ध्यान करणे तसेच नाम घेणे हे दोन्ही आवश्यक आहे. ध्यानामध्ये मनाचे उन्मन होते, क्षण क्षण परमात्मभाव प्राप्त होतो, तर नामाने मन आनंदरूप होऊन परमात्म्याशी ऐक्यता साधली जाते. ध्यान, नामस्मरण, पूजा, सत्संगती, गुरुसेवा, तीर्थयात्रा इतकेच नव्हे तर ईश्वरार्पणबुद्धीने स्वधर्मकर्म हे सर्व भक्तीमध्ये अंतर्भूत आहे. या सर्व क्रियांनी भक्तीची परिपूर्णता होत असते. अशा प्रकारच्या समग्र जीवनातूनच साधकाला आत्मबोध प्राप्त होतो.

प्रश्न असा उरतो, की आपल्याला जीवनामध्ये नेमके काय हवे आहे? बुद्धदेवांची एक गोष्ट आहे. ते एकदा प्रवचनामध्ये सांगत होते, की आत्मज्ञान ही सोपी गोष्ट आहे. प्रत्येकाला ते मिळवण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. फक्त ठरावीक मार्गाने शेवटपर्यंत चालत राहिले पाहिजे. त्यावर एका श्रोत्याने त्यांना विचारले, “एवढी सोपी गोष्ट आहे तर मग जगामध्ये या मार्गावरून जाऊन स्वत:चे जीवन धन्य करून घेतलेले असे आत्मज्ञानी दिसत का नाहीत?” त्यावर बुद्धदेव म्हणाले, “जरा गावामध्ये जाऊन शोध घेऊन बघ, की आत्मज्ञान कोणाला हवे आहे? मोक्ष कोणाला पाहिजे?” प्रत्यक्ष लोकांना विचारल्यावर लक्षात आले, की एकही व्यक्ती नव्हती जिला आत्मबोध हवा आहे! हे पाहून बुद्धदेव म्हणाले, “मोक्ष, आत्मज्ञान सर्वांना सुलभ आहे, पण ते कोणालाही नको आहे.”
प्रत्येकाने अंतर्मुख होऊन तपासण्याची गरज आहे, की आपल्याला काय हवे आहे? आत्मबोधाने संपन्न झालेल्या जीवनातच शाश्वत शांती, समाधान भरून असते आणि त्यासाठीच प्रशस्त मार्ग अभेद भावनेने केलेल्या भक्तीतून जातो.

(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य
स्वामी माधवनाथ यांचा वारसा
पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे
खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link